“टेक प्रॉम” आणि “पिक्सफ्लिप टेक्नॉलॉजीज” या दोन्ही स्टार्टअपला परदेशातून मागणी
पिंपरी, ०५ मे २०२२ : पिंपरी चिंचवड महापालिका, स्मार्ट सिटी व ऑटो क्लस्टर डेव्हलपमेंट अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चर यांच्या संयुक्त विद्यमाने पीसीएससी कार्यक्षेत्रात ऑटो क्लस्टर येथे उभारण्यात आलेल्या स्टार्टअप इनक्युबेशन सेंटर आता जागतिक पातळीवर भरारी घेत आहे. इन्क्युबेशन सेंटरमधील “टेक प्रॉम” आणि “पिक्सफ्लिप टेक्नॉलॉजीज” या दोन वेगवेगळया स्टार्टअपला शहरीस्तर, राज्यस्तरासह परदेशातूनही मागणी होत आहे. ऑटोमोटीव्ह इंजिनिअरींग, बायोफार्मा, माहिती तंत्रज्ञान, सेवा क्षेत्र अशा क्षेत्रांमध्ये नवनिर्मिती, सहयोग आणि उद्योजकता आदी क्षेत्रात प्रोत्साहन देण्यासाठी इनक्युबेशन सेंटरचे कामकाज सूरू आहे. ४ स्टार्टअप्सने सुरु झालेला प्रवास आता परदेशापर्यंत पाहोचला आहे. इनक्युबेशनमध्ये अडीच वर्षात ३० स्टार्टअप सक्रीयपणे कार्यरत आहे.
“टेक प्रॉम IOT” आणि “पिक्सफ्लिप टेक्नॉलॉजीज” हे देखील दोन स्टार्टअप त्यातूनच उदयास आलेले आहेत. “टेक प्रॉम IOT” हे सार्वजनिक पार्किंग व्यवस्था अधिक कार्यक्षम बनवण्यासाठी IOT (इंटरनेट ऑफ थिंग्स) तंत्रज्ञानाचा वापराद्वारे अधोरेखीत केलेले पार्किग क्षेत्र वाहन चालकांना सहजपणे सापडेल आणि पार्कींग शोधण्यासाठी लागणारा वेळ वाचून इंधन बचतीस मदत होणार आहे. वाहन पार्किंग करताना वाहनचालकांचे जीवन सुसह्य होण्यास मदत करणारे सेन्सरही ते तयार करीत आहेत. त्याचबरोबर पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात व्यावसायिक जागांवरील पार्कीग क्षेत्र ऍप द्वारे बुकींग करता येणार आहेत. सारंग मोकाशी हे संस्थापक तर अभिषेक बाभूळकर आणि सागर अग्रवाल सहसंस्थापक म्हणून काम पाहत आहेत. “टेक प्रॉम IOT” इनक्यूबेट म्हणून सामील झाले, त्यावेळेस प्रोटोटाइपची पडताळणी करण्याच्या टप्प्यावर ते कार्यरत होते. ऑटोक्लस्टर पार्किंग एरियाच्या मदतीने इन्क्युबेशन सेंटर येथे त्यांना उत्पादन प्रमाणित करण्याची संधी देण्यात आली. या प्रमाणीकरणामुळे त्याचे संभाव्य ग्राहक प्रभावित होवून शहर-आधारित टियर 1 कंपनीकडून पार्किग गाइडन्स सिस्टीम उभारण्याकरीता ऑर्डर मिळाली आहे. पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीकडून स्टार्टअप इन्कयुबेशन सेंटरच्या मार्गदर्शकांचे सहकार्य आणि नेटवर्किंगच्या संधीच्या आधारावर शहरातील नागरिकांसाठी पार्किग व्यवस्था सुकर होवून स्थानिक इकोसिस्टममध्ये रोजगार निर्मीतीस मदत होणार आहे. पिंपरी चिंचवड शहर परिसरात पार्किग व्यवस्था नियोजनासंदर्भात “टेक प्रॉम IOT” द्वारे पुढाकार घेणार आहेत.
“पिक्सफ्लिप टेक्नॉलॉजीज” यापैकीच एक असून सौदागर बर्डे हे कंपनीचे संस्थापक म्हणून काम पाहतात. पिक्सफ्लिप तंत्रज्ञान हे एप्रिल 2021 पासून स्मार्ट सिटी इनक्युबेशन प्रक्रियेअंतर्गत स्टार्टअप आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन शिक्षण प्लॅटफॉर्मच्या क्षेत्रात हे स्टार्टअप काम करीत आहे. जेणेकरून विद्यार्थी परीक्षांसाठी सहज तयारी करू शकतील. या ऑनलाइन प्लॅटफॉर्म व्यतिरिक्त एक तंत्रज्ञान कंपनी म्हणून ते SAS मॉडेल अंतर्गत सॉफ्टवेअर सेवा देखील देत आहेत. पिक्सफ्लिप इनक्यूबेट म्हणून सामील झाले, तेव्हा ऑनलाइन प्लॅटफॉर्मसाठी प्रोटोटाइप बनविण्याच्या टप्प्यावर होते. इनक्युबेशन प्रक्रियेअंतर्गत व्यवसाय मार्गदर्शन आणि नेटवर्किंग मार्गदर्शनातून तयार झालेल्या या ऑनलाइन प्लॅटफॉर्मचे बरेच विद्यार्थी सदस्यत्व-आधारित सेवेचा लाभ घेत आहेत. या स्टार्टअपने विक्रीत मोठी वाढ केली आहे. पुढे जाऊन ऑनलाइन प्लॅटफॉर्मसाठी आंतरराष्ट्रीय स्तर गाठले आहे. या स्टार्टअप ला अमेरिकन टेक्सासमध्ये ट्रॅकींग इंडस्ट्रीज मधून ऑफर मिळाली आहे. तसेच, अमेरिकेतच आयटी क्षेत्रात देखील या स्टार्टअपला मागणी आहे. १५ जणांची टीम या उपक्रमावर काम करीत आहे. हे स्टार्टअप स्थानिक परिसंस्थेत नोकरीच्या संधी देखील निर्माण करत आहे.
पिंपरी चिंचवड स्टार्टअप इनक्युबेशन सेंटर (PCSIC) ने नोव्हेंबर 2019 मध्ये कार्य सुरू केले. महापालिका आयुक्त तथा स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सह मुख्य कार्यकारी अधिकारी निळकंठ पोमण, व्यवस्थापकीय संचालक किरण वैद्य यांच्या नियंत्रणात इनक्युबेशनचे कामकाज सूरू आहे. कंपनी सेक्रेटरी चित्रा पंवार, व्यवस्थापक उदय देव, आदित्य मासरे यांच्यासह १२ मार्गदर्शकांची टीम कार्यरत आहे.
