पिंपरी दि.१७ जानेवारी, २०२२:-  पुणे महामेट्रोच्या अधिका-यांनी पुणे व पिंपरी चिंचवड शहरांचे महापौर, सन्मा. पदाधिकारी यांना कोणत्याही प्रकारची पूर्वकल्पना अथवा माहिती न देता गुप्तपणाने पुणे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालकांनी मेट्रोची ट्रायल रन घेतली. त्यांच्या या कामकाजातून दुटप्पीपणाची भूमिका व वागणूक दिली जात असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. सध्या राज्यासह संपूर्ण जगावर कोरोना संकटाचे गडद सावट असताना अशा परिस्थितीत पुणे मेट्रोची ट्रायल रन घेणे कितपत योग्य व रास्त आहे यासंबंधी महामेट्रोचा हेतू व उद्देशाबाबत शंका निर्माण होत असल्याचे महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी सांगितले.

पुणे महामेट्रो हा प्रकल्प मुळातच केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून साकारला जात असताना तसेच कोणत्याही स्वरुपाचे राजकीय शिष्टाचार न पाळता स्वारगेट ते पिंपरी या मेट्रो मार्गिकेचे काम हे अंतिम टप्प्यात असून मेट्रोच्या कामाबद्दलची माहिती ही परस्पर देण्यात आलेली आहे.

तसेच आपला देश हा लोकशाही प्रधान असून वैधानिक पदावरील व्यक्तींना विश्वासात घेऊन चालण्याची आपली परंपरा राहिलेली आहे. तरी देखील पुणे तसेच पिंपरी चिंचवड शहरातील स्थानिक सन्मा. लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता कोणत्याही प्रकारचे वैधानिक पद नसलेल्या तसेच ठराविक पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांना डोळ्यासमोर ठेऊन महामेट्रोचा मनमानी कारभार सुरु असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. त्यामुळे आपल्या लोकशाही परंपरेला छेद देणारी पुणे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालकांची संपूर्ण कृती ही लोकशाहीचा अवमान करणारी आहे. त्यामुळे महामेट्रोच्या  संपूर्ण गलथान व गैरजबाबदार कारभाराबद्दल आम्ही असमाधानी असून त्याबद्दल लवकरच केंद्र व राज्य शासनाकडे महानगरपालिकेच्या वतीने तक्रार करण्यात येणार असुन पुणे महामेट्रोच्या कामकाजाबद्दल आम्ही  नाराज असल्याने त्यांचा  निषेध करीत आहोत. असेही महापौर माई ढोरे म्हणाल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *