पिंपरी (दिनांक : १४ ऑगस्ट २०२१) “समृद्ध जीवनासाठी आजही कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची कविता समजून घेतली पाहिजे! कारण मानवी जीवनाचे तत्त्वज्ञान त्यांनी साध्या, सोप्या शैलीतून सांगितले आहे!” असे विचार बहिणाबाई चौधरी यांच्या कवितांच्या व्यासंगी अभ्यासक प्रा. कमल पाटील यांनी करण जयमाला सोसायटी, जुनी सांगवी येथे शुक्रवार, दिनांक १३ ऑगस्ट २०२१ रोजी व्यक्त केले.
निसर्गकन्या, कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या जयंतीचे (तिथीनुसार) औचित्य साधून भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल प्रतिष्ठान आयोजित कविसंमेलनात प्रमुख पाहुण्या म्हणून प्रा. कमल पाटील बोलत होत्या. पंतप्रधान श्रमवीर पुरस्कारप्राप्त सुभाष चव्हाण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. प्रमुख अतिथी ज्येष्ठ कवी रघुनाथ पाटील यांनी बहिणाबाई चौधरी यांच्या जळगाव येथील निवासस्थानाविषयी माहिती देऊन त्यांच्या ‘योगी आणि सासुरवाशीण’ या अपूर्ण कवितेला आपल्या अष्टाक्षरी काव्यपंक्तींची जोड देत काव्य सादरीकरण केले; तर ज्येष्ठ साहित्यिक श्रीकांत चौगुले यांनी आपल्या मनोगतातून, “बहिणाबाई चौधरी या मौखिक साहित्यपरंपरेतील महत्त्वाच्या कवयित्री होत्या!” असे मत मांडले.
भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल प्रतिष्ठानचे संस्थापक -अध्यक्ष पंकज पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकातून प्रतिष्ठानच्या उपक्रमांची माहिती दिली. त्यानंतर कुमारी देविका पाटील या चिमुरडीच्या नृत्यगीतापासून ते शहात्तर वर्षीय ज्येष्ठ कवी शिवाजीराव शिर्के यांच्या ‘माझी लेखणी’ या कवितेसह तीन पिढ्यातील कवींचा सहभाग असलेल्या कविसंमेलनाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. उत्तरोत्तर रंगत गेलेल्या या कविसंमेलनात सुभाष शहा (रम्य पहाट), शरद शेजवळ (हिंदोळा), निशिकांत गुमास्ते (चल गं राणी गावाकडं जाऊ…), प्रदीप गांधलीकर (माय मन्ही बहिणाई), संगीता झिंजुरके (वाद नसाया पाहिजे!), आत्माराम हारे (दर्शन) या वैविध्यपूर्ण आशयाच्या स्वरचित कवितांचे सुरेल सादरीकरण करण्यात आले; तर संध्या गांधलीकर यांनी बहिणाबाई चौधरी यांच्या ‘आली पंढरी दिंडी’ या कवितेचे अभिवाचन केले. सुभाष चव्हाण यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून, “बहिणाबाई चौधरी या निरक्षर असल्यातरी त्यांना काव्यप्रतिभेची दैवी देणगी लाभली होती. दैववादापेक्षा प्रयत्नवादावर त्यांचा विश्वास होता!” असे मत मांडून ‘माझी बहिणाबाई’ ही स्वरचित कविता सादर केली. ऊर्मिला पाटील, वैशाली चौधरी, रूपचंद पाटील, रोहिणी पाटील, अशोक गोरे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. सुरेश कंक यांनी कार्यक्रमाचे आणि कविसंमेलनाचे बहारदार सूत्रसंचालन केले. महेश बोरोले यांनी आभार मानले.