दोन लसींचा आणि तपासणी प्रमाणपत्राचा आग्रह नको
पिंपरी (दि. 29 ऑगस्ट 2021) :- जुलै महिण्यात पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी भुस्सखलनाच्या घटना घडल्या. अनेक रस्ते, ओढ्या, नाल्यांवरील पुल वाहुन गेले. यामुळे कोकणातील जनजीवन विस्कळीत झाले होते. 10 सप्टेंबर पासून सुरु होणा-या गणेशोत्सवासाठी पुणे – पिंपरी चिंचवड मधून लाखो नागरीक कोकणात जातील. त्यांना जाण्यासाठी ताम्हिणी घाटातील एकमेव रस्ता सोयीस्कर आहे. परंतू मागील महिण्यातील पावसामुळे या रस्त्याची दूरावस्था झाली आहे. गणेशोत्सवापुर्वी ताम्हिणी घाटातील रस्त्यांची कामे युध्द पातळीवर पुर्ण करावीत अशी मागणी कोकण विकास महासंघाचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे लेखी पत्राव्दारे केली आहे.
कोकण विकास महासंघाच्या वतीने डॉ. कदम यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविलेल्या पत्रात पुढे म्हटले आहे की, मार्च 2020 पासून राज्यात कोरोनाला रोखण्यासाठी अनेकदा पूर्णता व अंशता लॉकडाऊन करण्यात आले. पुणे, पिंपरी चिंचवड मधिल शाळा, महाविद्यालये अद्यापही बंद आहेत. मागील वर्षी कडक लॉकडाऊन असल्यामुळे कोकणवासीयांनी नाईलाजास्तव आपल्या मुळगावी कोकणात जाण्याचे टाळले. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी ब-याच अंशी रुग्णसंख्या कमी झालेली आहे. तसेच अनेक नागरीकांचे लसीकरण झालेले आहे. जुलै महिण्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीवाडीचे नुकसान झाले आहे. शेत जमिनी वाहून गेल्या असून घरांची पडझड झाली आहे. त्याची डागडूजी करणे देखिल आवश्यक आहे.
त्यामुळे सप्टेंबर महिण्याच्या दुस-या आठवड्यात अनेक नागरीक आपल्या मुळगावी कोकणात जातील. पुणे – पिंपरी चिंचवड मधिल नागरीकांना कोकणात जाण्यासाठी ताम्हिणी घाटातील रस्ता सोयीस्कर आहे. या रस्त्यावर अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी खड्डे झाले आहेत. तर ज्या भागात रस्ता सिमेंटचा आहे तेथे साईड पट्टीवरील भराव, खडी वाहून गेलेली आहेत. वाढणा-या वाहतुकीमुळे अपघात होण्याची व वाहतूक विस्कळीत होण्याची भिती आहे. यासाठी युध्द पातळीवर रस्ते दुरुस्त करावेत.
तसेच कोकणात गणेशोत्सवासाठी जाणा-या नागरीकांकडे कोरोना प्रतिबंधक लसींचे दोन डोस घेतल्याचे प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे ही वृत्तपत्राव्दारे जाहिर करण्यात आले आहे. हि अट शिथील करावी. एकतर पुणे – पिंपरी चिंचवडमध्ये लसींचा पुरवठा सुरळीत नाही. लस घेण्यासाठी ऑनलाईन नोंद करावी की ऑफलाईन लस मिळेल याबाबत रोजच नागरीकांमध्ये संभ्रम असतो. त्यासाठी कोकणात जाणा-या नागरीकांसाठी अत्यावश्यक अतीतातडीचीबाब म्हणून सरकारने भूगाव, घोटावडे, पौड, मुळशी या भागातील शाळा व खासगी रुग्णालयांमध्ये अतीरिक्त मनुष्यबळ घेऊन आतापासूनच सकाळी आठ ते सायंकाळी आठ वाजेपर्यंत कोकणात जाणाऱ्या नागरिकांसाठी ऑफलाईन लसीकरण केंद्र सुरु करावेत अशीही मागणी कोकण विकास महासंघाच्यावतीने डॉ. कैलास कदम यांनी केली आहे.
—————————–