– पिंपरी-चिंचवड महापालिका उद्यान विभागाचे उपायुक्त सुभाष इंगळे यांना मागणी
पिंपरी । प्रतिनिधी :- चिखली आणि परिसरात मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांच्या कडेला असलेल्या झाडांच्या फांद्या वाढलेल्या आहेत. त्यामुळे वाहतुकीस अडथळाहोत आहे. महापालिका प्रशासनाने सदरफांद्या हटवाव्यात, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विनायक (आबा ) मोरे यांनी केली आहे.
याबाबत पिंपरी-चिंचवड महापालिका उद्यान विभागाचे उपायुक्त सुभाष इंगळे यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, चिखली परिसरात रस्त्यांच्या बाजूला मोठमोठी झाडे आहेत. काही झाडे खूप जुनी आहेत. त्यामुळे या झाडांच्या फांद्या अचानक रस्त्यावर पडतात. रस्त्यावर पार्क केलेल्या वाहनांवर, नागरिकांच्या अंगावर झाडाच्या मोठ्या फांद्या पडून आर्थिक व जीवित हानी होण्याचा धोका आहे.
चिखली ते सोनवणे वस्ती औद्योगिक वसाहतीला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावरील दादा महाराज नाटेकर आश्रमा समोरील रस्त्यावर एका मोठ्या झाडाची फांदी तुटून रस्त्यावर पडली. सुदैवाने यात कोणतीही हानी झाली नाही. मात्र अशा घटनांमुळे मोठी हानी होण्याचा धोका आहे.
वाढलेल्या मोठ्या झाडांचे सर्वेक्षण करून अस्ताव्यस्त वाढलेल्या फांद्यांची वेळोवेळी छाटणी करणे गरजेचे आहे. महापालिकेच्या वृक्षसंवर्धन विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणीही विनायक मोरे यांनी केली आहे.