– महावितरण भोसरी विभागाचे कार्यकारी अभियंता उदय भोसले यांना निवेदन
पिंपरी :- औद्योगिक पट्टयामध्ये खंडित वीजपुरवठ्यामुळे उद्योजक, व्यावसायिकांना नाहक मन:स्ताप सहन करावा लागत आहे. यापार्श्वभूमीवर महावितरण प्रशासनाने तात्काळ ठोस कार्यवाही करावी, अशी मागणी माजी नगरसेवक शांताराम भालेकर यांनी केली आहे. यावेळी पांडुरंग भालेकरही उपस्थित होते.
याबाबत महावितरण भोसरी विभागाचे कार्यकारी उदय भोसले यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवडमध्ये असणाऱ्या उद्योगधंद्यांमुळे शहराला उद्योगनगरी अशी ओळख आहे. शहरातील तळवडे परिसरात लघु व मध्यम उद्योगांचे मोठे जाळे असून, यामुळे अनेकांना रोजगार प्राप्त झाला आहे. दरम्यान तळवडे येथील ज्योतिबानगर औद्योगीक वसाहतीमध्ये गेल्या काही दिवसांपासून दररोज सायंकाळी वीजपुरवठा खंडित होत आहे. यामुळे लघुउद्योजक हैराण झाले असून ही समस्या महावितरणने तात्काळ सोडवणे आवश्यक ठरत आहे.
तळवडे परिसरातील हजारो लघुउद्योजकांना अनेक समस्यांचा सामना करीत उद्योग चालवावा लागत आहे. काही दिवसांपासून वारंवार खंडीत होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे लघुउद्योजकांसमोर मोठ्या अडचणी निर्माण झाल्याचे चित्र आहे. कोरोना महामारी व इतर अनेक कारणांमुळे अडचणीत सापडलेल्या उद्योजकांच्या अडचणींमध्ये यामुळे भर पडली आहे. महावितरणाच्या सुस्त कारभारामुळे लघुउद्योगांना भुर्दंड सहन करावा लागत आहे. याबाबत अनेक उद्योजकांनी तक्रारीही केल्या आहेत. काही तास वीज पुरवठा खंडित झाल्यास लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. तसेच फक्त कामगारांची मजुरीही हजारोंच्या घरात आहे. हे नुकसान न परवडणारे आहे.
याबाबत उद्योजकांनीही वारंवार तक्रारी, पाठपुरावा आणि निवेदने दिली आहेत. मात्र, परिस्थिती जैसे थे आहे. नियमित वीजबिल भरणाऱ्या लघुउद्योजकांनाही त्रास होत आहे. यामुळे संबंधित महावितरण विभागाकडून तात्काळ उपाययोजना व्हावी. भविष्यात वारंवार वीजपुरवठा खंडित होणार नाही या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. या औद्योगिक परिसरात वीजपुरवठा खंडित झाल्याच्या उद्योजकांकडून तक्रारीअसल्यास त्यावर तात्काळ कार्यवाही करावी. वेळोवेळी आवश्यक ती देखभाल दुरुस्ती करावी. तसेच वीजपुरवठा खंडित होणार नाही याबाबत कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी आहे. मात्र, ही समस्या न सुटल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही माजी नगरसेवक शांताराम भालेकर यांनी दिला आहे.