– महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन
पिंपरी :- पिंपरी-चिंचवड शहरात डेंगीचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी माजी महापौर तथा नगरसेवक नितीन काळजे यांनी केली आहे.
याबाबत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, महापालिका प्रशासनाने कोरोना पहिली आणि दुसरी लाट रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले. तिसऱ्या लाटेची तयारीही सुरू आहे. मात्र, सध्या शहरात डेंगीच्या रुग्चे प्रमाण वाढताना दिसत आहे. गेल्या दीड महिन्यात शहरात ३२ रुग्ण डेंगीमुळे बाधित झाल्याचे महापालिकेच्या आकडेवारीरुन दिसत आहे. त्यामुळे शहरात जनजागृतीसह ठोस उपाययोजना करणे अपेक्षीत आहे.
काळेवाडी, रहाटणी, थेरगाव, वाल्हेकरवाडी, बालाजीनगर, लांडेवाडी आदी भागांत झोपडपट्टी आहेत. याठिकाणी सर्वसामान्य कुटुंबात राहणाऱ्या नागरिकांना डेंगीबाबत अद्याप पुरेशी माहिती नाही. अशा भागांमध्ये जनजागृतीसह औषध फवारणी करण्याची गरज आहे. डेंगी व त्यासदृश्य आजाराच्या रुग्णांची संख्या जुनपासून वाढत आहे. जुनमध्ये ३९, जुलै ९९ आणि ऑगस्टमध्ये १५२ संशयित रुग्णांची तपासणी केली. जुलैपर्यंत सहा रुग्ण होते. ऑगस्टमध्ये २६ रुग्णांची भर पडली आहे. शहरात महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय विभागाकडून डेंगीबाबत सर्व्हे करण्यात आले. त्याअंतर्गत जानेवारीपासून आजपर्यंत सुमारे ४०० संशयितांच्या रक्ताचे नमुने प्रयोगशाळेकडे पाठवले आहेते. त्यापैकी ३२ रुग्ण पॉझिटीव्ह आले आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाकडून मिळाली आहे.
त्यामुळे महापालिका प्रशासनाने डेंगीबाबत गांभीर्याने घेण्याची गरज असून, शहरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी आमची मागणी आहे, असेही माजी महापौर काळजे यांनी म्हटले आहे.