राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते विज्ञान भवनात पुरस्कार प्रदान; महापौर रवि लांडगे आणि आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी स्वीकारला सन्मान
पिंपरी, दि. ११ नोव्हेंबर २०२६ : स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६ मध्ये उल्लेखनीय कामगिरी करत १० लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या गटात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक पटकावला असून, राज्यातील सर्वाधिक स्वच्छ शहराचा बहुमान मिळविला आहे. शहराच्या स्वच्छता व्यवस्थेत सातत्याने सुधारणा घडवून आणण्यासाठी महापालिकेने केलेल्या नियोजनबद्ध प्रयत्नांची राष्ट्रीय स्तरावरही दखल घेण्यात आली असून, महानगरपालिकेला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
महानगरपालिकेच्या वतीने महापौर रवि लांडगे आणि आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी हा सन्मान स्वीकारला. यावेळी अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, उप आयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल आदी उपस्थित होते. केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी कार्यमंत्री मनोहर लाल, केंद्रीय राज्यमंत्री तोखन साहू, संबंधित विभागाचे सचिव सतेंद्र सिंह आणि सचिव डी. थारा यांच्यासह केंद्र शासनातील वरिष्ठ अधिकारी या सोहळ्यास उपस्थित होते. महाराष्ट्रात मिळालेल्या प्रथम क्रमांकाच्या पुरस्काराने पिंपरी चिंचवड शहराच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला गेला आहे.
स्वच्छतेच्या बाबतीत शहराची कामगिरी उंचावण्यासाठी केवळ महापालिका यंत्रणेच्या माध्यमातून स्वच्छता राखण्याऐवजी नागरिकांच्या दैनंदिन व्यवहारात स्वच्छतेची शिस्त रुजविण्यावर महानगरपालिकेने भर दिला आहे. कचऱ्याचे उगमस्थानी विलगीकरण, नियमित संकलन, शास्त्रोक्त प्रक्रिया आणि पुनर्वापर या बाबींची प्रभावी अंमलबजावणी करण्याबरोबरच सार्वजनिक ठिकाणांच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष देण्यात आले. या प्रयत्नांना तंत्रज्ञानाची जोड आणि विविध प्रशासकीय विभागांचा समन्वय मिळाल्याने शहराच्या स्वच्छता व्यवस्थेला अधिक संघटित आणि परिणामकारक स्वरूप प्राप्त झाले. या कामगिरीची दखल राज्यासह राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली आहे.
महापौर रवि लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर आणि आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम आणि उप आयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांच्या समन्वयातून महापालिका प्रशासनाकडून शहराच्या स्वच्छता व्यवस्थेत सुधारणा घडविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. आरोग्य विभागाच्या माध्यमातून स्वच्छताविषयक योजनांची अंमलबजावणी, क्षेत्रीय स्तरावरील देखरेख, कचरा व्यवस्थापन आणि नागरिकांमध्ये जनजागृती यावर विशेष भर देण्यात आला आहे.
*कचरा व्यवस्थापनाला व्यापक स्वरूप:*
शहरातील कचरा व्यवस्थापन हा स्वच्छता मोहिमेचा केंद्रबिंदू मानून ओला, सुका, सॅनिटरी आणि विशेष काळजीयोग्य कचरा स्वतंत्रपणे संकलित करण्यापासून त्यावर योग्य प्रक्रिया करण्यापर्यंतची व्यवस्था अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याचबरोबर पुनर्वापर आणि पुनर्चक्रीकरणाला चालना देण्यासाठी आर.आर.आर. केंद्रांच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात आले. वापरण्यायोग्य वस्तूंचा पुनर्वापर, पर्यावरणपूरक उपक्रम आणि कचऱ्यापासून संसाधननिर्मिती यांसारख्या संकल्पनांना प्रोत्साहन देण्यात आले.
सार्वजनिक ठिकाणे, रस्ते, उद्याने आणि नागरी सुविधांच्या परिसरात स्वच्छता राखण्याबरोबरच नागरिकांमध्ये कचरा व्यवस्थापनाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी विविध मोहिमा राबविण्यात आल्या. स्वच्छतेचे नियम केवळ अभियानापुरते मर्यादित न राहता त्यांचे दैनंदिन जीवनात पालन व्हावे, यासाठी गृहनिर्माण संस्था, स्वयंसेवी संस्था आणि विविध सामाजिक घटकांना या प्रक्रियेत सहभागी करून घेण्यात आले.
*विभागीय समन्वयातून अंमलबजावणीला गती:*
शहराच्या स्वच्छतेचे काम केवळ आरोग्य विभागापुरते मर्यादित नसून, त्यासाठी महापालिकेच्या विविध विभागांची भूमिका महत्त्वाची ठरली. त्यामध्ये जलनिस्सारण, पाणीपुरवठा, स्थापत्य, विद्युत, पर्यावरण आणि उद्यान विभागांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील कामांमधून स्वच्छता व्यवस्थेला पूरक योगदान दिले. सार्वजनिक सुविधांची देखभाल, परिसराचे सुशोभीकरण, पर्यावरण संवर्धन आणि नागरी पायाभूत सुविधांची गुणवत्ता यांसारख्या बाबींचाही शहराच्या एकूण स्वच्छता व्यवस्थेवर परिणाम होत असतो. त्यामुळे विविध विभागांमध्ये समन्वय साधून कामकाजाची दिशा निश्चित करण्यात आली.
