“मार्कवंत नव्हे तर ज्ञानवंत व्हा.. “- राजेंद्र घावटे
चिंचवड : शाहूनगर येथील शाहू सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन करण्यात आले. व्याख्याते व संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र घावटे यांनी “यश शिखरे गाठताना ….” या विषयावर व्याख्यान झाले. राजेंद्र घावटे म्हणाले की, “केवळ जास्त गुण मिळवले म्हणजे शर्यत जिंकली असे होत नाही. यशस्वितेचे मोजमाप हे परीक्षेतील गुणांवर अवलंबून नसते. मार्कवंत जरूर व्हा , पण गुणवंत होणे जास्त महत्वाचे आहे. जगामध्ये अनेक प्रकारे ज्ञान उपलब्द्ध आहे. मिळवलेल्या ज्ञानावरच माणसाची उंची ठरते. अनेकांनी भौतिक दृष्ट्या कमी गुण मिळवूनही आयुष्यात भव्य दिव्य केले आहे. आयुष्य घडवणारे नेहमी वेगळ्या पद्धतीने विचार करतात. अपयशाने खचून जात नाहीत. पारंपरिक ठराविक अभ्यासक्रमा बरोबरच अनेक वेगळ्या क्षेत्रात कर्तृत्वाच्या संधी उपलब्ध आहेत. असे क्षेत्र निवडा की ज्याचा समाजाला आणि राष्ट्राला उपयोग होईल. कुटुंबाला अभिमान वाटेल असे क्षेत्र निवडा… आवडीचे क्षेत्र निवडले तर पारंगत होणे लवकर साध्य होते.. आणि धन वैभव सन्मान आपोआप चालून येतात. ज्ञानग्रहण, सचोटी, प्रामाणिकपणा, कष्ट, चिकाटी आदी बाबी आयुष्यात पुढे जाण्यासाठी आवश्यक आहेत”. अध्यक्षस्थानी बालकिशन मुत्याल होते. राजगोंडा पाटील, राजाराम वंजारी, गोपाळ सैंधाणे, राजाराम रायकर, दयानंद कांबळे, नरेंद्र जयसिंगपूरे, अनिता पाटील आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक व सूत्रसंचालन राजेंद्र पगारे यांनी केले. मनीषा पाटील यांनी आभारप्रदर्शन केले.