पिंपरी, दि. ४ मार्च २०२६ : दिव्यांग बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी उभारण्यात आलेल्या दिव्यांग भवन तसेच उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या विविध साहित्य-साधनांचा दिव्यांग विद्यार्थ्यांनी शिक्षण, कौशल्यविकास आणि व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी प्रभावीपणे उपयोग करून घ्यावा, असे आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या उपमहापौर शर्मिला बाबर यांनी केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षण विभाग – समावेशित शिक्षण आणि रांजणगाव येथील फियाट इंडिया ऑटोमोबाईल प्रा. लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी येथील कर्मवीर भाऊराव पाटील प्राथमिक शाळेत सीएसआर सक्षम उपक्रमांतर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी कृत्रिम अवयव व साहित्य वाटप उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या.

या कार्यक्रमास शिक्षण विभागाच्या शिक्षण सभापती रविना आंगोळकर, नगरसदस्य संदीप वाघेरे, डब्बु असवानी, निकिता कदम, प्रियंका कुदळे, माजी महापौर शकुतलाताई घराडे यांच्यासह महापालिका उपायुक्त ममता शिंदे, प्रशासन अधिकारी संगीता बांगर तसेच १३१ दिव्यांग विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

साहित्य वाटप शिबिरात १३१ विद्यार्थ्यांना १३ प्रकारची व एकूण १६६ साहित्य-साधनांचे वाटप करण्यात आले. यामध्ये व्हीलचेअर, ब्रेल किट, श्रवणयंत्र, टीएलएम किट, रोलेटर, सीपी चेअर, वॉकर, प्रोग्रामेबल स्मार्टफोन, स्मार्ट केन, कॅलिपर या साहित्य-साधनांचा समावेश होता. २ व ३ डिसेंबर २०२५ रोजी झालेल्या साहित्य वाटप मोजमाप शिबिरात एकूण २५६ दिव्यांग विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी १३१ विद्यार्थ्यांना साहित्य-साधनांची शिफारस करण्यात आली होती.

यावेळी दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी नृत्य तसेच अंध विद्यार्थ्यांनी गीत सादर केले.

यासोबतच समावेशित शिक्षण समन्वयक राजेंद्र पोळके, तसेच विशेष शिक्षक दत्तात्रय खुटवड, कविता ढोरे, संदीप भुजबळ, सचिन अवचिते, रेणुका बिडवई, मंगल गायकवाड, शैला भुजबळ, सोनम साळुंखे, सुजाता गायकवाड, रत्नमाला लोखंडे, जयश्री वाढे, रुपाली देशमुख, माधुरी देशमुख, शोभा कुलकर्णी, कुसुम पाडळे, शुभांगी गोरडे यांनी कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सहकार्य केले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशासन अधिकारी (शिक्षण विभाग) संगीता बांगर यांनी, तर सूत्रसंचालन गणेश लिंगडे यांनी केले.

…..

दिव्यांग विद्यार्थी हे समाजाचा अविभाज्य घटक आहेत. त्यांच्याकडे केवळ सहानुभूतीने न पाहता त्यांना सक्षम नागरिक म्हणून घडविण्याची जबाबदारी पालक, शिक्षक आणि समाजाची आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांमध्येही प्रचंड क्षमता असून योग्य मार्गदर्शन, शिक्षण आणि साधनांची उपलब्धता मिळाल्यास ते स्वतःच्या पायावर उभे राहू शकतात. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

– रविना आंगोळकर, सभापती, शिक्षण समिती, पिंपरी चिंचवड महापालिका

……

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने उभारलेले दिव्यांग भवन हे देशातील पहिले उपक्रमात्मक केंद्र असून दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ते महत्त्वाचे ठरणार आहे. शून्य ते सहा वयोगटात दिव्यांगत्वाचे लवकर निदान आणि योग्य थेरपी मिळाल्यास अनेक मुले मुख्य प्रवाहात येऊ शकतात. त्यामुळे पालकांनी दिव्यांग भवनातील सुविधा आणि उपचारांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा.

– ममता शिंदे, उपायुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *