ऑनलाईन अर्ज करण्याचे व्यवस्थापकीय संचालक सुनील वारे यांचे आवाहन…
मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी), मुंबई मार्फत राज्यातील मातंग व तत्सम जातींमधील विद्यार्थ्यांसाठी युपीएससी, एमपीएससी, बँकिंग, पोलीस व सैन्य भरती यांसारख्या विविध स्पर्धा परीक्षांचे नि:शुल्क पूर्व प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. या योजनेचा जास्तीत जास्त पात्र उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आर्टीचे व्यवस्थापकीय संचालक श्री. सुनील वारे यांनी केले आहे.
दिल्ली व महाराष्ट्रातील नामांकित संस्थांमध्ये प्रशिक्षण
महाराष्ट्र राज्यातील पात्र व इच्छुक उमेदवारांसाठी युपीएससी (UPSC), एमपीएससी (MPSC), महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा (MES), न्यायिक सेवा (JMFC), एसएससी (SSC), आयबीपीएस (IBPS), रेल्वे, एलआयसी (LIC), नाबार्ड तसेच पोलीस व सैन्य भरती या स्पर्धा परीक्षांसाठी ६ ते ११ महिने कालावधीचे नि:शुल्क पूर्व प्रशिक्षण खाजगी नामांकित व्यावसायिक संस्थांमार्फत ऑफलाईन दिले जाणार आहे. हे अनिवाशी प्रशिक्षण दिल्ली व महाराष्ट्रातील विविध केंद्रांवर उपलब्ध असेल.
विद्यावेतन व शैक्षणिक साहित्यासाठी आर्थिक मदत:
प्रशिक्षण कालावधीत विद्यार्थ्यांची आर्थिक अडचण भासू नये म्हणून दरमहा १०,००० ते १३,००० रुपये विद्यावेतन (Stipend) दिले जाणार आहे. याशिवाय पुस्तकांचा संच आणि इतर अनुषंगिक खर्चासाठी एकरकमी १३,००० ते १८,००० रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे.
पात्रता आणि निवड प्रक्रिया:
अनुसूचित जातीतील मांग, मातंग, मिनिमादिग, दखनी- मांग, मांग- म्हशी, मदारी, गारुडी, राधेमांग, मांग- गारोडी, मांग- गारुडी, मादगी व मादिगा या समाजातील पदवीधर उमेदवार या योजनेसाठी पात्र आहेत. त्यांनी ऑनलाईन अर्ज केल्यानंतर प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांची निवड सामयिक प्रवेश परीक्षेद्वारे (CET) गुणवत्तेनुसार केली जाईल.
असा करा अर्ज:
पात्र उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळ http://articet2026.cbtexam.in ला भेट देऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत. दरम्यान, महाराष्ट्र शासनाच्या सर्वंकष धोरणानुसार टीआरटीआय संस्थेमार्फत राज्यातील सर्व संशोधन व प्रशिक्षण संस्थांच्या स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण कार्यक्रमांचे संनियंत्रण व अंमलबजावणी केली जाणार असल्याचे श्री. सुनील वारे यांनी सांगितले.
अर्जाचा दिनांक
अर्ज सुरु करण्याचा दिनांक: ०९/०८/२०२६
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक: २३/०८/२०२६
