पिंपरी- पिंपरी चिंचवड शहरात कार्यरत असलेली पद्मश्री नारायण सुर्वे साहित्य कला अकादमी आणि केशवसुत स्मारक समिती मालगुंड यांच्या संयुक्त विद्यमाने केशवसुतांच्या जन्मस्थानी कविता अर्पण सोहळा आणि साहित्य पुरस्कार कार्यक्रम मालगुंड येथे घेण्यात आला. केशवसुत यांच्या प्रतिमेला सुमनांजली अर्पण आणि वृक्षपूजन करण्यात आले.
कवी केशवसुत कवी यांची कविता दीपक चांदणे यांनी सादर करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. याप्रसंगी डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले “कवी केशवसुत हे नव्याने लिहिणा-या कवींचे प्रेरणास्थान आहे. नारायण सुर्वे म्हणतात त्याप्रमाणे कवींचा बाप आहे. स्वातंत्र्य आणि समतेचा जयघोष करणारे केशवसुत कुठल्याही सीमा प्रदेशात मर्यादित होणारे नाहीत. त्यांच्या कार्याचे सतत स्मरण व्हावे म्हणून पद्मश्री मधू मंगेश कर्णिक यांनी मालगुंडला भव्य स्मारक उभारले असून या स्मारकाच्या वतीने मराठीतील कवींचा गौरव केला जातो ही अभिमानास्पद गोष्ट आहे, परंतु साहित्यातील काही लोकांना हे बघवत नाही ते अधूनमधून गरळ ओकत असतात. अशा जीवजंतूंकडे दुर्लक्ष करून पुरूषोत्तम सदाफुले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आपली साहित्य सेवा अखंड चालू ठेवावी.’असे उद्गार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ विचारवंत डॉ श्रीपाल सबनीस यांनी कवी केशवसुत काव्य पुरस्कार वितरण समारंभात बोलताना काढले. व्यासपीठावर केशवसुत स्मारक समितीचे अध्यक्ष गजानन पाटील, मालगुंडच्या सरपंच श्वेता खेऊर ,कवी उध्दव कानडे, कवी जगदीश कदम,अरूण गराडे , केशवसुत स्मारक समितीचे कार्यवाह माधव अंकुलगे, स्वागताध्यक्ष राजेंद्र वाघ उपस्थित होते.
प्रास्ताविक बाजीराव सातपुते यांनी केले. यावेळी पद्मश्री नारायण सुर्वे जीवनगौरव पुरस्कार लेखक आणि कामगार शिक्षक अरुण गराडे यांना प्रदान करण्यात आला. जगदीश कदम, उध्दव कानडे, प्रा.महेश मोरे, प्रा. डॉ.बाळासाहेब लबडे, डॉ. भगवान अंजनीकर, श्रीकांत चौगुले, दिगंबर ढोकले,रवी पाईक, संभाजी मलघे ,स्मिता पाटील, संगीता आरबुने, धनंजय सोलंकर, , श्रीनिवास मस्के यांना केशवसुत पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.शाल, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
याप्रसंगी केशवसुतांना कवितेतून अभिवादन करण्यात आले.
यात महाराष्ट्रातील विविध भागातून आलेल्या कवींनी आपल्या कविता सादर केल्या.त्यामध्ये अभिजित पाटील,माधव पवार, विनायक विघाटे, ललिता सबनीस, संगीता झिंजूरके, श्रीनिवास मस्के, दत्तात्रय खंडाळे, सविता इंगळे, अस्मिता चांदणे,जितेन सोनवणे,अनुज केसरकर,अरूण मोर्य,मनिषा पाटील,मधुश्री ओव्हाळ, शामराव सरकाळे, अमर धोपटकर, प्रभाकर वाघोले, फुलवती जगताप,आत्माराम हारे, सुरेश कंक, संदीप वाघोले, राजेंद्र वाघ,विजय लोंढे यांनी आपल्या कविता सादर केल्या.साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य प्रा.प्रदीप पाटील,वसंत पाटील यांची उपस्थिती होती.
कवी जगदीश कदम, उध्दव कानडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.कवी केशवसुत यांच्या नावाचा पुरस्कार मिळणे हा आपला फार मोठा गौरव असून कवितेच्या संदर्भातील आपली जबाबदारी वाढविणारा हा पुरस्कार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रातिनिधिक स्वरूपात डॉ.भगवान अंजनीकर यांनी मनोगत व्यक्त केले.
“आपण कसल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता केवळ साहित्य सेवेचा भाग म्हणून कवी केशवसुत यांना अभिवादन करण्यासाठी हा कार्यक्रम घेण्याच्या दृष्टीने पुढाकार घेतला.” अशा शब्दांत आपल्या भावना पुरुषोत्तम सदाफुले यांनी व्यक्त केल्या. कामगार भूषण कवी राजेंद्र वाघ यांनी स्वागतपर विचार मांडले. सूत्रसंचालन मानसी चिटणीस केले तर सुरेश कंक यांनी आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जयवंत भोसले, केशवसुत स्मारक समिती मालगुंड संस्थेचे कार्यकर्ते यांनी पुढाकार घेतला.