पिंपरी: थोर समाजसुधारक आणि स्वच्छतेचे अग्रदूत राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या १५० व्या जयंती वर्षाचे औचित्य साधून पिंपरी-चिंचवड शहरात विविध लोककल्याणकारी उपक्रम राबविण्याची मागणी ओबीसी संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात समितीने महापालिका आयुक्त, महापौर आणि जनसंपर्क विभागाला दिलेल्या निवेदनाला प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला असून, यंदा गाडगे बाबांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होणार असल्याचे संकेत दिले आहेत.
शासकीय निर्णयाची (GR) प्रभावी अंमलबजावणी महाराष्ट्र शासनाने गाडगे बाबांच्या १५० व्या जयंतीनिमित्त प्रशासकीय कामात गती आणण्यासाठी विशेष निर्देश दिले आहेत. याच धर्तीवर, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने शहरात ‘शताब्दीोत्तर सुवर्ण महोत्सवी’ वर्षाचे औचित्य साधून विशेष उपक्रम राबवावेत, असा प्रस्ताव समितीचे शहराध्यक्ष आनंदा कुदळे आणि कार्याध्यक्ष भाई विशाल जाधव यांनी मांडला.
प्रस्तावातील प्रमुख वैशिष्ट्ये :
१५० तास ‘स्वच्छता महाअभियान’: जयंतीनिमित्त संपूर्ण शहरात १५० तास निरंतर स्वच्छता मोहीम राबवावी.
सफाई कामगारांचा सन्मान: शहराच्या आरोग्यासाठी झटणाऱ्या कर्मचाऱ्यांना ‘गाडगे बाबा सेवा पुरस्कार’ देऊन गौरवावे.
प्रबोधन पर्व: शाळा आणि उद्यानांमध्ये गाडगे बाबांच्या विचारांवर आधारित व्याख्याने आणि पथनाट्ये आयोजित करावीत.
सुशोभीकरण: गाडगे बाबांच्या नावाने असलेल्या वास्तू आणि पुतळा परिसराचे सुशोभीकरण करून आकर्षक रोषणाई करावी.
भित्तीचित्रे: शहराच्या प्रमुख भिंतींवर बाबांचे सामाजिक संदेश देणारी चित्रे रेखाटावीत.
प्रशासकीय प्रतिसाद
या निवेदनाची दखल घेत नवनिर्वाचित महापौर रवी लांडगे यांनी आश्वस्त केले की, “राष्ट्रसंत गाडगे बाबांची जयंती शहरात अभूतपूर्व पद्धतीने साजरी केली जाईल.” तसेच जनसंपर्क विभागाचे उपायुक्त अण्णा बोदडे यांनीही यावर्षी जयंतीनिमित्त व्यापक स्तरावर उपक्रम राबविण्याचे नियोजन असल्याचे स्पष्ट केले.
हे निवेदन देताना मुरलीधर दळवी, शंकर लोंढे, नंदाताई करे, बालाजी नवले, आकाश कांबळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. गाडगे बाबांचे विचार पिंपरी-चिंचवडला अधिक ‘स्वच्छ आणि सुसंस्कृत’ बनवण्यासाठी प्रेरक ठरतील, असा विश्वास ओबीसी संघर्ष समितीने व्यक्त केला आहे.
