डॉ. प्रमोद चौधरी यांना जीवनगौरव पुरस्कार

प्रथमेश लघाटे, मुग्धा वैशंपायन, पं. भुवनेश्वर कोमकली, संकर्षण, स्पृहा, योगेश सोमण यंदाचे आकर्षण

चिंचवड :- श्री मयुरेश्वर अवतार श्रीमंत महासाधू श्री मोरया गोसावी महाराजांच्या ४६४ व्या संजीवन समाधी सोहळ्याचे आयोजन यंदा ६ ते १० डिसेंबर २०२५ दरम्यान संजीवन समाधी मंदिर आणि श्री मंगलमूर्ती वाडा, चिंचवड येथे भव्य उत्साहात करण्यात आले आहे. यंदाच्या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे ‘इथेनॉल मॅन’ म्हणून ओळखले जाणारे प्राज इंडस्ट्रीजचे संस्थापक डॉ. प्रमोद चौधरी यांना ‘श्री मोरया गोसावी महाराज जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार असून, प्रथमेश लघाटे, मुग्धा वैशंपायन, योगिता गोडबोले, संदीप उबाळे आणि पं. भुवनेश कुमार कोमकली यांच्या गायनाची पर्वणी रसिकांना अनुभवता येणार आहे. याचबरोबर संकर्षण आणि स्पृहा यांच्या विशेष कार्यक्रमांसह योगेश सोमण यांचा ‘आनंदडोह’ हा बहुप्रतीक्षित सांस्कृतिक कार्यक्रमही यावर्षी मोठे आकर्षण ठरणार आहे.

शनिवार, ६ डिसेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता या सोहळ्याचे उद्घाटन मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री तसेच सिंधुदुर्ग चे पालकमंत्री नितेश राणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त व प्रशासक श्रावण हर्डीकर, तसेच सहधर्मादाय आयुक्त रजनी क्षीरसागर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. खासदार श्रीरंग आप्पा बारणे, डॉ. अमोल कोल्हे, विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, आमदार शंकर जगताप, महेशदादा लांडगे, उमाताई खापरे, अमित गोरखे आणि बापूसाहेब पठारे हे मान्यवरही सोहळ्यात सहभागी होणार आहेत. याशिवाय संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान (आळंदी) चे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ आणि जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थान (देहू) चे मुख्य विश्वस्त जालिंदर महाराज मोरे यांचीही उपस्थिती सोहळ्याची शोभा वाढवणार आहे, अशी माहिती मुख्य विश्वस्त मंदार देव महाराज यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी विश्वस्त जितेंद्र देव, केशव विद्वांस आणि ॲड. देवराज डहाळे तसेच माजी महापौर र अपर्णा डोके, माजी नगरसेवक सुरेश भोईर, मोरेश्वर शेडगे, अश्विनी चिंचवडे आदी उपस्थित होते.

यापुढे दर संकष्टी चतुर्थीला पवनामाईची आरती सुरू करण्यात येणार आहे. पर्यावरण व नदी विषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात येत आहे.

उद्घाटनापूर्वी श्री नितीन दैठणकर यांचे सनईवादनाने परिसर भक्तिरसाने न्हाऊन निघणार आहे. पाचही दिवस सकाळी ६.०० वाजता सनई चौघडा वादन आणि सकाळी ८.३० वाजता श्री मोरया गोसावी महाराज ओवीबद्ध चरित्र पठण होणार आहे. या सोहळ्यातील प्रमुख धार्मिक विधींमध्ये रविवार, ७ डिसेंबर रोजी सकाळी ७ वाजता सामुदायिक अथर्वशीर्ष पठण, सकाळी ९ ते ११ वाजेपर्यंत होणारा सामुदायिक महाभिषेक आणि वैदिक पद्धतीने संपन्न होणारे मन्युसुक्त हवन यांचा समावेश आहे.

सोहळ्यादरम्यान धार्मिक कार्यक्रमांसोबतच समाजोपयोगी उपक्रमांनाही विशेष महत्त्व दिले गेले आहे. ७ आणि ८ डिसेंबर रोजी आरोग्य, दंत व नेत्र तपासणी शिबिरे, तसेच रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय ९ डिसेंबर रोजी सकाळी ‘सोहम योग साधना मंडळा’तर्फे योग वर्ग आयोजित करण्यात आला आहे.

रात्रीच्या सांस्कृतिक सत्रात कला, साहित्य आणि संगीताची पर्वणी रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. योगिता गोडबोले आणि संदीप उबाळे यांचे सुगम संगीत, प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांचा ‘मर्मबंधनातली ठेव’ कार्यक्रम, तसेच पं. भुवनेशकुमार कोमकल्ली यांचे उपशास्त्रीय गायन होणार आहे. सोमवार, ८ डिसेंबर रोजी ज्येष्ठ पत्रकार डॉ. उदय निरगुडकर यांचे ‘सध्याचा सामर्थ्यशाली भारत’ या विषयावर व्याख्यान आयोजित केले आहे. याचबरोबर संकर्षण–स्पृहा यांचे विशेष सादरीकरण आणि योगेश सोमण यांचा ‘आनंदडोह’ हा कार्यक्रमही खास आकर्षण ठरणार आहे.

या सोहळ्याचे मुख्य आकर्षण असलेला ‘महासाधू श्री मोरया गोसावी महाराज जीवनगौरव पुरस्कार’ मंगळवार, ९ डिसेंबर रोजी सायंकाळी डॉ. प्रमोद चौधरी यांना ज्येष्ठ उद्योजक अभय फिरोदिया यांच्या हस्ते प्रदान केला जाणार आहे.

बुधवार, १० डिसेंबर (मार्गशीर्ष वद्य षष्ठी) रोजी सोहळ्याची सांगता होईल. पहाटे ४.३० वाजता श्रींच्या संजीवन समाधीची महापूजा मंदार महाराज देव व चिंचवड ब्रह्मवृंद यांच्या हस्ते संपन्न होईल. सकाळी ७ वाजता पुष्पवृष्टी, नगारखाना आणि केरळी वाद्य पथकासह नगरप्रदक्षिणा निघेल. त्यानंतर सकाळी ९.३० ते ११.३० या वेळेत ह.भ.प. प्रमोद महाराज जगताप (बारामती) यांचे संजीवन समाधी सोहळ्याचे कीर्तन होईल. दुपारी १२ वाजल्यापासून सर्व भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी मानवंदना ढोलताशा पथक, गंगा आरती आणि रात्री ८ वाजता भव्य आतषबाजीसह सोहळ्याची सांगता करण्यात येणार आहे.

सर्व मोरया भक्तांनी या सोहळ्यास तन-मन-धनाने सहकार्य करून श्री मोरया चरणी सेवा रुजू करावी आणि हा भक्तिसोहळा अधिक यशस्वी करावा, असे आवाहन मुख्य विश्वस्त श्री मंदार जगन्नाथ देव महाराज, तसेच विश्वस्त जितेंद्र देव, केशव विद्वांस, ॲड. राजेंद्र उमाप आणि ॲड. देवराज डहाळे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *