पिंपरी, ३ फेब्रुवारी (प्रतिनिधी): नवी सांगवी, सांगवी, पिंपळेगुरवमध्ये सुरळीत, स्वच्छ आणि व्यवस्थित पाणीपुरवठा होण्यासाठी या परिसरात २० लाख लिटर क्षमतेची नवीन पाण्याची टाकी उभारण्याबाबतच्या सूचना आमदार शंकर जगताप यांनी पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाला दिल्या आहे. किवळे, रावेत, मामुर्डी आणि पुनावळ्यातील आरक्षणे ताब्यात घेऊन रस्त्यांसह ”पब्लिक अमेनिटीज” विकसित करणे. शहरातील 17 हजाराहून जास्त नोंद असलेल्या टपरी, पथारी व्यवसायिकांना हॉकर्स झोन तात्काळ उपलब्ध करून द्यावे असे देखील आमदार जगताप यांनी सांगितले आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील विविध विकास कामे, पाणीपुरवठा तसेच नवे उपक्रम, प्रकल्प या दृष्टीने महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांची नुकतीच आमदार शंकर जगताप यांची भेट घेतली. विविध विकासकामांच्या दृष्टीने त्यांनी प्रशासनाला यावेळी सूचना केल्या आहेत.
यावेळी आमदार जगताप म्हणाले, सांगवी, जुनी सांगवी, पिंपळे गुरव या भागात पाणीपुरवठा स्वच्छ, सुरळीत आणि सक्षम रीतीने करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करणे आवश्यक आहे. हा परिसर प्रचंड वेगाने वाढत आहे. नागरीकरण देखील मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्या दृष्टीने पाणी साठवणुकीची क्षमता वाढवणे गरजेचे आहे. ज्या माध्यमातून या परिसराला व्यवस्थित आणि सुरळीत पाणीपुरवठा करता येईल. या परिसराचा पाणीपुरवठ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी सांगवी आणि औंध उरो रुग्णालयाच्या परिसरात २० लाख लिटर क्षमतेची नवीन पाण्याची टाकी उभारण्याबाबत आग्रही भूमिका आहे . या परिसराचा पाणीपुरवठ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी सांगवी परिसरात पाण्याच्या नव्या टाक्या उभारल्यास पाण्याचा प्रश्न सुटेल असा दावा जगताप यांनी केला आहे. याशिवाय इतरत्र या परिसरात पाण्याच्या टाकीसाठी आरक्षण विकसित करावे . या पार्श्वभूमीवर या परिसरातील पाणीपुरवठा नियमित, सुरळीत, पुरेसा आणि वेळेत करण्यासाठी तातडीने आवश्यक तांत्रिक उपाययोजना राबवाव्यात, तसेच संबंधित विभागास स्पष्ट निर्देश द्यावेत असे आमदार शंकर जगताप यांनी म्हटले आहे.
——————————-
उद्योग महर्षी रतन टाटा यांच्या स्मृतिप्रित्यर्थ ऑटोमोबाइल म्युझियम
उद्योग महर्षी रतन टाटा यांच्या स्मृतिप्रित्यर्थ ”ऑटोमोबाइल म्युझियम” संभाजीनगर येथील बर्ड व्हॅली उद्यानसमोरील मोकळ्या जागेत उभारण्यात येणार आहे. उद्योग नगरीतील सर्व मोठ्या कंपन्यांना त्यांचे दालन उभारण्यासाठी या ठिकाणी मदत होणार आहे. उद्योग महर्षी रतन टाटा यांचे उद्योग नगरीतील सुनियोजित स्मारक उभारणे व औद्योगिक स्मारक उभारणे या संदर्भात बैठकीत चर्चा करण्यात आली. याबरोबरच पिंपळे सौदागर, रावेत परिसरात डाकसेवेच्या पोस्ट ऑफिससाठी जागा उपलब्ध करून देणे. चिंचवडमध्ये रिलिजियस व्हिलेज आणि पिंपळे सौदागर येथे शहरी अर्बन व्हिलेजच्या धर्तीवर संकल्पना राबवण्यात यावी. किवळे, रावेत, मामुर्डी येथील आरक्षणे तातडीने विकसित करण्यासाठी ताब्यात घेतली जावीत. पिंपळसौदागर, थेरगाव येथे पोस्ट ऑफिस आणि पोलीस स्टेशनसाठी जागा उपलब्ध करून द्यावी, सांगवी येथे फुटओवर ब्रिज, पालिका बाजारच्या धरतीवर कोकणे चौक विकसित करण्यात यावा. अशा सूचना देखील आमदार शंकर जगताप यांनी केले आहे.
————————————
चिंचवड मतदार संघामधील प्रश्नांसंदर्भात आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या सोबत बैठक पडली. यामध्ये प्रामुख्याने पाण्याच्या प्रश्नसंदर्भात आयुक्तांशी चर्चा केली. सांगवी, नवी सांगवी परिसरामध्ये पाण्याच्या नव्या टाक्या उभारून नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा व्हावा यासाठी प्रयत्नशील आहोत. आगामी काळात पाणीपुरवठ्याच्या नियोजनाबाबत कालबद्ध कार्यक्रम आखला गेला आहे. याशिवाय पिंपरी चिंचवड मधील विविध उपक्रम, प्रकल्प आणि नव्या योजना या संदर्भात वेळोवेळी पाठपुरावा केला जाणार आहे.
शंकर जगताप आमदार, चिंचवड विधानसभा मतदारसंघ
——————————————
