पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या रुग्णालये व आरोग्य केंद्रांमध्ये सुधारणांची अंमलबजावणी होण्यासाठी खासगी गुंतवणूकीद्वारे शहरातील नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा देण्यासंदर्भात सोशल इम्पॅक्ट बॉण्ड करीता महापालिका विचाराधिन आहे, आरोग्य यंत्रणा सुधारणेसाठी ठरवलेली उद्दिष्टे साध्य करण्यासाठी गुंतवणूकदार खाजगी निधी उभारुन ती उद्दिष्टे साध्य केल्यानंतर गुंतवणूकदाराला परतफेड करण्यात येणार आहे. हा भारतातील पहिला सोशल इम्पॅक्ट बॉड राहणार असून ज्या माध्यमातून आरोग्य सेवाकेंद्रांमध्ये सुधारणांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे, यासंदर्भात महापौर माई उर्फ उषा ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली आज आयुक्त कक्षात पदाधिका-यांसोबत “ सोशल इम्पॅक्ट बॉण्ड” सादरीकरणावर चर्चा करण्यात आली. यावेळी, उपमहापौर हिराबाई घुले, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती अध्यक्ष ऍड. नितीन लांडगे, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, शिवसेना गटनेता राहुल कलाटे, आयुक्त राजेश पाटील आदि उपस्थित होते.
“ सोशल इम्पॅक्ट बॉण्ड” चे उद्दिष्टे साध्य केल्यानंतर पिंपरी चिंचवड मनपा ( निधी पुरवठादार ), तांत्रिक सल्लागार ( युएनडीपी ), योजना आणि अंमलबजावणी भागीदार / डिझाइन व इम्पलेमेंटेशन पार्टनर ( पॅलेडियम ), सर्विस प्रोव्हायडर, मॉनिटरिंग अँड इवॅल्यूएशन एजन्सी, गुंतवणूकदार निवडले जातील. सदर प्रकल्पाची उद्दिष्टे निवडणे आणि आरोग्य सेवा केंद्रांच्या बळकटीकरण व सुधारणांसाठी योजनेचे टप्पे निर्धारित करण्याकरीता यूएनडीपीने अनुदान देऊ केले आहे. मूल्यमापन करणे, योजना आखणे, जोखीम घेऊन शकणारे गुंतवणूकदार शोधण्यात मदत करणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकाकरीता प्रकल्प अंमलबजावणी करणे यासाठी यूएनडीपीने स्पर्धात्मक निविदा प्रक्रियेद्वारे पॅलेडियम कन्सल्टिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेडची (” सल्लागार – योजना आणि अंमलबजावणी भागीदार / डिझाइन व इम्पलेमेंटेशन पार्टनर” ) म्हणून नियुक्ती केली आहे. पिंपरी चिंचवड मनपातील आरोग्य सेवाकेंद्रांचे सर्वकष बळकटीकरण करून एनएबीएच प्रमाणित आरोग्य सेवाकेंद्रे म्हणून मान्यता, द्वितीय स्तरावरील इस्पितळात प्रसुतीपूर्व आणि प्रसुतीनंतर लागणाऱ्या सुविधांचे बळकटीकरण करून ह्या सुविधांचा लाभ अधिकतम रुग्णांना मिळवून देणे. वायसीएमएच हॉस्पिटलमध्ये दोन अतिरिक्त शस्त्रक्रिया कक्षांची क्षमता वाढवणे तसेच स्पेशलिटीज व सुपर स्पेशलिटीजवर भर देऊन वायसीएमएच बळकट करणे. ही तीन महत्वाची उद्दिष्टे साध्य करणे अपेक्षित आहे.
ही उद्दिष्टे साध्य झाल्यास पिंपरी चिंचवड महापालिका एनएबीएच मान्यताप्राप्त सार्वजनिक आरोग्य सेवा केंद्रे असणारे भारतातील पहिले शहर / महानगर पालिका ठरणार आहे. रुग्णांचा देखभालीचा उच्च दर्जा आणि रुग्णांच्या सुरक्षिततेत सुधारणा, रुग्णांच्या अधिकारांबद्दल आदर बाळगून त्यांचे संरक्षण करणे, रुग्णांच्या समाधानाचे मूल्यमापन आणि त्यांच्या समाधानामध्ये सुधारणा असे नागरिकांना लाभ होणार आहेत.
पिंपरी चिंचवड मनपाला प्रशिक्षित कर्मचारी वर्ग, निरंतर सुधारणांकरता प्रोत्साहन, गुणवत्तापूर्ण देखभाल आणि रुग्णांच्या सुरक्षिततेसाठीची वचनबद्धता यामुळे आरोग्य निकषांमध्ये प्रगती, जनसमुदायामधे सेवांबद्दल विश्वासाची भावना, एनएबीएच मानके आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळवून देणाऱ्या ISQua द्वारे ( इंटरनॅशनल सोसायटी फॉर क्वालिटी इन हेल्थकेअर ) प्रमाणित आहेत. आरोग्य विमा योजनांच्या माध्यमातून मिळणाऱ्या महसुलात वाढ, एमजेपीजेएवाय आणि आयुष्मान भारत योजनांतर्गत केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या सध्याच्या 80 % भरपाई ऐवजी 100 % भरपाई , ह्यामुळे पिंचिं मनपाच्या महसुलात वाढ, सेवाकेंद्रे, पायाभूत सुविधा आणि देखभालीच्या दर्जाबाबत विश्वसनीय आणि प्रमाणित माहिती उपलब्ध, मल्टीस्पेशालिटी फोकस असणाऱ्या पाच नवीन द्वितीय सेवा रुग्णालयांचे कामकाज जलदगतीने मार्गी लागणे, निरंतर प्रशिक्षण आणि माहिती, काम करण्यासाठी पोषक वातावरण, कर्मचाऱ्यांची कार्यतत्परता, ज्ञान आणि कार्यक्षमता ह्यात पद्धतशीरपणे होणा-या सुधारणा असे लाभ मनपा प्रशासनास होणार आहे.
सोशल इम्पॅक्ट बॉडच्या अंतर्गत अपेक्षित उद्दिष्टे यशस्वीरीत्या साध्य करण्यासाठी ३६ महिन्यांचा ( ३ वर्षे ) इतका कालावधी लागणार आहे.