कर्मचारींना मिळणार ८.३३% सानुग्रह अनुदान व अधिक ज्यादा बक्षीस रक्कम रु.२०,०००/- लाभ…
पिंपरी, दिनांक २८ सप्टेंबर २०२१- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचा-यांचे कोरोना संकटाच्या काळातील योगदान तसेच शहराच्या विकासातील योगदान लक्षात घेता प्रथेनुसार त्यांना दिवाळीकरिता देण्यात येणारे ८.३३% सानुग्रह अनुदान व अधिक ज्यादा बक्षीस रक्कम रु.२०,०००/- लाभ देण्याचा निर्णय तसेच पुढील पाच म्हणजेच सन २०२०-२१ ते सन २०२४-२५ वर्षांकरिता नवीन करार करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे महापौर सौ. उषा उर्फ माई ढोरे यांनी आज जाहीर केले.
आज महापौर यांचे दालनात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले, स्थायी समिती सभापती ऍड. नितीन ज्ञानेश्वर लांडगे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, महापालिका आयुक्त राजेश पाटील, तसेच कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे व इतर पदाधिकारी, सहकारी आदि उपस्थित होते.
आगामी दिवाळी सणाच्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील अधिकारी व कर्मचा-यांना प्रथेनुसार द्यावयाचे ८.३३% सानुग्रह अनुदान व अधिक ज्यादा बक्षीस रक्कम रु.२०,०००/- लाभ देण्यात येणार असल्याची माहिती महापौर सौ. उपा उर्फ माई ढोरे व आयुक्त राजेश पाटील यांनी दिली.