क्षेत्रीय स्तरावर सहायक आरोग्य अधिकारी, मुख्य आरोग्य निरीक्षक आणि आरोग्य निरीक्षक यांनी स्वच्छता कामांचे नियोजन व देखरेख केली. प्रत्यक्ष रस्त्यांवर, सार्वजनिक ठिकाणी आणि निवासी परिसरात काम करणाऱ्या सफाई सेवकांनी या संपूर्ण व्यवस्थेच्या अंमलबजावणीत अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या नियमित आणि सातत्यपूर्ण कामामुळे शहराच्या स्वच्छतेचे चक्र सुरळीत ठेवणे शक्य झाले.
*सफाई सेवकांच्या श्रमांचे राष्ट्रीय स्तरावर मोल:*
शहराची स्वच्छता व्यवस्था सक्षम करण्यासाठी प्रशासकीय नियोजन आणि प्रभावी अंमलबजावणी जितकी महत्त्वाची आहे, तितकेच प्रत्यक्ष मैदानावर काम करणाऱ्या सफाई सेवकांचे योगदानही मोलाचे आहे. ऊन, वारा, पाऊस अशा कोणत्याही परिस्थितीत अहोरात्र सेवा बजावत रस्ते, सार्वजनिक ठिकाणे आणि नागरी परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी सफाई सेवक सातत्याने पार पाडत आहेत. त्यांच्या समर्पित वृत्तीमुळे आणि अथक परिश्रमांमुळेच स्वच्छताविषयक उपक्रमांना प्रत्यक्ष यश मिळत आहे.
*स्वच्छतेची जबाबदारी नागरिकांनीही स्वीकारली:*
महापालिकेच्या यंत्रणेने केलेल्या प्रयत्नांना नागरिकांच्या सहकार्याची जोड मिळणे हे या कामगिरीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य ठरले. घरातूनच कचऱ्याचे वर्गीकरण करणे, कचरा रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी न टाकणे, पुनर्वापरयोग्य वस्तूंचा योग्य विनियोग करणे आणि परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी पुढाकार घेणे, अशा कृतींमधून नागरिकांनी स्वच्छता मोहिमेला बळ दिले. स्वच्छता ही केवळ महापालिकेची सेवा नसून, शहराच्या सामूहिक जीवनशैलीचा भाग व्हावी, या दृष्टीने जनजागृतीचे प्रयत्न करण्यात आले.
महापौर रवि लांडगे म्हणाले, “पिंपरी चिंचवड महापालिकेला मिळालेला महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांकाचा बहुमान हा शहराच्या सामूहिक प्रयत्नांचा गौरव आहे. शहराच्या विकासात स्वच्छतेला मूलभूत स्थान असून, त्यासाठी प्रशासनाबरोबरच नागरिकांचीही सक्रिय भूमिका आवश्यक आहे. स्वच्छता सेवकांच्या श्रमांचा सन्मान आणि नागरिकांच्या सहभागातून मिळालेला हा पुरस्कार शहराच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे. राज्यात प्रथम क्रमांक मिळविण्याबरोबरच राष्ट्रीय स्तरावरही शहराच्या कामगिरीची दखल घेतली गेली आहे. आगामी काळातही स्वच्छतेच्या बाबतीत अधिक चांगले मानदंड निर्माण करण्यासाठी आणि शहराचे हे स्थान कायम राखण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू.”
आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी म्हणाले, “स्वच्छ सर्वेक्षणातील महाराष्ट्र राज्यात मिळालेला प्रथम क्रमांक हा पिंपरी चिंचवड शहराच्या स्वच्छता व्यवस्थेत गेल्या काही काळात सातत्याने घडवून आणलेल्या सकारात्मक बदलांची आणि सामूहिक प्रयत्नांची राष्ट्रीय स्तरावर मिळालेली पोचपावती आहे. शहराची स्वच्छता व्यवस्था अधिक सक्षम, शिस्तबद्ध आणि परिणामकारक करण्यासाठी महापालिका प्रशासनाने नियोजनबद्ध कार्यपद्धती, प्रभावी अंमलबजावणी आणि विविध विभागांमधील समन्वयावर विशेष भर दिला. कचऱ्याचे उगमस्थानी वर्गीकरण, नियमित संकलन, शास्त्रोक्त प्रक्रिया, पुनर्वापर आणि सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता या बाबींची काटेकोर अंमलबजावणी करण्यासोबतच तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि क्षेत्रीय स्तरावरील देखरेख अधिक सक्षम करण्यात आली.
