अविनाश पाटलांनी विकसन करारनामाच्या नावाखाली खरेदीखताचा घातला गंडा
पिंपरी, दि. 6 – पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीलगतच्या हिंजवडी परिसरात जमीन वादातून गंभीर स्वरूपाचे आरोप समोर आले आहेत. हुलावळे कुटुंबीयांनी काही व्यक्तींविरुद्ध न्यायालयीन प्रकरणे मागे घेण्यासाठी दबाव टाकणे, जमीन ताब्यात देण्यास भाग पाडणे, तसेच जीवे मारण्याच्या धमक्या देणे अशा गंभीर आरोपांसह खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करत थेट पोलिस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे.
फिर्यादी विशाल दत्तात्रय हुलावळे, विवेक अर्जुन हुलावळे व अर्जुन महतु हुलावळे (रा. हिंजवडी, ता. मुळशी) यांनी दिलेल्या निवेदनानुसार, त्यांच्या कुटुंबीयांच्या मालकीची गट क्र. ६० अशी शेतीजमीन असून, त्याबाबत दिवाणी न्यायालयात विविध दावे प्रलंबित आहेत. संबंधित जमीन प्रकरणी काही आरोपींनी खोटे व बेकायदेशीर कागदपत्रे तयार करून फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच चुकीची व दिशाभूल करणारी कागदपत्रे सादर करून न्यायालयात दावे दाखल करण्यात आल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
फिर्यादींच्या म्हणण्यानुसार, त्यांनी कधीही संपूर्ण जमीन ताब्यात देण्यास संमती दिलेली नसताना काही आरोपींनी ७/१२ उताऱ्यावर स्वतःच्या नावाची नोंद करून घेतली. या प्रकरणी संबंधित खरेदीखत रद्द करण्यासाठी दिवाणी न्यायालय तसेच महसूल न्यायालयात अपील प्रलंबित आहे.
मे २०२५ मध्ये फिर्यादी घरात नसताना ३ ते ४ अज्ञात इसमांनी घरी जाऊन कुटुंबीयांना दमबाजी केल्याचा आरोप आहे. “जमिनींचा ताबा आम्ही लवकरच घेणार; आडवे आल्यास खोट्या गुन्ह्यात अडकवू,” अशी धमकी देत पोलिसांशी ‘सेटिंग’ असल्याचे सांगण्यात आल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.
तसेच या सातत्यपूर्ण दबावामुळे कै. दत्तात्रय म्हातु हुलावळे यांचा १० सप्टेंबर २०२४ रोजी मृत्यू झाला असून, कै. काळुराम म्हातु हुलावळे यांचाही संशयास्पद मृत्यू झाल्याचा आरोप फिर्यादींनी केला आहे. या दोन्ही मृत्यूंस संबंधित आरोपी जबाबदार असल्याचे सांगत त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
फिर्यादींच्या मते, संबंधित जमीन सध्या त्यांच्या प्रत्यक्ष ताब्यात असून तेथे बोअरवेल, वीजजोडणी, बांधकाम तसेच लिव्ह अँड लायसेन्स करारानुसार काही भाडेकरू वास्तव्यास आहेत. न्यायालयीन प्रक्रिया सुरू असतानाही जबरदस्तीने ताबा घेण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
पोलिसांकडे अविनाश गणपत पाटील, विजय विष्णू प्रसाद मर्दा, मयूर वसंतलाल शेठिया, श्रीपाद विमलचंद मेहता दत्तात्रय मारुती मोरे यांच्यावर यापूर्वी तक्रार करूनही योग्य ती कारवाई होत नसल्याने अखेर पोलिस आयुक्तांकडे लेखी निवेदन सादर करण्यात आले आहे. संबंधित आरोपी आर्थिक व राजकीयदृष्ट्या प्रभावशाली असून पोलिसांवर दबाव टाकत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
दरम्यान, अहिल्यानगर येथील डॉक्टरांना कित्येक कोटींचा गंडा घालणाऱ्या विजय मर्दा वर फसवणुकीचे गुन्हे ही दाखल आहेत आणि त्या प्रकरणी त्यांना अटक ही झाली होती. अविनाश गणपत पाटील, मयूर वसंतलाल शेठिया, श्रीपाद विमलचंद मेहता दत्तात्रय मारुती मोरे अशा आरोपीस जीवे मारण्याची धमकी, फसवणूक, जबरदस्ती, तसेच मृत्यूस कारणीभूत ठरणे यासंदर्भात गंभीर त्याच्यावर गुन्हे दाखल करून सखोल चौकशी करावी आणि कठोर कारवाई करावी, आणि आम्हाला न्याय मिळावा अशी मागणी हुलावळे कुटुंबीयांनी केली आहे.
