स्वी. नगरसदस्य दिनेश यादव यांच्या पाठपुराव्याने कुदळवाडीत कोविड लसीकरण केंद्र…

पिंपरी (दि. २८ जून २०२१) :- ‘ फ ‘ प्रभाग स्वीकृत नगरसदस्य दिनेश यादव यांच्या पाठपुराव्यामुळे पालिकेने कुदळवाडीतील मनपा शाळा, श्री भैरवनाथ मंदिर येथे कोविड लसीकरण केंद्र सुरु केले आहे. त्याचे उद्घाटन आमदार महेशदादा लांडगे यांच्या हस्ते सोमवारी (दि. २८) करण्यात आले. या केंद्रावर वय ४५ वर्षापेक्षा जास्त वयोगटामधील लाभार्थ्यांना पहिला व दुसरा कोविड डोस मिळणार आहे.

यावेळी आमदार महेशदादा लांडगे, ‘ फ ‘ प्रभाग स्वीकृत नगरसदस्य दिनेश यादव, आकुर्डी रुग्णालयाच्या ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी सुनिता साळवे, राहुल साळुंखे यांच्यासह इतर कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

आमदार महेशदादा म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून पिंपरी चिंचवड शहरात कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात होती. मात्र ही संख्या पुन्हा वाढताना दिसतेय. तज्ञांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे भाकीत केले आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरात सर्वत्र कोरोना लसीकरण मोहिम राबवली जात आहे. आपण सर्वांनी कोविड डोस घेऊन एकत्रितपणे मिळून आपला देश व शहर कोरोनामुक्त करू. वय ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस मोफत दिली जात आहे. या लसीकरण मोहिमेत पात्र ठरणाऱ्या कुदळवाडी परिसरातील प्रत्येक नागरिकाने सहभागी होऊन लस टोचून घ्यावी.

दिनेश यादव म्हणाले, कुदळवाडीतील लसीकरण केंद्रावर वय ४५ वर्षापेक्षा जास्त वयोगटामधील लाभार्थ्यांना आणि HCW व FLW यांना ‘कोविशिल्ड’ चा पहिला डोस व दुसरा डोस हा पहिल्या डोसनंतर १२ ते १६ आठवडयांच्या दरम्यान (८४ दिवसानंतर ते ११२ दिवसपर्यत) देण्यात येणार आहे. या लसीकरण केंद्रावर सकाळी १०.०० ते सायं. ५.०० या कालावधीत पालिकेने निर्धारित केलेल्या क्षमतेनुसार लाभार्थ्यांना डोस देण्यात येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *