अ.नगर (प्रतिनिधी) : छत्रपती शिव-शंभुकाळातील ऐतिहासिक कर्तृत्ववान घराण्यातील वंशज मंडळींचा पेडगाव येथील किल्ले धर्मवीरगडच्या शंभुपत्नी महाराणी येसूबाई साहेब अर्थात स्वराज्यनिष्ठवांत श्रीमंत पिलाजीराजे शिर्के व श्रीमंत गणोजीराजे शिर्के यांच्या राजघराणे वंशजांकडून पाहुणचार करण्यात आला.
दिनांक ११ मार्च रोजी धर्मवीर छत्रपती शंभुराजांच्या “३३४ व्या” “पुण्यतिथी” निमित्त मौजे पेडगाव, तालुका श्रीगोंदा , जिल्हा- नगर येथील किल्ले धर्मवीरगडावरील धर्मवीर शंभुराजांच्या “शौर्यस्थळावर” विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, कार्यक्रमास अनेक ऐतिहासिक कर्तृत्ववान घराण्यातील वंशज मंडळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. नियोजित कार्यक्रम समारोपा नंतर वंशज मंडळींनी किल्ले धर्मवीरगड अर्थात मौजे पेडगाव येथील वास्तव्यास असलेल्या ऐतिहासिक राजेशिर्के घराणे वंशजांच्या घरी सदिच्छा भेट दिली.
यावेळी पाहुणे वंशज मंडळींचा श्रीगोंदा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव संपतराव राजे शिर्के, आत्माराम राजे शिर्के व लक्ष्मीकांत राजे शिर्के यांनी राजघराण्याच्या परंपरेनुसार चहापान करत आदर सन्मान केला. याप्रसंगी प्रामुख्याने लखोजी राजे जाधव म्हणजेच राजमाता जिजाऊ साहेब यांचे वंशज सिंदखेडराजा येथील श्री. शिवाजीराजे जाधव, सरनौबत येसाजी कंक यांचे वंशज भोर चे श्री. आकाशराजे कंक , नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांचे वंशज लव्हेरी चे श्री .कुणालजी मालुसरे, शंभुराजांच्या दूधआई धाराऊ गाडे पाटील यांचे वंशज कापूरहोळ चे श्री.अमितजी गाडे पाटील आदींसह अन्य पाहुणे मंडळी उपस्थित होते.