पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रवेशव्दारावर धडकला विराट मोर्चा
पिंपरी चिंचवड (प्रतिनिधी) : “भाजपच्या बैलाला पाच टक्के पाहिजे”, “भाजपच्या बैलाला शहर वाटून पाहिजे”, “नही चलेगी, नही चलेगी, टक्केवारी नही चलेगी” अशा जोरदार घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली सत्ताधारी भारतीय जनता पार्टीच्या भ्रष्टाचारी कारभाराविरोधात आज, बुधवारी (दिनांक २५ ऑगस्ट २०२१) पिंपरी-चिंचवड महापालिकेवर विराट मोर्चा काढण्यात आला. पोलिसांनी प्रवेशव्दारावर अडवल्याने ठिय्या मांडून भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ जागरण गोंधळ घालण्यात आला. तर, भाजपच्या भ्रष्ट्राचारी कारभारामुळे महापालिकेवरील नागरिकांचा विश्वास उडालेला असल्याने स्थायी समितीबरोबर महापालिका बरखास्त करण्याची मागणी राज्य सरकारकडे करण्यात आली.
पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर निदर्शने करून पिंपरी चौकापासून मोरवाडी चौक मार्गे महापालिकेवर हाा धडक मोर्चा काढण्यात आला. दरम्यान, पोलिस आणि महापालिका सुरक्षारक्षकांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा मोर्चा महापालिका प्रवेशव्दारावर अडवला. आंदोलक राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पोलिस आणि सुरक्षा अधिका-यांनी आत प्रवेश करू न दिल्याने अखेर लोकशाही मार्गाने प्रवेशव्दारावर ठिय्या आंदोलन सुरू केले. पोतदार, नंदीबैल, वासुदेव, गोंधळी यांच्या आंदोलनातील सहभागाने जागरण गोंधळ घालत भाजपच्या भ्रष्टाचारी व टक्केवारीच्या कारभाराचा निषेध करण्यात आला. आंदोलनात “भ्रष्टाचारी भाजपचा धिक्कार असो”, “स्थायी समिती बरखास्त करा”, महापालिकेत भ्रष्टाचाराचा जोर, भाजपवाले चोर”, “भाजप शहरात कोण लुटेरे, सत्ताधारी भाजप लुटेरे”, “सत्ताधारी दालनात वसुलीचा गल्ला, महापालिका तिजोरीवर भाजपचा डल्ला”, “सत्ताधा-यांच्या दालनात पैशांचा पाऊस, पिंपरी-चिंचवडमध्ये भ्रष्टाचाराचा धुडगूस”, “महापालिकेचा केला वसुली अड्डा, महापालिका तिजोरीचा खड्डा”, अशी जोरदार घोषणाबाजी या आंदोलनात करण्यात आली.
शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या मोर्चामध्ये माजी आमदार विलास लांडे, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, माजी महापौर शकुंतला धराडे, योगेश बहल, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे,भाउसाहेब भोईर, महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर, नगरसेविका वैशाली घोडेकर, पौर्णिमा सोनवणे, नगरसेवक अजित गव्हाणे, मयूर कलाटे, विक्रांत लांडे, उषामाई काळे, पंकज भालेकर, निकिता कदम, मोरेश्वर भोंडवे,संजय वाबळे, माजी नगरसेवक प्रशांत शितोळे, राजेंद्र जगताप, प्रशांत शेट्टी, शमीम पठाण, मुख्य संघटक सचिव अरुण बोऱ्हाडे, तानाजी खाडे, प्रवक्ते फझल शेख, युवक अध्यक्ष विशाल वाकडकर, पिंपरी विधानसभा अध्यक्ष निलेश पांढारकर, चिंचवड विधानसभा अध्यक्ष संदिप चिंचवडे, भोसरी विधानसभा अध्यक्ष उतम आल्हाट, लिगल सेल अध्यक्ष नगरसेवक गोरक्ष लोखंडे, राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी शहराध्यक्ष विजय लोखंडे, युवती शहराध्यक्षा वर्षा जगताप,विद्यार्थी अध्यक्ष यश साने, पदवीधर अध्यक्ष माधव पाटील, सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष विनोद कांबळे, शहर कार्याध्यक्षा पुष्पा शेळके, मनिषा गटकळ, सारिका पवार, संगिता कोकणे, पल्लवी पांढरे, कविता खराडे, गंगा धेंडे उज्वला शेवाळे पक्ष निरीक्षक वैशाली ताई काळभोर, महिला अध्यक्ष, कविता आल्हाट पुणे जिल्हा निरीक्षक, पुष्पा शेळके शहर कार्यध्यक्ष, लता ओव्हाळ, आशा शिंदे,दीपा देशमुख, सविता धुमाळ,स्वप्नाली असोले,वैशाली पवार, मुमताज इनामदार, उज्वला वारींगे, सारिका हारगुडे, निर्मळ माने,ज्योती निंबाळकर, सोनाली जाधव, उषा चिंचवडे, सुवर्णा वाळके,मनीषा जठर, सुप्रिया सरोदे नीता पाटील,यांच्यासह आजी-माजी नगरसेवक आणि पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.
संजोग वाघेरे पाटील म्हणाले की, “महापालिकेत भ्रष्टाचाराची सिमा गाठली आहे. आंदोलनात नंदीबैलानेच पालिकेत भाजपच्या लोकांना किती टक्के पाहिजे ? हे सांगितले. त्या पध्दतीनेच शहरात भाजपचे कारभारी काम करत आहेत. या प्रकारांना राष्ट्रवादी भीक घालणार नाही. स्थायी समिती आणि महापालिका बरखास्त करावी. नगरसेवक, कार्यकर्ते अजितदादांवर प्रेम करणारे आहेत. अजितदादांनी राजीनाम्याचे आदेश दिले. तर एक मिनिटाचा विलंब न करता सर्व नगरसेवक राजीनामे देतील. श्रीमंत महापालिका, बेस्ट आणि स्मार्ट सिटीचा नावलौकिक राष्ट्रवादी काँग्रेसने मिळवून दिला. पण, सत्ताधारी भाजपच्या कारभार आणि वागणुकीमुळे महापालिकेची राज्यात आणि देशात बदनामी झाली. शहराच्या नावलौकिकासाठी महापालिका बरखास्त करून प्रशासक नेमामा, अशी मागणी आहे”.
माजी आमदार विलास लांडे म्हणाले की, “भाजपचे शहरातील कारभारी चाटून पुसून खात आहेत. नागरिकांना भिती वाटू लागली आहे. परंतु, काळजी गरज करण्याची गरज नाही. राज्यात महाविकास आघाडी सरकार आहे. आपले नेते यांच्याकडे सर्व मिळून राजीनामे देऊन टाका आणि त्यांच्या चुकीच्या कामांची चौकशी करण्यासाठी ही महापालिका बरखास्त करण्याची भूमिका आपण मांडू. येत्या काळात आपली सत्ता येथे येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक नंबरचा पक्ष आहे. भाजपचा भ्रष्टाचार लोकांपर्यंत गेलेला आहे. चांगल्या प्रकारे काम करणारे फक्त अजितदादा आहेत. ही टक्केवारी बंद करण्यासाठी ठोस भूमिका घेण्याची गरज निर्माण झाली आहे”.
आंदोलनात राजू मिसाळ, योगेश बहल, प्रशांत शितोळे,गोरक्ष लोखंडे यांनी महापालिकेत सत्ताधारी भाजपकडून सुरू असलेल्या भ्रष्टाचारी कारभारावर टीका केली. हा कारभार हाणून पाडण्याचे आवाहन पदाधिकारी, कार्यकर्त्यांना केले. या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याबाबत वादग्रस्त विधान केल्याबद्दल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा निषेध केला.