थकबाकीदारांना मोठा दिलासा!
मनपा कराच्या विलंब दंडावर तब्बल ९०% सवलत – नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या पाठ्यपुराव्याला मोठे यश

पिंपरी, प्रतिनिधि :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत पुणे महानगरपालिकेच्या धर्तीवर अभय योजना सुरू करण्याची आग्रही मागणी नगरसेवक संदिप वाघेरे यांनी मा. आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांना मागणी केली होती.त्यानुसार आज मनपा कराच्या विलंब दंडावर तब्बल ९०% सवलत देत दिनांक १ मार्च पासून शहरामध्ये अभय योजना लागू करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. या विषयी अधिक माहिती देताना वाघेरे म्हणाले की,शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मालमत्ता कर हा अत्यंत महत्त्वाचा महसूल स्त्रोत असून, रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य सेवा, शिक्षण, स्वच्छता आणि इतर नागरी सुविधा नागरिकांच्या करातूनच उभ्या राहत असतात. वेळेत कर भरणे ही प्रत्येक जबाबदार नागरिकाची कर्तव्यभावना आहे.

आतापर्यंत शहरातील ५ लाखांहून अधिक मालमत्ताधारकांनी प्रतिसाद देत सुमारे ७४७ कोटी रुपयांचा मालमत्ता कर भरला आहे. वसुली मोहिमेला गती देण्यासाठी महापालिकेच्या १८ विभागीय कार्यालयांमार्फत विशेष पथके कार्यरत असून, थकबाकीदारांशी थेट संपर्क साधला जात आहे. तसेच वर्तमानपत्रे, सोशल मिडिया आणि विविध माध्यमांतून जनजागृती करण्यात येत आहे. तथापि, शहरातील सुमारे २ लाख १२ हजार ४४० थकबाकीदारांनी अद्याप थकीत मालमत्ता कर भरलेला नाही. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने थकबाकी वसुलीसाठी विशेष पाऊल उचलले आहे.

१ मार्चपासून ‘अभय योजना’ लागू
कर आकारणी व कर संकलन विभागामार्फत दि. ०१ मार्च २०२६ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत विशेष ‘अभय योजना’ राबविण्यात येत आहे.

या योजनेअंतर्गत —निवासी, बिगरनिवासी, औद्योगिक तसेच मोकळ्या जागांच्या मालमत्तांवरील थकीत मालमत्ता कराची संपूर्ण रक्कम एकरकमी भरल्यास विलंब दंडावर तब्बल ९० टक्के सवलत देण्यात येणार आहे.

आर्थिक वर्ष २०२५-२०२६ मधील थकबाकीसह संपूर्ण देय रक्कम या कालावधीत भरल्यासच सवलतीचा लाभ मिळणार आहे. ही योजना थकबाकीदारांसाठी मोठा आर्थिक दिलासा ठरणार असून, महापालिकेच्या महसूल वाढीस देखील चालना मिळणार आहे.

आयुक्ताना दिलेल्या पत्रात वाघेरे यांनी नमूद केले होते की,अनेक नागरिक आर्थिक अडचणी, कोरोना काळातील परिणाम व इतर कारणांमुळे वेळेत कर भरू शकले नाहीत.विलंब शुल्क व दंडामुळे त्यांच्यावर अतिरिक्त आर्थिक बोजा पडत आहे.पुणे महानगरपालिकेने राबविलेल्या अभय योजनेमुळे मोठ्या प्रमाणावर कर वसुली झाली असून नागरिकांनाही दिलासा मिळाला आहे.याच धर्तीवर पिंपरी-चिंचवडमध्ये योजना लागू केल्यास —करदात्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळेल,प्रलंबित कर वसुली वेगाने होईल,तसेच अंदाजे ९०० ते १००० कोटी रुपयांपर्यंत महसूल जमा होण्याची शक्यता आहे. तसेच वाघेरे यांच्या वतीने सर्व नागरिकाना आवाहन करण्यात आले आहे की,
या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन १ मार्च ते ३१ मार्च २०२६ दरम्यान थकीत मालमत्ता कराचा एकरकमी भरणा करावा आणि ९०% विलंब दंड सवलतीचा लाभ घ्यावा.शहर विकासासाठी आपला कर हा महत्त्वाचा वाटा असून, जबाबदार नागरिक म्हणून वेळेत कर भरणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे असे आवाहन वाघेरे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *