पिंपरी चिंचवड :- भोसरी येथील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे उद्यानावर मोठ्या प्रमाणात झालेल्या अतिक्रमणाबाबत वारंवार तक्रारी करूनही महापालिकेकडून कोणतीही कारवाई न झाल्याच्या निषेधार्थ सामाजिक न्याय विभागाचे राज्य उपाध्यक्ष चंद्रकांत लोंढे यांनी काल दिनांक ८ ऑक्टोबर २०२५ रोजी महापालिकेच्या मुख्यालयासमोर एक आगळेवेगळे आंदोलन केले.

या आंदोलनावेळी त्यांनी अण्णा भाऊ साठे लिखित ‘फकीरा’ कादंबरी हातात घेतली होती, गळ्यात हार घातला होता आणि अण्णाभाऊंच्या वेशभूषेत न्यायाची मागणी करत उभे राहिले होते. “मी केलेल्या मागण्यांना उत्तर द्या” अशा घोषणांनी त्यांनी महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांच्या कार्यालयासमोर धरणे दिले.

दरम्यान, सुरक्षारक्षकांनी चंद्रकांत लोंढे यांना गेटवरच थांबवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या गळ्यातील हारही काढून घेतला. मात्र, लोंढे यांनी ठामपणे आंदोलन सुरू ठेवले. जवळपास एक तास त्यांनी आयुक्त कार्यालयासमोर न्यायासाठी घोषणाबाजी केली.

शेवटी आयुक्त शेखर सिंह यांनी लोंढे यांचे निवेदन स्विकारून संबंधित तक्रारीवर आवश्यक ती कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर त्यांनी आंदोलन स्थगित केले.

भोसरी येथील अण्णा भाऊ साठे उद्यानावर झालेल्या अतिक्रमणांबाबत आणि महापालिकेच्या निष्क्रियतेविरोधात केलेल्या या अनोख्या आंदोलनाने पालिकेच्या वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक समाजातून चंद्रकांत लोंढे यांच्या या धाडसी आंदोलनाचे कौतुक होत आहे.

या वेळी क्रांती गुरु लहुजी वस्ताद साळवे जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष बाबू पाटोळे, क्रांतिवीर विचार मंचाचे संस्थापक अध्यक्ष अविनाश शिंदे तसेच अण्णा भाऊ साठे जयंती महोत्सव कमिटीचे शंकर खवळे आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *