सव्विस कोटींच्या विविध विकासकामांना स्थायी समितीत मंजूरी…
पिंपरी (दि. 22 सप्टेंबर 2021) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने पिंपरीमध्ये भव्य दिव्य असा महात्मा जोतीराव फुले यांचा पुतळा उभारला आहे. या पुतळ्याशेजारीच ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचा पुर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार असल्याची माहिती पिंपरी चिंचवड मनपा स्थायी समितीचे अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे यांनी प्रसिध्दीस दिली आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या बुधवारी (दि. 22 सप्टेबर) ऑनलाईन स्थायी समितीच्या बैठकीत सव्वीस कोटीं रुपयांच्या विविध विकासकामांना मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी अॅड. नितीन लांडगे होते.
महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांची कर्मभुमी पुण्यात आहे. गंज पेठेतील त्यांच्या वाड्याचे ‘समताभुमी राष्ट्रीय स्मारक’ तत्कालीन राष्ट्रपती डॉ. शंकर दयाळ शर्मा यांच्या हस्ते 1994 मध्ये राष्ट्राला समर्पित करण्यात आले. यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार आणि महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष विद्यमान मंत्री छगन भुजबळ यांनी पुढाकार घेतला होता. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखो नागरीक पुण्यात येत असतात. यातील अनेक नागरीक पिंपरीतील महात्मा जोतीराव फुले यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास भेट देऊन जातात. शहरातील फुले, शाहू, आंबेडकर अनुयायांची अनेक वर्षांपासून मागणी होती की, येथे ज्ञानजोती सावित्रीबाईंचा पुर्णाकृती पुतळा उभारला जावा. हि मागणी आता लवकरच पुर्ण होईल. यासाठी नऊ कोटी सहासष्ट लाख अठोतीस हजार रुपयांच्या खर्चास बुधवारी (दि. 22 सप्टेंबर) स्थायी समितीच्या सभेत मान्यता देण्यात आली. तसेच या पुतळ्याच्या मागे प्रेरणादायी म्युरल्य उभारण्याकामी आणि सर्व स्थापत्य विषयक कामासाठी 4 कोटी 87 लाख 96 हजार रुपये खर्चासही मान्यता देण्यात आली.
प्रभाग क्र. 10 मध्ये साकारण्यात येणा-या या भव्यदिव्य प्रकल्पामुळे हे स्मारक सर्व नागरीकांना प्रेरणादायी ठरेल व शहराच्या नावलौकिकात भर पडेल. येथे जूना पुतळा व परिसरातील चौथरा व बांधकाम काढून घेणे, नविन चौथरा उभारणे, पुतळ्याशेजारील दोन्ही बाजूस जिना व लिप्टचा गाळा उभारणे व सुशोभिकरणाकरीता पुतळ्यावर घुमट उभारणे. पुतळ्यासमोर 350 लोकांकरिता ओपन एअर थिएटर, स्टेजच्या मागे कलाकारांसाठी विश्रांती कक्ष, बगीचा, ब्रॉंझ मधिल उठाव शिल्प, भिंतीकरीता बांधकाम, पुर्ण परिसरासाठी सिमाभिंत आणि स्वच्छता गृह या स्थापत्य विषयक कामांचा समावेश आहे.
महात्मा जोतीराव फुले पुतळ्याशेजारी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचा पुर्णाकृती पुतळा बसविण्यात येणार आहे. परिसरात फुलेसृष्टी अंतर्गत त्यांच्या जीवनावर आधारित प्रेरणादायी ब्रॉंझ धातूतील 12 फूट x 8 फूट असे 20 म्युरल्स बसविण्यात येणार आहे. लहान अभ्यासक मुलींचे पुतळे, विषयांकित संकल्प उठाव शिल्प भिंतीसमोर अनुरुप ब्रॉंझ धातूंमधिल मानवी पुतळे बसवणे, पुतळ्याच्या दोन्हीही बाजूस विहीर कारंजे, दर्शनी बाजूस ज्ञानज्योती फुल झाडांचा वाफा व परिसरातील सुशोभिकरण करणे आदी गोष्टींचा समावेश आहे अशीही माहिती स्थायी समिती अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे यांनी प्रसिध्दीस दिली आहे.
त्याचबरोबर कोरोना कोविड – 19 च्या तिस-या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन हभप कै. प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरियल हॉस्पिटल आकुर्डी रुग्णालयातील 15 बेडसचा पॅकेजच्या दराने 14 आयसीयु बेडसचे एक पॅकेज करीता एकुण 14 आयसीयु बेडसचे काम चालु करण्यासाठी 62 लाख 72 हजार रुपये खर्चास मान्यता देण्यात आली. तसेच शिक्षण विभागाच्या 105 प्राथमिक शाळा, माध्यमिक विभागाचे 18 माध्यमिक विद्यालय आणि महानगरपालिकेचे 2 औद्योगिक प्रशिक्षण केंद्र (आयटीआय) येथे मनुष्यबळाद्वारे वर्ग खोल्या साफसफाई करण्यासाठी 186 कामगार, यांञिकी पध्दतीने शौचालय व मुता-या साफसफाई करण्यासाठी 46 कामगार व क्षेञीय कार्यालयानुसार 9 सुपरवायझर पुरविणे या कामासाठी 2 वर्षे कालावधीकरिता येणा-या 1 कोटी 9 लाख इतक्या खर्चासही मान्यता देण्यात आली. प्रभाग क्रमांक 25, पुनावळे व प्रभागातील इतर रस्त्यांचे हॉटमिक्स पध्दतीने डांबरीकरण करण्यासाठी येणा-या 48 लाख 16 हजार, कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखणेसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी येणा-या 1 कोटी 4 लाख, प्रभाग क्रमांक 15 मध्ये अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण करण्यासाठी 51 लाख 28 हजार, प्रभाग क्रमांक 14 मध्ये आकुर्डी व परिसरातील स्टॉर्म वॉटर, फुटपाथ विषयक कामे करण्यासाठी 36 लाख 92 हजार, प्रभाग क्रमांक 20 एमआयडीसीतील जनरल ब्लॉक मधील रस्त्यांचे डांबरीकरण करण्यासाठी 53 लाख आणि इतक्या खर्चासही मान्यता देण्यात आली असल्याची माहिती स्थायी समिती अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे यांनी प्रसिध्दीस दिली आहे.