पिंपरी (दि. 7 सप्टेंबर 2021) शनिवारी (4 सप्टेंबर) मनपा भवन मधिल शिक्षण मंडळ विभागातून दुपारच्या दरम्यान MH-14-DM-2360 या चारचाकी वाहतूक टेम्पोमधून काहि महत्वाचे दस्तावेज, फाईल मनपा भवन मधून बाहेर घेऊन गेले असल्याचे वृत्त एका स्थानिक माध्यमातून व्हिडीओ चित्रीकरणासह प्रसिध्द झाले आहे. या फाईलचे अनेक गठ्ठे शनिवारी मनपाला सुट्टी असताना बाहेर घेवून जाण्याचे काय कारण आहे या मागे नेमके काय गौडबंगाल आहे हे आयुक्त राजेश पाटील ताबडतोब शोधावे अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष विशाल वाकडकर यांनी आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे. सोमवारी आयुक्तांना पत्र देताना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस विशाल काळभोर, शहर उपाध्यक्ष प्रसाद कोलते, शहर सरचिटणीस प्रतीक साळुंखे उपस्थित होते.
या पत्रात पुढे म्हटले आहे की, आयुक्तांनी पुढील चोविस तासांमध्ये माहिती घेऊन अधिकृत खुलासा करावा. तसेच मनपाच्या शिक्षण मंडळातील गैरकारभाराविषयी मागील वर्षभरात अनेक बातम्या प्रसिध्द झाल्या आहेत. तसेच शिक्षण मंडळाच्या प्रशासन अधिकारी जोत्स्ना शिंदे यांची नुकतीच बदली झाली आहे. या घटनांशी त्या फाईलींचे गठ्ठे मनपा भवन मधून बाहेर नेण्याशी काय संबंध आहे का? या विषयी शहरवासियांच्या मनामध्ये संशय आहे. तरी या विषयी खात्रीकरुन ताबडतोब खुलासा करावा. अन्यथा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस मनपातील तसेच शिक्षण मंडळातील भ्रष्टाचाराविषयी रस्त्यावर उतरुन आंदोलन करेल अशा इशारा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसने दिला आहे. यानंतर उद्भवणा-या परिस्थितीस प्रशासनाचे प्रमुख या नात्याने तुम्ही जबाबदार असाल.
————————-