या संपूर्ण प्रक्रियेत अहोरात्र परिश्रम घेणाऱ्या सफाई सेवकांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यांच्या समर्पित सेवेमुळेच शहराची स्वच्छता व्यवस्था सातत्याने कार्यरत राहिली. त्याचबरोबर नागरिक, गृहनिर्माण संस्था, स्वयंसेवी संस्था आणि विविध सामाजिक घटकांचा सक्रिय सहभाग वाढविण्यावर भर देण्यात आला. स्वच्छता ही केवळ महापालिकेची जबाबदारी न राहता प्रत्येक नागरिकाच्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग व्हावी आणि त्यातून स्वच्छतेची लोकचळवळ उभी राहावी, या उद्देशाने विविध उपक्रम राबविण्यात आले.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्राप्त झालेला हा राष्ट्रीय सन्मान संपूर्ण महापालिका यंत्रणेच्या, सफाई सेवकांच्या आणि स्वच्छतेसाठी योगदान देणाऱ्या प्रत्येक नागरिकाच्या सामूहिक प्रयत्नांचा गौरव आहे. हा पुरस्कार आमच्यासाठी केवळ अभिमानाची बाब नसून, भविष्यात अधिक उच्च दर्जाची स्वच्छता व्यवस्था निर्माण करण्याची जबाबदारी आणि प्रेरणाही आहे. राज्यातील प्रथम क्रमांकाचे स्थान कायम राखण्यासोबतच पिंपरी चिंचवड शहराला स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत कचरा व्यवस्थापनाच्या क्षेत्रात देशासाठी आदर्श ठरविण्याच्या दिशेने महापालिका प्रशासन सातत्याने प्रयत्नशील राहील.”
अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम म्हणाले, “शहराच्या स्वच्छता व्यवस्थेत अपेक्षित परिणाम साधण्यासाठी नियोजन आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी यांच्यात समन्वय असणे आवश्यक आहे. महापालिकेच्या विविध विभागांनी आपापली जबाबदारी प्रभावीपणे पार पाडल्याने स्वच्छताविषयक कामांना गती मिळाली. मात्र, या संपूर्ण प्रक्रियेत शहरातील सफाई सेवकांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. रस्ते, सार्वजनिक ठिकाणे, निवासी परिसर आणि नागरी सुविधांच्या ठिकाणी स्वच्छता राखण्यासाठी सफाई सेवक अहोरात्र परिश्रम घेत असतात. ऊन, वारा, पाऊस अशा कोणत्याही परिस्थितीत त्यांनी आपली सेवा अखंडपणे सुरू ठेवली आहे. त्यांच्या समर्पित वृत्तीमुळे, मेहनतीमुळे आणि नियमित सेवेमुळेच स्वच्छता व्यवस्थेतील सुधारणा प्रत्यक्षात आणणे शक्य झाले. त्यांच्या या कष्टांची आणि योगदानाची राष्ट्रीय स्तरावर मिळालेल्या पुरस्काराच्या माध्यमातून दखल घेतली जाणे ही अभिमानाची बाब आहे. हा पुरस्कार म्हणजे महापालिका प्रशासनासह प्रत्येक सफाई सेवकाच्या श्रमांचा सन्मान आहे. राष्ट्रीय पुरस्कारामुळे या कामाला नवी दिशा आणि अधिक चांगली कामगिरी करण्याची प्रेरणा मिळाली आहे.”
उप आयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल म्हणाले, “स्वच्छता व्यवस्थेचे यश हे प्रत्यक्ष काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर आणि नागरिकांच्या सहकार्यावर अवलंबून असते. कचऱ्याचे योग्य वर्गीकरण, वेळेत संकलन, सार्वजनिक परिसराची निगा आणि स्वच्छतेविषयी नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करणे या बाबींची अंमलबजावणी आरोग्य विभागाच्या माध्यमातून सातत्याने करण्यात आली. सफाई सेवकांच्या योगदानामुळे आणि नागरिकांच्या सहकार्यामुळे शहराच्या स्वच्छता व्यवस्थेत सकारात्मक बदल घडविता आले. या प्रयत्नांना राष्ट्रीय पुरस्काराच्या रूपाने मिळालेली दखल निश्चितच समाधानकारक आहे.”
महाराष्ट्र राज्यातील प्रथम क्रमांकाचा बहुमान हा पिंपरी चिंचवडच्या स्वच्छता व्यवस्थेतील प्रगतीची दखल घेणारा महत्त्वपूर्ण सन्मान मानला जात आहे. मात्र, या यशावर समाधान न मानता शहरातील स्वच्छतेचा दर्जा अधिक उंचावणे, तो सातत्याने कायम राखणे आणि स्वच्छता व्यवस्थेत नवनवीन सुधारणा घडवून आणणे, यावर महापालिका प्रशासनाचा भर राहणार आहे. स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत कचरा व्यवस्थापनाच्या माध्यमातून शहराचे नागरी जीवनमान अधिक उंचावण्याच्या दिशेने हा सन्मान प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास महापालिका प्रशासनाने व्यक्त केला.
