पिंपरी (दि. 29 सप्टेंबर 2021) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभाग अंतर्गत तीनशेहून जास्त कर्मचारी घंटागाडी पदावर काम करतात. कोरोना काळातही या कर्मचा-यांनी धोका पत्करुन काम केले आहे. या कर्मचा-यांना दिवाळी भेट म्हणून चाळीस हजार रुपये द्यावेत अशी मागणी स्थायी समितीचे अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे यांनी आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे केली आहे अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष अॅड. नितीन लांडगे यांनी प्रसिध्दीस दिली आहे.
बुधवारी (दि. 29 सप्टेंबर) झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ॲड. नितीन लांडगे होते. या बैठकीत विविध पाच कोटी त्रेसष्ट लाख रुपयांच्या विविध विकासकामांना मंजूरी देण्यात आली. मागील वर्षी 2019 – 20 मध्ये या घटांगाडी कर्मचा-यांना तीस हजार आणि 2018 – 19 मध्ये वीस हजार रुपये दिवाळी भेट देण्यात आली होती. बुधवारी झालेल्या बैठकीस 31 पैकी 22 विषयांना मंजूरी देण्यात आली. एैनवेळच्या 9 विषयांना अशा एकूण 31 विषयांना मंजूरी देण्यात आली.
कोरोना कोविड -19 या जागतिक महामारीमुळे मागील दिड वर्षांपासून शाळा ऑनलाईन पध्दतीने सुरु आहेत. ऑनलाईन शिक्षण पध्दतीतील तांत्रिक बाबींची पुर्ण माहिती अनेक शिक्षकांना नसल्याचे यावेळी लक्षात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये अडथळे येत असल्याचे निदर्शनास आले. यासाठी मनपातील सर्व शिक्षकांना ऑनलाईन शिक्षण पध्दतीने तांत्रिक प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. यासाठी मनपाच्या प्राथमिक व माध्यमिक विभागातील पहिल्या टप्प्यात पाचशे शिक्षकांना आधुनिक तंत्रज्ञान वापरुन गुगल क्लास रुम, मायक्रोसॉफ्ट टिम्स, झूम, व्हॉट्स अपच्या माध्यमातून ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी प्रशिक्षित करण्यात येणार आहे. यासाठी ग्लोबल एज्युकेशन अॅण्ड टेक्नॉलॉजी सोल्युशन्स यांना प्रती शिक्षक दोन हजार रुपये प्रमाणे दहा लाख रुपये खर्चास मान्यता देण्यात आली.
सद्गुरुनगर, भोसरी येथिल तलावात दोन दिवसांपुर्वी बुडणा-या दोन मुलांना आयुष तापकीर यांने स्व:ताच्या जीवाची पर्वा न करता वाचविले. आयुष तापकीर याचा स्थायी समितीचे अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे यांनी बुधवारी ‘अग्निपंख’ हे पुस्तक देऊन गौरव केला. तसेच आयुष तापकीर याची ‘राष्ट्रपती बाल शौर्य’ पुरस्कारासाठी शिफारस मनपाच्या वतीने करणार असल्याचेही ॲड. नितीन लांडगे यांनी सांगितले.
————————-