मानिनी महिला मंडळाच्या वतीने पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांचा नागरी सत्कार

पिंपरी,पुणे (दि. 7 सप्टेंबर 2021) लोकशाही आणि लोककल्याणकारी राज्यामध्ये पोलिस प्रशासन दबाव टाकणारी किंवा लगान वसूल करणारी यंत्रणा नाही. मी सत्याच्या शोधात आहे. ते सत्य शोधता – शोधता सामाजिक व राजकीय कार्यकर्ते, सामाजिक संस्था, संघटना, बातमीदार आणि समाजातील जबाबदार नागरीकांचे मी जाळे जोडले. त्यांच्या माध्यमांतून मला माहिती मिळत गेली आणि माझ्या कल्पनेप्रमाणे काम करीत गेलो. त्यामुळे पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात चांगले काम करता आले. माझा जो नागरी सत्कार झाला तो मी एक प्रतिनिधी आहे हा तुम्हा सर्वांचा सत्कार आहे असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी केले.

सोमवारी (दि. 6 सप्टेंबर) सर्व पक्ष आणि मानिनी महिला मंडळाच्या वतीने पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांचा महापौर माई ढोरे यांच्या हस्ते नागरी सत्कार आचार्य अत्रे सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी महापौर माई ढोरे यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ आणि पगडी देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, माजी आमदार विलास लांडे, कामगार नेते बाबा कांबळे, नगरसेवक सचिन चिखले, पुणे मनपा नगरसेवक प्रशांत म्हस्के, कार्यक्रमाच्या संयोजिका व मानिनी महिला मंडळाच्या अध्यक्षा सुवर्णा डंबाळे, अखिल भारतीय कॉंग्रेसचे सचिव पृथ्वीराज साठे, रिपब्लिकन युवा मोर्चाचे पक्षनेते राहुल डंबाळे, उद्योजक श्रीकांत बडवे आदी उपस्थित होते.

सत्काराला उत्तर देताना पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश म्हणाले की, समाजकंटकांचे निर्दाळण करणे हे पोलिसांचे कर्तव्यच आहे. पोलिस आणि नागरीक एकत्र येऊन आणखी चांगले काम करु शकतात. पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्र पुण्यापेक्षा मोठे आहे. परंतू कर्मचारी संख्या कमी आहे. सर्व सामान्य लोकांची कायदा पालन करण्याची इच्छा असते. मुलांनी चांगले शिक्षण घेऊन चांगला नागरीक बनणे हे उद्दीष्ठ ठेवावे. खाकी वर्दी हा पोलिसांचा धर्म आणि कर्तव्य आहे. मी कर्तव्याचे पालन करणारा असून मागील वर्षात 4700 नागरीकांना मी भेटलो. त्यामुळे मला माणूस ओळखता येतो. गौतम बुध्दांनी सांगितल्याप्रमाणे ‘मै कोई बात करता हू उसपे विश्वास मत करो, मगर ये बात आपके बुध्दी, मन को सही लगे तो ही विश्वास करो’ याप्रमाणे मी वागतो. यावेळी नयन प्रकाश यानी उपस्थितातांच्या वतीने विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना कृष्ण प्रकाश म्हणाले की, मला सेलिब्रेटी व्हायचे नाही. चांगले काम करुन प्रसिध्दी मिळतेच कि, तसेच नेता देखिल व्हायचे नाही. नेता हा प्रत्येक क्षेत्रात असतो. मी पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाचे नेतृत्व करतो आहे असेही कृष्ण प्रकाश म्हणाले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षा महापौर माई ढोरे म्हणाल्या की, कृष्ण प्रकाश यांनी मागील वर्षभरात ज्या धडाडीने काम केले. त्यामुळे शहरातील महिला भगिनींना दिलासा मिळाला आहे. शहरातील जुगार अड्डे बंद झाल्यामुळे कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना कमी झाल्या आहेत. कृष्ण प्रकाश यांचा जन्म दहिहंडीच्या दिवशीचा त्यामुळे त्यांचे नाव कृष्ण ठेवले आहे. अगदि नावाप्रमाणे त्यांचे काम आहे. त्यांच्या पुढील कारकिर्दीस शुभेच्छा.

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले की, गुन्हेगारांना कधीकधी पोलिस खात्यातून पाठबळ मिळते. याला कृष्ण प्रकाश यांनी पायबंद घातला. यांनी केलेले काम पाहून यानंतरच्या येणा-या अधिका-यांना आणखी चांगले काम करावे लागेल. कार्यक्रमाच्या संयोजनात शिवशंकर उबाळे, मेघा आठवले, अजय लोंढे, ज्ञानेश्वर बोराटे, अमोल डंबाळे यांनी सहभाग घेतला.
प्रास्ताविक सुवर्णा डंबाळे, सुत्रसंचालन नयन जयप्रकाश आणि आभार बाबा कांबळे यांनी मानले.
————————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *