मुरली आणि जिजाबाई नवले या दाम्पत्यास मिळाला मान…
पंढरपूर : महाराष्ट्राचे नूतन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या कुटुंबीयांसह आज (दि. १० जुलै) श्री विठ्ठल आणि श्री रुक्मिणी मातेची आषाढी एकादशीची महापूजा केली. यंदाच्या महापूजेचा मान बीडमधील गेवराई तालक्यातील रुई गावातील मुरली भगवान नवले आणि जिजाबाई मुरली नवले या वारकरी दाम्पत्यास मिळाला. हे दाम्पत्य गेले २० वर्षे पंढरीची वारी करत आहे.
महापूजेच्या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे, वडील संभाजी शिंदे, मुलगा श्रीकांत शिंदे आणि नातू रुद्रांश शिंदे हेसुद्धा उपस्थित होते. शनिवारी (दि.९ जुलै ) पुणे येथून कारने मुख्यमंत्री कुटुंबियांसोबत पंढरपुरात रात्री साडेअकरा वाजता पोहोचले. त्यानंतर शासकीय विश्रामगृहामध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘पर्यावरणाची वारी, पंढरीच्या दारी’ या कार्यक्रमाचा समारोप मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला. आज (दि.१० जुलै) पहाटे अडीच वाजता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा सुरू झाली.
महापूजेनंतर मंदिरात आयोजित कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, “माझ्यासाठी आजचा हा आनंदा दिवस असून १३ कोटी जनतेच्या वतीनं आज मी विठ्ठलाची पूजा केलीय. शेतकरी, कष्टकऱ्यांना सुखी ठेवण्यासाठी पांडुरंगाला मी साकडं घातलंय. राज्यातील कोरोनाचं संकट लवकर दूर होईल, असंही ते म्हणाले. कोरोनाचं संकट गेलं पाहिजे. ते जातंय, परत वाढतंय; पण आता त्याची जाण्याची वेळ आलीये. पांडुरंगाच्या पुण्याईनं हे संकट देखील दूर होईल. या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, माझ्या कार्यकाळात मी वारकऱ्यासांठी विकास आराखडा तयार करणार आहे. स्वच्छ आणि सुविधायुक्त पंढरपूर साकारणार आहे. हे सरकार सर्वसामान्यांचं सरकार आहे, त्यामुळं लागेल ती मदत वारकऱ्यासांठी केली जाईल.