सध्या ३० स्टार्टअप सक्रीयपणे कार्यरत असून लवकरच या संख्येत वाढ होवून ४६ पर्यंत पोहोचेल. सध्यस्थितीत, इनक्युबेशन सेंटरमध्ये, हेल्थकेअर उत्पादने, सार्वजनिक पार्किंगसाठी IOT बेस सेन्सर, लिक्विड डिस्पेंसरसाठी विशेष पेशंट वाल्व तंत्रज्ञान, B2B तसेच B2C साठी संकरित सौर आणि पवन उपाय, विशेष साहित्य चाचणी प्रयोगशाळा, व्यवसायासाठी खाजगी 5G नेटवर्क, EV बॅटरी नियंत्रण प्रणाली, ग्रीन लास्ट माईल डिलिव्हरी, कंपनाने फिरणाऱ्या मशीनची प्रतिबंधात्मक देखभाल, थ्रीडी प्रिंटिंग, कच्च्या मालामध्ये सिंगल यूज प्लास्टिकचे रीसायकल, ब्लू कॉलर जॉब ऑनलाइन अॅप, हरवलेल्या आणि सापडलेल्या वस्तूंसाठी वेब आधारित सेवा, सर्व लहान थेला विक्रेत्यांसाठी लॉजिस्टिक व्यवस्थापन सेवा, विशेष मेटल प्लेटिंग सेवा, 2 व्हीलर गियरलेस बाईक इलेक्ट्रिक बाईकमध्ये रूपांतर, सोशल मीडियासाठी वेब आधारित सेवा, ऑनलाइन अभ्यासासाठी एज्युटेक प्लॅटफॉर्म सेवा, ड्रोनची निर्मिती, B2C साठी आरोग्य सेवा आणि शिक्षण ऑनलाइन उत्पादने, निरोगी आहार पोषण आहार, ऑनलाइन एज्युटेक उत्पादने,मायक्रो फायनान्ससाठी ऑनलाइन प्लॅटफॉर्म, अॅग्रोटेक उत्पादने, उद्योगांसाठी AI बेस प्लॅटफॉर्म, सोशल स्टार्टअपसाठी ऑनलाइन क्राउड फंडिंग प्लॅटफॉर्म, ग्रीन गॅस उत्सर्जनाची बचत ओळखण्यासाठी अॅप बेस सेवा, टेनिंग उद्योगासाठी VR आणि AR बेस सेवा आदी स्टार्टअपचे काम सूरू आहे.
स्टार्टअप इकोसिस्टमला अधिक प्रभावी बनविण्यासाठी १४ स्थानिक संस्था आणि अभियांत्रिकी महाविद्यालयांसोबत सामंजस्य करार करण्यात आले आहे. यामध्ये, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ गणेशखिंड रोड, पुणे, जेएसपीएम (JSPM)चे राजशी शाहू कॉलेज, ताथवडे, डॉ. डीवाय पाटील इन्स्टिट्यूट टेक्नॉलॉजी, पिंपरी, AIC-Pinnacle Entrepreneurship Forum, पुणे, होस्ट इन्स्टिट्यूट इंजिनिअरिंग क्लस्टर, भारतीय युवा शक्ती ट्रस्ट (BYST), पुणे, PCCOE केंद्र, प्राधिकरण, निगडी, MITAOE-EDF आणि MITAOE, IICMR MBA निगडी, जेएसपीएम हडपसर, पुणे, डॉ. डीवाय पाटील इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग आकुर्डी, AIC-MIT ADT इनक्यूबेटर फोरम, नूतन महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी, तळेगाव, पीसीईटी आणि एनएमव्हीपीएमचे नूतन कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड रिसर्च यांचा समावेश आहे.
प्रतिक्रीया….
समाजात उद्योजक वृत्तीला प्रोत्साहन देण्याची आवश्यकता असून स्थानिक महाविद्यालयांसाठी तसेच स्थानिक शाळांसाठी अभ्यास दौ-यांद्वारे विद्यार्थ्यांना उद्योजकतेचे धडे दिले जात आहे. उद्योजक बनण्याची उत्सुकता निर्माण करून स्मार्ट सिटी तसेच पीसीएमसी स्टार्टअप सिटी बनविण्यावर इन्क्युबेशनचा भर आहे, इनक्यूबेट्स तसेच स्टार्टअप्समध्ये आवश्यक ज्ञानासह पिंपरी चिंचवड आणि पुणे क्षेत्रात विविध सत्रे घेतली जातात. तसेच, नवनिर्मीतीसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. विविध क्षेत्रातील गुंतवणूकदारांना आमंत्रित करून स्टार्टअपला सादरीकरणाची संधी दिली जाते. स्टार्टअप इन्क्युबेशन सेंटरद्वारे स्थानिक इकोसिस्टममधील 500+ हून अधिक उद्योजकांना आवश्यक व्यावसायिक ज्ञानाचे धडे देण्यात आले आहेत. “नारी उद्योग 2022” सारख्या विविध ऑफलाइन कार्यक्रमांद्वारे 45+ महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यात आले आहे, असे आयुक्त तथा मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश पाटील यांनी सांगितले.