मुंबई :- अभ्यासक्रमांच्या प्रवेशावेळी राज्यभरातील विद्यापीठे व महाविद्यालयांकडून विविध शैक्षणिक कारणांसाठी घेतली जाणारी अनामत रक्कम (डिपॉझिट) संबंधित विद्यार्थ्यांना परत देणे बंधनकारक असताना विद्यार्थ्यांच्या या हक्काच्या रक्कमेवर डल्ला मारला जात असल्याची धक्कादायक बाब आमदार लक्ष्मण जगताप यांनी समोर आणली आहे. याप्रकरणी आमदार जगताप यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात अतारांकित प्रश्न (क्रमांक ३२३४८) उपस्थित करून राज्यभरातील विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्काची अनामत रक्कम परत करण्याबाबत शासन स्तरावर काय कार्यवाही करण्यात आली आहे? याचा जाब राज्य सरकारला विचारला. त्यावर उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी विद्यार्थ्यांना देय असलेली अनामत रक्कम तत्काळ परत देण्याबाबत विद्यापीठांना व महाविद्यालयांना निर्देश देण्यात आल्याचे लेखी उत्तर दिले आहे.
राज्यातील सर्व विद्यापीठे व महाविद्यालयांमध्ये विविध व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांना दरवर्षी लाखो विद्यार्थी प्रवेश घेतात. प्रवेश घेणाऱ्या या विद्यार्थ्यांकडून अभ्यासक्रमाच्या शिक्षणासाठी शुल्क घेतले जाते. त्याचबरोबर त्यांच्याकडून विविध शैक्षणिक गोष्टींसाठीही अनामत रक्कम घेतली जाते. त्यामध्ये ग्रंथालयातील पुस्तके, प्रयोगशाळेतील साहित्य हाताळणी, क्रीडा साहित्य यांसारख्या गोष्टींचा समावेश आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांकडून हजारो रुपये अनामत रक्कम म्हणून घेतली जाते. अभ्यासक्रमाचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर संबंधित विद्यार्थ्यांना विद्यापीठांनी व महाविद्यालयांनी अनामत रक्कम परत करणे कायद्याने बंधनकारक आहे. पण शैक्षणिक करणांसाठी घेतलेली अनामत रक्कम विद्यार्थ्यांना परत देण्यासाठी विद्यापीठे आणि महाविद्यालये टाळाटाळ करतात.

विद्यार्थ्यांकडून अनामत रक्कमेपोटी घेतलेले कोट्यवधी रुपये राज्यभरातील विद्यापीठे व महाविद्यालयांमध्ये पडून आहेत. विविध विद्यार्थी संघटनांकडूनही अनामत रक्कम परत मिळावी म्हणून मागणी केली जाते. पण विद्यापीठ व महाविद्यालयांच्या व्यवस्थापनांकडून त्याची दखल घेतली जात नाही. त्यामुळे आमदार लक्ष्मण जगताप यांनी राज्यभरातील विद्यार्थ्यांचे हक्काचे पैसे त्यांना परत मिळावेत म्हणून अर्थसंकल्पीय अधिवेशनात आवाज उठवला. त्यांनी याप्रकरणी अधिवेशनात अतारांकित प्रश्न उपस्थित केला होता.

राज्यातील व्यवसायिक तसेच बिगर व्यवसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेत असताना महाविद्यालये विद्यार्थ्यांकडून ग्रंथालयातील पुस्तके, प्रयोगशाळेतील साहित्य हाताळणी क्रीडा साहित्य आदींसाठी विशिष्ट रक्कम डिपॉझिट म्हणून ठेवून घेतात हे खरे आहे का?, अभ्यासक्रमाचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर संबंधित रक्कम विद्यार्थ्यांना देणे अनिवार्य असते हे खरे आहे का?, राज्यातील अनेक महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांना अनामत रक्कम देण्यास टाळाटाळ करण्यात येते हे खरे आहे का?, विद्यार्थ्यांच्या अनामत रक्कमेचे कोट्यवधी रुपये पडून असल्याचे उघडकीस आले आहे हे खरे आहे का?, हे कोट्यावधी रुपये विद्यार्थ्यांना परत मिळावेत यासाठी विद्यार्थी संघटनांकडून शासन स्तरावर पाठपुरावा करण्यात येत आहे हे खरे आहे का?, राज्याचे उच्च शिक्षण संचालक यांनी राज्यातील सर्व विभागीय संचालकांना पत्र पाठवून महाविद्यालयांकडे असणारे अनामत रकमेची माहिती देण्याचे आदेश मार्च २०२१ दरम्यान दिले होते हे खरे आहे का?, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागाच्या उपकुलसचिव यांनी विद्यापीठाच्या संगीत महाविद्यालयाच्या प्राचार्यांना पत्र पाठवून अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांकडून घेत असलेली अनामत रक्कम परत करण्याचे आदेश दिले होते हे खरे आहे का ?, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठच्या संलग्न असलेल्या महाविद्यालयातील किती महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना अनामत रक्कम परत केली आहे?, राज्यातील महाविद्यालयांनी अनामत रक्कम विद्यार्थ्यांना परत करण्याबाबत शासन स्तरावर काय कार्यवाही करण्यात आली आहे?, असे प्रश्न विचारले.

त्याला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी उत्तर दिले आहे. विद्यार्थ्यांना देय असलेली अनामत रक्कम त्यांना तत्काळ परत देण्याबाबत विद्यापीठांना व महाविद्यालयांना निर्देश देण्यात आल्याचे मंत्री सामंत यांनी लेखी उत्तर दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *