सरसंघचालक डॉ.मोहनजी भागवत यांच्या हस्ते होणार उद्घाटन

पंडित संजीव अभ्यंकर, पंडित जयतीर्थ मेवूंडी, बेला शेंडे, शाहीद परवेझ, पं.राजस उपाध्ये, पं.विजय घाटे यांचा घडणार संगीत आविष्कार

पद्मविभूषण डॉ.रघुनाथ माशेलकर यांना श्री मोरया गोसावी महाराज जीवन गौरव पुरस्कार जाहीर

चिंचवड, दि.13 डिसेंबर – श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी महाराज संजीवन समाधी सोहळा 17 डिसेंबर ते 21 डिसेंबर 2024 या कालावधीत चिंचवड येथे साजरा होणार आहे. या निमित्ताने चिंचवड देवस्थान ट्रस्ट, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि चिंचवड ग्रामस्थांच्या वतीने धार्मिक कार्यक्रम व उपशास्त्रीय व सुगम संगीत, तसेच व्याख्यान, आरोग्य व रक्तदान शिबिरांसह विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. संजीवन समाधी सोहळ्याचे यंदाचे ४६३ वे वर्ष आहे.

याबाबतची माहिती ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदार महाराज देव यांनी आज (गुरुवारी) पत्रकार परिषदेत दिली. त्यावेळी चिंचवड देवस्थानचे विश्वस्त ॲड. राजेंद्र उमाप, जितेंद्र देव, केशव विद्वांस, ॲड. देवराज डहाळे, माजी महापौर अपर्णा डोके, माजी नगरसेवक राजेंद्र गावडे, मोरेश्वर शेडगे, अश्विनी चिंचवडे, सुरेश भोईर आदी उपस्थित होते.

महोत्सवाचे उद्‍‍घाटन व सन २०२५ च्या दिनदर्शिकेचे अनावरण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या शुभहस्ते 17 डिसेंबरला सायंकाळी 5.30 वाजता होणार आहे. याप्रसंगी महापालिका आयुक्त शेखर सिंह, धर्मदाय सहआयुक्त रजनी क्षीरसागर, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे तसेच खासदार श्रीरंग बारणे, डॉ.अमोल कोल्हे, आमदार शंकर जगताप, महेश लांडगे, अण्णा बनसोडे, उमा खापरे, अमित गोरखे, बापूसाहेब पठारे, आळंदीतील संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे मुख्य विश्वस्त ॲड. राजेंद्र उमाप, देहूतील संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे, श्री मार्तंड मल्हारी संस्थान जेजुरीचे मुख्य विश्वस्त अभिजित देवकाते तसेच चिंचवड देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त जितेंद्र देव, केशव विद्वांस, ॲड. राजेंद्र उमाप, ॲड. देवराज डहाळे आदी यावेळी उपस्थित राहणार आहेत.

महोत्सवानिमित्त दि. 17 ते 21 डिसेंबर या कालावधीत रोज सकाळी 6 वाजता नितीन दैठणकर यांचे महासाधू श्री मोरया गोसावी महाराज संजीवन समाधी मंदिर येथे व श्री तुकाराम दैठणकर यांचे श्रीमंगलमूर्ती वाडा येथे सनई-चौघडा वादन होईल. सकाळी 8.30 वाजता श्री मोरया गोसावी महाराज चरित्र पठण, सकाळी 9 ते 12 या वेळेत वेदमूर्ती रबडे गुरुजी यांचा लक्ष्मी-नारायण याग होईल. सकाळी 9 ते सायंकाळी 6 या वेळेत रक्तदान शिबिर, नेत्र व दंत चिकित्सा आणि आरोग्य शिबिर होईल.

17 डिसेंबर रोजी सायंकाळी 5.30 वाजता संजीवन समाधी सोहळ्याचे उद्घाटन होईल. सायंकाळी 7.45 वा. अपर्णाताई कुलकर्णी यांचे “स्वातंत्र्यवीर सावरकर” या विषयावर व्याख्यान होणार आहे. सायंकाळी 8.30 वा. पं. संजीव अभ्यंकर यांचा “स्वरसंजीवन” हा गायनाचा कार्यक्रम होईल.

