सातारा : सातारा माझी मायभूमी आहे. मायभूमीच्या संस्कारामुळे मला भारत विकास ग्रुप (बीव्हीजी) या संस्थेची स्थापना करण्याची प्रेरणा मिळाली. बीव्हीजीचा विस्तार देश भरात झालाय, आता बीव्हीजी मला जगभरात पोहचवायची आहे. केंद्र शासनाच्या कौशल्य विकास विभागा सोबत बीव्हीजीचा करार झाला आहे. त्यामुळे जर्मन, जपानी भाषा येणाऱ्या युवकांना रोजगाराची संधी निर्माण झाली आहे. सातारा भूषण पुरस्काराच्या रूपाने मला बीव्हीजीचा विस्तार जगभरात करण्याची शबासकी मिळाली असल्याचे मत बीव्हीजीचे चेअरमन हणमंतराव गायकवाड यांनी व्यक्त केले.
स्वच्छता हीच सेवा या वृत्तीतून लाखो गरीब भारतीयांना रोजगार देणाऱ्या हणमंतराव गायकवाड यांना सातारा भूषण पुरस्कार पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते समर्थ सदनात झालेल्या कार्यक्रमात प्रदान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. समारंभास जेष्ठ शास्त्रज्ञ राजेंद्र शेंडे, रयत शिक्षण संस्थेचे डॉ. अनिल पाटील, माजी नगराध्यक्ष डॉ. अच्युत गोडबोले उपस्थित होते.
देसाई म्हणाले, ” बीव्हीजी व हणमंतराव गायकवाड हे दोन ब्रँड झाले आहेत. भारतभरात कुठे ही गेल्यानंतर बीव्हीजी हे नाव पहायलाच मिळते. नवउद्योजक घडवण्यासाठी गायकवाड पुढकार घेत आहेत. ग्रामीण भागातील युवकांना रोजगार देण्यासाठी गायकवाड यांनी अथक परिश्रम घेतले आहेत. गोडबोले ट्रस्टने पुरस्कार देण्यासाठी योग्य व्यक्तीची निवड केली आहे.”