– भाजपा युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अभिनव प्रकाश यांचे प्रतिपादन
– भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष अनुप मोरे यांच्या जनसंपर्क कार्यालयात मेळावा
पिंपरी :- मोदी सरकार आता अधिक खुले, सुलभ आणि पारदर्शक बनले आहे,असा दावा भारतीय जनता युवा मोर्चाचे (भाजयुमो)राष्ट्रीय उपाध्यक्ष अभिनव प्रकाश यांनी सोमवारी (ता.२०) पिंपरी-चिंचवडमध्ये केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ७१ व्या वाढदिवसानिमित्त ‘भाजयुमो’चे प्रदेश उपाध्यक्ष अनुप मोरे यांच्या निगडी प्राधिकरणातील जनसंपर्क कार्यालयात आयोजित ‘नव भारत’ मेळाव्यात ते बोलत होते.
मोदी यांनी गेल्या सात वर्षात केलेल्या कामाचे प्रदर्शन व त्यांच्या सरकारने युवकांसाठी सुरू केलेल्या योजनांची माहिती मिळावी; यासाठी ‘भाजयुमो’ने सेवा आणि समर्पण अभियानांतर्गत हा मेळावा भरविला होता.त्यात नमो ॲपबद्दल माहिती देण्यात आली. केंद्र सरकारच्या विविध योजनांचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी स्थानिक हस्तकला,बचत गटांचे व खाद्य पदार्थांच्या स्टॉलचे प्रदर्शनही भरविण्यात आले होते.भोसरीचे आमदार तथा भाजपचे शहराध्यक्ष महेश लांडगे, भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, उपाध्यक्ष अनुप मोरे, शहराध्यक्ष संकेत चोंधे, सरचिटणीस दिनेश यादव,उपाध्यक्ष प्रसाद कस्पटे, चिटणीस प्रकाश चौधरी, सह संयोजिका सोशल मीडिया प्रियांका शाह, प्रियांका देशमुख, विद्यार्थी आघाडी संयोजक दिगंबर गुजर, नुसूचित आघाडी संयोजक सचिन उदागे आदी उपस्थित होते.
वाढदिवसाचे औचित्य साधत मोदींची स्तुती करताना प्रकाश म्हणाले, वैश्विक नेतृत्व, असामान्य व्यक्तिमत्व आणि जगातील सर्वात सामर्थ्यशाली नेते पंतप्रधान मोदीचे ‘नव भारत’ निर्मितीत मोठे योगदान आहे. मे २०१४ मध्ये मोदींनी पंतप्रधानपदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून देशाने सर्वंकष आणि सर्वसमावेशक विकासाच्या मार्गावर वाटचाल सुरू केली आहे. लोकांशी थेट संपर्काबरोबरच ऑनलाईन संवादामुळे भारताचे सर्वाधिक टेक्नो-सॅव्ही नेते म्हणूनही त्यांची ओळख आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली अभिनव कल्पना आणि उपक्रमांच्या माध्यमातून प्रगतीची चाके जलद गतीने फिरतील.विकासाची फळे प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचतील,असे ते म्हणाले.तर, मोदींनी देशाच्या आर्थिक व्यवस्थेमध्ये प्रत्येक नागरिक सहभागी व्हावा; यासाठी प्रधानमंत्री जन धन योजना आणली. व्यापार सुलभ बनवण्यावर भर देण्याबरोबरच त्यांच्या ‘मेक इन इंडिया’ या आवाहनामुळे गुंतवणूकदार आणि उद्योजकांमध्ये अभूतपूर्व उत्साह संचारला. श्रम सुधारणा आणि ‘श्रमेव जयते’ उपक्रमाअंतर्गत श्रम प्रतिष्ठेमुळे लघु आणि मध्यम उद्योगांमधील अनेक कामगारांचे सशक्तीकरण झाले.कुशल युवकांना देखील प्रोत्साहन मिळाले. केंद्र सरकारने जनतेसाठी तीन सामाजिक सुरक्षा योजना सुरू केल्या.ज्येष्ठांना निवृत्तीवेतन,गरीबांना विम्याचे कवच दिले.जुलै २०१५ रोजी पंतप्रधानांनी ‘डिजिटल इंडिया’ अभियानाचा शुभारंभ केला. जनतेच्या जीवनमानात गुणात्मक बदल करण्यासाठीच्या त्यांच्या योजनांमुळे देश खरोखरच ‘नव भारत’ म्हणून ओळखला जात आहे, असेही पाटील म्हणाले.