मेट्रो प्रकल्प पाहणी दौ-यावरून टिका केल्याने पाटलांचा घेतला खरपूस समाचार…
चर्चेचे गु-हाळ करण्यापेक्षा पिंपरी ते निगडी मेट्रो ‘डीपीआर’ला केंद्राची मंजुरी आणा…
पिंपरी (प्रतिनिधी) – राज्यातील माहविकास आघाडीचे प्रणेते शरद पवार यांनी आज पुणे मेट्रोची ट्रायल घेवून पाहणी केली. पुणे आणि पिंपरी-चिंचवडकरांच्या सुरक्षित प्रवासासाठी मेट्रो किती सक्षम आहे, याचा आढावा त्यांनी प्रत्यक्ष प्रवास करून घेतला. नागरिकांच्या काळजीपोटी वयाची 85 वर्षे गाठणारे पवार साहेब स्वतः तसदी घेतात, ही बाब पुणे आणि पिंपरी-चिंवडकरांसाठी अभिमानास्पद आहे. मात्र, पवार साहेबांच्या पाहणी दौ-याने अस्वस्थ झालेल्या पाटलांनी राजकीय सुडबुध्दीतून टिका केली आहे. टिका करताना आपली राजकीय व सामाजिक उंची तपासून तोलून मापून बोलावे. कोल्हापुरकरांच्या नाराजीच्या पुरात वाहत येऊन पुण्यातील आयत्या मतदार संघावर स्थिरावलेल्या पाटलांनी मेट्रो प्रशासनाला उपदेशाचे डोस पाजण्याची गरज नाही, अशा शब्दांत भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनी पाटील यांचा समाचार घेतला.
स्थानिक नेते, प्रतिनिधी सोडून शरद पवार यांनी मेट्रोची ट्रायल कशासाठी घेतली ? असा सवाल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला. पुण्याचे एवढे आमदार, खासदार, महापौर कुणीही तिथे नाही आणि पवारच मेट्रोची ट्रायल घेण्यासाठी कसे काय जातात, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. मुळात पुणे व पिंपरी-चिंचवडमधील लोकप्रतिनिधींना जनतेची काळजी असली असती तर त्यांनी मेट्रोची पाहणी केव्हाच केली असतील. त्यांना पाहणी करण्यापासून कोणीच रोखलेले नाही. मेट्रोचे काम रखडलेले असताना त्याची दखल भाजपाच्या लोकप्रतिनिधींनी घेतलेली नाही. स्वतः आपण सुध्दा पुण्यातले आमदार असून देखील त्याचा आढावा घेऊन पाठपुरावा केला नाही. म्हणून तर आज पवार साहेबांनी स्वतः लक्ष घालून पुणे व पिंपरी-चिंचवडकरांचा सुरक्षित प्रवास व्हावा, यासाठी मेट्रोच्या कामाचा आढावा घेतला. तसेच, पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी देखील सकाळी सहावाजता मेट्रोच्या कामाची पाहणी केली होती. शहरातील नागरिकांनी देखील दादांच्या कामाचे कौतुक केलेले आहे. नागपूरमध्ये बसून पुण्यातील कामाचा आढावा घेण्याची पध्दत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची नाही. लोकांच्या समस्येचे मुळ शोधून त्याची सोडवणूक होईपर्यंत पाठपुरावा करणे हे पवार घराण्याचे वैशिष्ट्य आहे. यावरून पाटील यांना मिरच्या झोंबायचे कारण नाही, असेही माजी आमदार लांडे यांनी म्हटले आहे.
पुण्यातील मेट्रो प्रकल्पात फेरफटका मारून शरद पवार यांना मेट्रोच्या कामाचे श्रेय लाटायचे होते का, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला. पवारसाहेब असतील किंवा अजितदादा यांनी श्रेयवादाचे राजकारण कधीच केलेले नाही. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील भरीव विकासकामांच्या जोरावर पवारसाहेब आणि अजितदादांनी स्वतःची ख्याती निर्माण केलेली आहे. या दोन्ही शहरातील प्रत्येक नागरिकाला त्याची माहीती आहे. मेट्रो प्रकल्पाचे काम हाती घेण्याचा मान फडणवीसांना मिळाला असला तरी मेट्रोचा ‘डीपीआर’ पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेवर राष्ट्रवादीची सत्ता असताना अजित दादांनी स्वतः लक्ष घालून तयार केलेला आहे. त्यामध्ये दोन्ही शहराच्या पुढील 100 वर्षांच्या भवितव्याचा विचार करून पवार साहेबांनी विदेशी शहरातील मेट्रोच्या तांत्रिक सामग्रीचा अवलंब करण्याचे आदेश दिले होते. त्याचा अंतर्भाव करून ‘डीपीआर’ला गती देण्यात आली. गेल्या तीन वर्षाच्या कार्यकाळात ‘डीपीआर’ आम्ही केला असे कधीही बोलून दाखवले नाही. कारण लोकांच्या सुरक्षित व गतीमान प्रवासासाठी साकारण्यात येत असलेल्या प्रकल्पाला गती मिळावी एवढीच अपेक्षा राष्ट्रवादीच्या प्रत्येक नेत्याने ठेवली. त्यामुळे श्रेयवादावर पाटलांनी कपोलकल्पीत मते मांडण्यापूर्वी आपल्या सदसदविवेक बुध्दीने विचार करावा, असा सल्लाही माजी आमदार लांडे यांनी दिला.
सत्ताधा-यांच्या नाकर्तेपणामुळे प्रस्तावित ‘डीपीआर’ मंजुरीविना पडून – लांडे
पुण्यात आठ आमदार आहे. सहा भाजपचे आमदार आहेत. खासदार बीजेपीचे आहेत. राज्यसभा सभासद प्रकाश जावडेकर बीजेपीचे आहेत. तसेच, पिंपरी-चिंचवडला दोन भाजपचे आमदार व महापौर आहेत. असे असताना मेट्रोच्या ट्रायलसाठी फक्त पवारच का गेले ? असा ही सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला. तथापि, पिंपरी ते निगडी मेट्रोच्या ‘डीपीआर’ला केंद्र सरकारने अद्यापही मंजुरी दिलेली नाही. केंद्रात भाजपाची एकहाती सत्ता आहे. हा ‘डीपीआर’ मंजूर करण्यासाठी पाटील आणि त्यांचे ढिगभर प्रतिनिधी पंतप्रधान मोदी यांच्याकडे पाठपुरावा का करत नाहीत ?. तसेच, पुणे शहराप्रमाणे पिंपरी-चिंचवड शहराची वेगळी ओळख आहे. पुण्यामध्ये मेट्रोचे पुणे मेट्रो असे नामकरण आहे, तसेच पिंपरी-चिंचवडमध्ये सुध्दा पिंपरी-चिंचवड महामेट्रो असे नामकरण करण्यात यावे. यासाठी अनेकदा मागणी करून देखील फडणवीस सरकारच्या कार्यकाळात त्याची दखल घेतली गेली नाही. हा प्रकार म्हणजे पिपंरी-चिंचवडकरांच्या सन्मानावर गदा आणण्याचा प्रयत्न असल्याचे माजी आमदार लांडे यांनी म्हटले आहे.