– माजी महापौर तथा नगरसेवक नितीन काळजे यांचा अभिष्टचिंतन सोहळा
– चऱ्होलीसह समाविष्ट गावातील नागरिकांची कार्यक्रमाला रेकॉर्ड ब्रेक गर्दी
पिंपरी :- कोणतीही अडचण आली कितीही संघर्ष करावा लागला तरी डगमगून जायचे नाही. कारण, आपल्या मागे जनता उभी असते. एकवेळ नेतेमंडळी दूर झाली तरी चालेल. पण,
जनता ज्याच्या पाठीशी आहे त्याला घाबरायचे कारण नसते. आज चऱ्होली येथील उपस्थित जनसमुदाय पाहून नितीन काळजे यांचे काम बोलत आहे. या भागातील विकासकामे हीच भाजपाची ओळख आहे, अशा भावना भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केल्या. तसेच, यापुढे राजकारणात टिकायचे असेल “काम दाखवा आणि मत मागा” अशी परिस्थिती असणार आहे. असा कानमंत्र देखील आमदार लांडगे यांनी भाजपा कार्यकर्त्यांना दिला.
चऱ्होली येथे माजी महापौर तथा नगरसेवक नितीन काळजे यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. चऱ्होली आणि परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त हजेरी लावत कार्यक्रमाची शोभा वाढवली. या कार्यक्रमादरम्यान एक प्रकारे भाजपाचे शक्ती प्रदर्शन पाहायला मिळाले.
यावेळी महापौर माई ढोरे, उपमहापौर हिरानानी घुले, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, माजी महापौर तथा नगरसेवक राहुल जाधव, शिवांजली सखी मंचच्या अध्यक्ष पूजा लांडगे यांच्यासह सर्व नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महेश लांडगे म्हणाले की, नितीन काळजे यांच्या वाढदिवसानिमित्त उपस्थित असलेला जनसमुदाय हा महापौर – नगरसेवक म्हणून केलेल्या लक्षवेधी कामाची पोहोचपावती आहे. ही गर्दी विकत आणलेली नाही. कोणाच्या पाया पडून आणलेले नाही, तर नितीन काळजे यांच्या कामाला दाद म्हणून आलेली आहे. यामुळे कोणतीही अडचण आली. कितीही संघर्ष करावा लागला तरी आपण आपले काम सोडायचे नाही. राजकारणात टिकायचे असेल, तर “काम दाखवा आणि मग मत मागा” अशी परिस्थिती असणार आहे असा कानमंत्रदेखील आमदार लांडगे यांनी पदाधिकारी, कार्यकर्त्यांना दिला.
नितीन काळजे यांनी बफर झोनला न्याय दिला. बफर झोनमध्ये कर घेत असतानाही सुविधा मात्र महापालिका देत नव्हती, अशावेळी महापौर या नात्याने काळजे यांनी या भागांमध्ये सुविधा उपलब्ध करून दिल्या. वडमुखवाडी, डुडुळगाव गंधर्व नगरी यांसारख्या उंच भागाला पाणीपुरवठा होईल, यासाठी सभागृहासमोर विषय मंजूर करून घेतले. हा विकासाचा अजेंडा नागरिक कदापि विसरणार नाहीत, असा विश्वासही आमदार लांडगे यांनी व्यक्त केला.
समाविष्ट गावांचे मागासलेपण भाजपामुळे संपले…!
नितीन काळजे म्हणाले की, एकवेळ अशी परिस्थिती होती की उपनगर, समाविष्ट गाव म्हणून अतिशय मागासलेपण या भागाला प्राप्त झाले होते. मात्र, २०१७ नंतर भाजपाची सत्ता आली आणि एकप्रकारे या उपनगराची वाटचाल शहरीकरणाकडे सुरू झाली. महापालिकेत समाविष्ट असताना देखील पाणी, रस्ते यांसारख्या मूलभूत सुविधांसाठी झगडावे लागत होते.आज येथील रस्ते पाहिले की हे नक्की आपण चऱ्होलीतच आहे का? असा प्रश्न पडतो. आज या रस्त्यांमुळे चऱ्होली गावाला विकास म्हणजे काय हे समजले. जमिनींना सोन्याचा भाव आला आहे. नागरिकांचे राहणीमान, जीवनमान सुधारले आहे. या गावात असे एकही घर सापडणार नाही ज्या घरापर्यंत पाण्याची लाईन पोहोचलेली नाही. हे सर्व करताना या गावातील ग्रामस्थ या पक्षाचे वरिष्ठ अशा सर्वांचा पाठिंबा मिळाला आहे.