पिंपरी :- “माणसाला कौटुंबिक अन् सामाजिक स्नेह लाभणे, हीच त्याची खरी संपत्ती असते!” असे विचार महाराष्ट्र साहित्य परिषद, भोसरी शाखाध्यक्ष मुरलीधर साठे यांनी एम्पायर इस्टेट, चिंचवड येथे गुरुवार, दिनांक ०५ मे २०२२ रोजी व्यक्त केले.

शब्दधन काव्यमंच आयोजित ‘चला जाऊ ज्येष्ठ साहित्यिकांच्या घरी…’ या उपक्रमांतर्गत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. पी.एस. आगरवाल यांचा सन्मानचिन्ह, ग्रंथ, शाल आणि श्रीफळ प्रदान करून मुरलीधर साठे यांच्या हस्ते हृद्य सन्मान करण्यात आला. सामाजिक कार्यकर्त्या जयश्री साठे, महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले, शब्दधन काव्यमंचाचे संस्थापक- अध्यक्ष सुरेश कंक यांची प्रमुख उपस्थिती होती; तर या सन्मान सोहळ्यात शहरातील ह.भ.प. अशोक गोरे, प्रदीप गांधलीकर, राधाबाई वाघमारे, तानाजी एकोंडे, कैलास भैरट, मधुश्री ओव्हाळ, आनंद मुळुक, शामला पंडित, संगीता सलवाजी हे साहित्यिक सहभागी झाले होते.

सत्काराला उत्तर देताना डॉ. पी.एस. आगरवाल म्हणाले की, “मी स्वतः शून्य आहे; परंतु माझे गुरुजन, विद्यार्थिमित्र आणि समाज यांनी माझ्या जीवनाला किंमत मिळवून दिली. अभ्यासक्रमातील शास्त्रीय सिद्धान्त कवितेच्या माध्यमातून शिकवणारे शिक्षक मला लाभले. त्यांच्या प्रेरणेमुळे विद्यार्थिदशेतच लेखनाचा प्रारंभ झाला. प्रामुख्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि स्वातंत्र्यवीर सावरकर हे माझ्या अभ्यासाचे अन् लेखनाचे विषय आहेत. एका अत्यवस्थ रुग्णाची माझ्या हातून वैद्यकीय सेवा घेण्याची अंतिम इच्छा होती. मी कर्तव्य बजावल्यानंतर तो खडखडीत बरा झाला, हा माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण आहे. ध्येयाने वाटचाल करीत राहिल्याने अष्टांग आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्यपद भूषविण्याची संधी मला मिळाली!”

डॉ. पी.एस. आगरवाल हे अभिनयसम्राट दिलीपकुमार यांचे निस्सीम चाहते असल्याने सुरेश कंक यांनी दिलीपकुमार यांच्या चित्रपटांतील गीतांचे सादरीकरण करून आगळ्यावेगळ्या पद्धतीने कार्यक्रमाचा प्रारंभ केला. सुभाष चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. शोभा जोशी यांनी डॉ. आगरवाल यांच्या व्यक्तिमत्त्वाचे, शिवाजीराव शिर्के यांनी त्यांच्या साहित्यिक वाटचालीचे आणि खुशबू आगरवाल यांनी कौटुंबिक आठवणींचे कथन केले. कार्यक्रमाच्या संयोजनात मदनलाल आगरवाल, सलिता आगरवाल, निशा आगरवाल, सूर्यप्रकाश आगरवाल, सुनीता आगरवाल, शामराव सरकाळे, मुरलीधर दळवी, फुलवती जगताप, दिलीप ओव्हाळ यांनी परिश्रम घेतले. सीमा गांधी यांनी सूत्रसंचालन केले. निशिकांत गुमास्ते यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *