वाई:- ज्येष्ठ पत्रकार, इतिहास संशोधक,सामाजिक कार्यकर्ते, कवी लेखक शिवाजीराव शिर्के यांच्या “पसरणी गावाची गौरवगाथा” या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ आणि साप्ताहिक पवनेचा प्रवाह दिवाळी अंकाचे प्रकाशन पसरणी गाव ता. वाई, जिल्हा सातारा येथे ह.भ.प. किसनमहाराज चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक श्रीकांत चौगुले होते. या प्रसंगी साप्ताहिक पवनेच्या प्रवाहच्या संपादिका सुमनताई शिर्के, पसरणी गावच्या सरपंच हेमलता गायकवाड, पंचायत समिती सदस्य सुनीता कांबळे, पोलिस निरीक्षक कृष्णनाथ पवार, दिलासा संस्थेचे कार्याध्यक्ष प्रकाश घोरपडे, पसरणी गाव ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष बाळासाहेब शिर्के , प्रवीण प्रकाशनचे प्रवीण शिर्के, साहित्यिक शिरीष पडवळ आदी मान्यवर उपस्थित होते.

भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त त्यांना आदरांजली वाहून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
याप्रसंगी किसनमहाराज चौधरी म्हणाले–‘ लहान मुलांना गावाचा इतिहास समजला पाहिजे.हा दृष्टीकोन समोर ठेवून शिवाजीराव शिर्के यांनी पसरणी गावची गौरवगाथा लिहिली आहे. संत सहज बोलतात, प्रबोधन करतात, आजच्या काळात संतांची विचारधारा लेखकांनी शब्दबद्ध करून समाजमुल्यांची जपणूक केली पाहिजे. माणसाकडे सकारात्मक दृष्टी असली पाहिजे. वाचन, लेखन, मनन आणि चिंतन करणारे लेखक समाज घडवतात.”

पुस्तक प्रकाशनचे अध्यक्ष श्रीकांत चौगुले म्हणाले– ‘माणूस कितीही मोठा झाला, गावापासून दूर गेला तरीही त्याची गावाशी अन गावच्या मातीशी नाळ तुटता कामा नये. प्रत्येक गावाला इतिहास आणि वर्तमान असतो. उज्वल भविष्यासाठी या इतिहासाचे जतन केले पाहिजे. तरुणाईला या इतिहासाची जाणीव करून देणे आवश्यक आहे. स्थानिक इतिहासातूनच देशाचा खरा इतिहास आकाराला येत असतो. त्यासाठी गावमातीचा इतिहास लेखकांनी लिहिला पाहिजे.’
पसरणी गावचे मुख्याध्यापक विष्णू भांगरे यांच्या शाळेच्या ग्रंथालयासाठी पसरणी गावची गौरवगाथा याच्या प्रति भेट म्हणून देण्यात आल्या. ज्येष्ठ नागरिक आणि कोरोना योद्धे यांचा सत्कार करण्यात आला. उत्तम गाढवे,मोहसीन शहा,अमोल महांगडे यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. शब्दधन काव्यमंचचे अध्यक्ष सुरेश कंक यांनी सूत्रसंवाद साधला. तर आभार महादेव महांगडे यांनी मानले. प्रकाश घोरपडे यांच्या भैरवीने कार्यक्रमाची सांगता झाली.

वृत्तांकन– सुरेश कंक
७५२२९०२७२७

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *