पिंपरी (दिनांक : १३ मार्च २०२२) नुकत्याच झालेल्या जागतिक महिलादिनाचे औचित्य साधून निगडी प्राधिकरणातील रमादेवी सदाशिव वर्टी सभागृह येथे शनिवार, दिनांक १२ मार्च २०२२ रोजी सामाजिक कार्यकर्त्या सरिता साने आणि साहित्यिक ज्योती कानेटकर यांनी शशिकांत कोठावळे प्रस्तुत ‘तुझ्यात जीव रंगला’ या पारंपरिक गण, गवळण आणि लावण्यांच्या बहारदार कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
खास महिलांसाठी असलेल्या या बहुरंगी, बहुढंगी कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सांस्कृतिक कार्यक्रमांना आलेल्या निर्बंधांमुळे कलावंतांचे अर्थचक्र थांबले होते; तसेच कौटुंबिक स्तरावर आलेल्या विविध आपत्तींचा महिलांच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम झाला होता. या गोष्टींचे भान ठेवून सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
त्यामध्ये संगीता लाखे, अर्चना जवळकर, नमिता पाटील, प्राची मुंबईकर या नृत्यांगनांची दिलखेचक नृत्ये, स्वप्निल गायकवाड या कलावंताचे ढोलकी, ताशा, हलगी अशा वाद्यांचे अप्रतिम सादरीकरण, स्वाती शिंदे यांच्या सुरेल आवाजातील पार्श्वगायन आणि त्याला देवराम यांच्या खुमासदार सूत्रसंचालनाची जोड यामुळे हा कार्यक्रम उत्तरोत्तर अतिशय रंगतदार झाला. विशेषतः महिलांनी केलेल्या फर्माईशींमुळे कलाकारदेखील खुलत गेले अन् काही काळ प्रपंचातील आपल्या सर्व व्यथा, विवंचना विसरून महिलांनी मनसोक्त आनंद लुटला.