18 डिसेंबर रोजी सकाळी 6.15 वा. श्रींची महापूजा संपन्न होईल, सकाळी 7 वा. सामूहिक अथर्वशीर्ष पठण सकाळी 9 वा. दरम्यान सामूहिक अभिषेक, 9 ते 4 वा. नेत्र व दंत चिकित्सा शिबिर होईल. दुपारी 12 ते 4 या वेळेत स्थानिक मंडळाचा भजन सेवेचे कार्यक्रम, सायंकाळी 4 वा. शरदबुवा घाग यांचे कीर्तन होईल. सायंकाळी 6 वा. महासाधू श्री मोरया गोसावी महाराज यांनी रचलेल्या पदांवर आधारित “माझ्या मोरयाचा धर्म जागो” हा कार्यक्रम होणार आहे, सायंकाळी 8.30 वा. पं. जयतीर्थ मेवूंडी व सहकलाकार यांचा “भक्ती संगीत व अभंगवाणीचा” कार्यक्रम होणार आहे.

19 डिसेंबर रोजी सकाळी 6 वा. श्रींची महाआरती होणार आहे, सकाळी 9 वा. श्री सुक्त पठण होईल. 9 ते 4 दरम्यान आरोग्य व दंत चिकित्सा शिबिर होईल. दुपारी 12 ते 4 या वेळेत स्थानिक मंडळाचा भजन सेवेचे कार्यक्रम, सायंकाळी 4 वा. श्री शरदबुवा घाग यांचे कीर्तन होईल. सायंकाळी 6 वा. श्री अविनाश धर्माधिकारी यांचे ‘टिळक पर्व’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. रात्री 8.30 वाजता बेला शेंडे व सहकलाकार सुगम संगीताचा कार्यक्रम सादर करणार आहेत.

20 डिसेंबर रोजी सकाळी 6 वा सोहम् योग साधना मंडळाचे शिबिर होईल. सकाळी 9 ते 5 दरम्यान आरोग्य व रक्तदान शिबिर होईल. सायंकाळी 6 ते 8 दरम्यान श्री मोरया गोसावी महाराज जीवन गौरव पुरस्कार पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांना पंडितप्रवर गणेश्वरशास्त्री द्राविड आणि चिंचवड देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त मंडळ यांच्या शुभहस्ते देण्यात येणार आहे. तर, रात्री 8.30 वा. पं. शाहीद परवेझ – सतार, पं. राजस उपाध्ये –व्हायोलीन, पं. विजय घाटे – तबला यांचा कार्यक्रम होईल.

21 डिसेंबर रोजी पहाटे 4.30 वाजता महासाधू श्री मोरया गोसावी महाराज संजीवन समाधीची महापूजा मंदार महाराज देव यांच्या हस्ते होईल. सकाळी 6 वाजता सनई चौघडा वादन, सकाळी 7 वाजता श्री मोरया गोसावी महाराज संजीवन समाधी मंदिरावर पुष्पवृष्टी होईल. यानंतर श्रींची नगरप्रदक्षिणा संपन्न होईल. सकाळी 9.30 वा. हभप पुरुषोत्तम दादा पाटील यांचे संजीवन समाधी सोहळ्याचे कीर्तन होईल. त्यानंतर श्री मोरया गोसावी महाराज चरित्र पठण होईल. दुपारी 12 वाजता महाप्रसाद आणि सायंकाळी 6 वा. श्री मोरया गोसावी महाराज संजीवन समाधी मंदिरात मानवंदना होईल. सायं. 7 वा. भव्य आतिषबाजी संपन्न होईल. रात्री 10 वाजता श्री मोरया गोसावी महाराज संजीवन समाधी समोर धुपारती व त्यानंतर श्री मंगलमूर्ती वाडा येथे धुपारती होईल. त्यानंतर महोत्सवाची सांगता होईल. या सर्व धार्मिक कार्यक्रमांना मोरया भक्तांनी उपस्थित राहण्याचे आवाहन विश्वस्त मंडळांने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *