पिंपरी : “सरदार वल्लभभाई पटेल हे अत्यंत थोर मुत्सद्दी प्रशासक होते. त्यांनी भारत नावाच्या स्वप्नाला जीवनाचा उद्देश बनविले होते. पोलादी, धाडसी, करारी, कठोर, बुद्धिमानी, दृढनिश्चयी, वाक्चतुर, विनोदी अशा बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे धनी, असा त्यांचा स्वभावविशेष होता. ते स्वातंत्र्यलढ्यातील कोहिनूर हिर्‍यासारखे होते!” असे प्रतिपादन सरदार पटेल यांच्या जीवनचरित्र्याचे संशोधक पंकज पाटील यांनी सुदर्शननगर, पिंपळे गुरव येथे रविवार, दिनांक १५ डिसेंबर २०२४ रोजी केले. लेवा पाटीदार मित्रमंडळ, सांगवी यांच्यावतीने लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन कार्यक्रमात अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना पंकज पाटील बोलत होते. यावेळी माजी नगरसेविका शारदा सोनवणे, खानदेश मंडळाचे अध्यक्ष उमेश बोरसे, लेवा पाटीदार मित्रमंडळाचे अध्यक्ष भागवत झोपे, संजय भंगाळे, राजेंद्र इंगळे, शकुंतला पेटकर यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी शारदा सोनवणे आणि उमेश बोरसे यांनीदेखील अभिवादनपर मनोगते व्यक्त केलीत.

अध्यक्षीय मनोगतात पंकज पाटील पुढे म्हणाले की, “सरदारश्री लढवय्ये सेनापती, सैनिक आणि देशाचे पाईक होते. या महान देशाचे सुपुत्र आणि प्राण होते. त्यांच्या लढ्याला अंत नव्हता. बारडोलीच्या शेतसाऱ्याच्या लढ्यात त्यांनी शेतकऱ्यांच्या स्वाभिमानाला जागे करून त्यांची अस्मिता जागृत केली. साराबंदी एक निमित्त होते. जोपर्यंत आपली मातृभूमी स्वतंत्र होणार नाही, तोपर्यंत अव्याहत लढून युद्ध करणे त्यांचे ध्येय होते. त्यांच्या लढ्यावर समस्त देशाची भिस्त अवलंबून होती. स्वातंत्र्यापूर्वी राष्ट्रीय चळवळीत त्यांनी खूप मोठी बाजू सांभाळली. स्वातंत्र्यानंतरही भारताला सुसंघटित करून भारतीय राज्यव्यवस्थेला स्थैर्य प्राप्त करून दिले. त्यांनी ब्रिटिशांच्या तावडीतून नागरिकांची सुटका केली. नागरिकांना स्वावलंबी बनवले आणि खेड्यांना संघटित केले!”

मंडळाचे अध्यक्ष भागवत झोपे यांनी प्रास्ताविक केले. उद्योजिका ऊर्मिला पाटील यांनी सूत्रसंचालन केले. मंडळाचे सचिव महेश बोरोले यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अशोक तळेले, कृष्णाजी खडसे, रामदास दहीवळेकर आणि सुमन दिघे यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *