पिंपरी (दिनांक : १९ मार्च २०२२) “हानिकारक रंग उधळण्यापेक्षा पर्यावरणपूरक फुलांची उधळण करून साहित्यिकांनी साजरे केलेले धूलिवंदन निसर्गाला जपण्याचा संदेश देते!” असे विचार ज्येष्ठ साहित्यिक आणि कामगारभूषण राजेंद्र वाघ यांनी श्री संत ज्ञानेश्वर उद्यान, आकुर्डी येथे शुक्रवार, दिनांक १८ मार्च २०२२ रोजी व्यक्त केले.
नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळाने आयोजित केलेल्या ‘रंगात रंगुनी साऱ्या’ या विशेष कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून राजेंद्र वाघ बोलत होते. माजी महापौर शैलजा मोरे, नगरसेविका शर्मिला बाबर, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. तुकाराम पाटील, राजेंद्र घावटे, बाबू डिसोजा, सामाजिक कार्यकर्ते सलीम शिकलगार यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती; तसेच पिंपरी-चिंचवड परिसरातील विविध संस्थांचे पदाधिकारी आणि साहित्यरसिक यांची मोठ्या संख्येने श्रोत्यांमध्ये उपस्थिती होती.
शैलजा मोरे यांनी आपल्या मनोगतातून, “कविता ही जगण्यासाठी मिळालेली ऊर्जा साहित्यिकांकडून आपल्याला मिळत असते. त्यामुळे वय वाढले तरी मनाने चिरतरुण राहता येते!” असे मत मांडले. नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळाचे अध्यक्ष राज अहेरराव यांनी, “सरस्वतीपूजन सर्वत्र केले जाते, मात्र हास्य अन् विडंबन कवितांच्या मैफलीत महाराष्ट्रात विनोदाची रुजवण करणाऱ्या आचार्य अत्रे यांच्या प्रतिमेचे पूजन करणे उचित वाटते!” अशा शब्दांत कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. शर्मिला बाबर यांनी शुभेच्छा दिल्या; तर विनायक गुहे यांनी प्रास्ताविक केले. या प्रसंगी साहित्यिक, सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील विसंगतींचे दर्शन घडविणाऱ्या हास्य अन् विडंबन कवितांचे बहारदार सादरीकरण करण्यात आले. त्यामध्ये शोभा जोशी, राधाबाई वाघमारे, सुहास घुमरे, सविता इंगळे, वर्षा बालगोपाल, मधुश्री ओव्हाळ, प्रशांत पोरे, भरत बारी, अण्णा जोगदंड, मंगला पाटसकर, विनिता श्रीखंडे, जयश्री श्रीखंडे, माधुरी डिसोजा, अरुण कांबळे, राजेंद्र पगारे, विलास रूपटक्के, आनंद मुळुक, सुप्रिया लिमये, सुभाष राणे, ज्योती कानेटकर, अंजली टोणगावकर, अशोक सोनवणे, प्रियंका आचार्य, शंकर नरुटे, कांचन नेवे, रजनी चौधरी, योगेश काळे, रेणुका हजारे, राजेंद्र भगत, भाऊसाहेब गायकवाड, योगिता कोठेकर यांनी सहभाग घेतला. राजेंद्र वाघ पुढे म्हणाले की, “पाण्याचा अपव्यय, हानिकारक वस्तूंचे दहन यामुळे होळीच्या सणाची संस्कृती अन् पारंपरिकता बदलत चालली आहे!” मनोगताचा समारोप करताना गेयकवितांचे सादरीकरण करून त्यांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाच्या संयोजनात पी.बी.शिंदे, संपत शिंदे, रजनी अहेरराव, अशोक कोठारी, अरविंद वाडकर, शरद काणेकर, उज्ज्वला केळकर, वंदना इन्नाणी यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधुरी ओक यांनी तर काव्यमैफलीचे निवेदन माधुरी विधाटे यांनी केले. राज अहेरराव यांनी आभार मानले.