पिंपरी :- पवना नदीच्या किनाऱ्यावरील वाढते प्रदूषण आणि गंगाजलाच्या गणगुणातील ह्रास पाहता ‘गुड मॉर्निंग पथकाची’ पुन्हा निर्मिती करण्यात यावी अशी मागणी चिंचवड विधानसभेचे युवासेना उपशहर प्रमुख सागर शिंदे यांनी केले आहे.

यासंदर्भात सागर शिंदे यांनी पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहरातील जागरूक रहिवासी तथा शिवसेना या पक्षाचा पदाधिकारी म्हणून, शहराच्या पर्यावरण संरक्षणाबाबतची चिंता व्यक्त करीत आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील पवना, मुळानदी व इंद्रायणी नदी ही शहराच्या विकासाची एक महत्त्वपूर्ण ओळख आहे. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये या नदीच्या किनाऱ्यावरील प्रदूषण वाढले असून, नदीचे पाणी गंगाजलासारखे शुद्ध व पवित्र राहण्याऐवजी प्रदूषित झाले आहे. यामुळे शहरवासीयांच्या आरोग्यावर व पर्यावरणावर विपरीत परिणाम होत आहे.

शहरातील वाढत्या शहरीकरणामुळे व डेव्हलपमेंटमुळे परप्रांतीय कामगारांचा प्रचंड मोठा लोंढा काही वर्षापासून शहरात दाखल झाला आहे. हे रहिवासी सर्रासपणे नदी किनाऱ्यालगत शौचास बसतात. तसेच शहरातून पवना, मुळा नदी किनाऱ्यावर औद्योगिक कचरा, घरगुती सांडपाणी, प्लॅस्टिक कचरा व इतर प्रदूषक पदार्थांची वाढ होत आहे. नदीचे पाणी काळे व दुर्गंधीदार झाले असून, माशांच्या मृत्यू, पक्ष्यांच्या संख्येत घट व जलचरांच्या विनाशासारखे दृश्य आम्हाला रोज पाहावे लागत आहेत. पूर्वी नदीचे पाणी पिण्यासाठी योग्य असायचे, पण आता ते सांडपाण्यापेक्षा वेगळे दिसत नाही. हे प्रदूषण शहराच्या प्रतिमेला कलंकित करीत आहे आणि भविष्यातील पिढ्यांसाठी धोकादायक ठरत आहे.

या पार्श्वभूमीवर, पूर्वी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने चालवलेले ‘गुड मॉर्निंग पथक’ हे एक उत्तम उपक्रम होते. हे पथक सकाळी नदी किनाऱ्यावर जाऊन स्वच्छता करीत असे, जागरूकता निर्माण करीत असे व प्रदूषण रोखण्यासाठी कार्यरत राहिले. या पथकामुळे नदीच्या किनाऱ्यावर स्वच्छता व गंगाजलाच्या गणगुणाचे संरक्षण शक्य झाले होते. मात्र, सध्या हे पथक अस्तित्वात नसल्याने प्रदूषण वाढले आहे.

म्हणून शहरातील नदी किनाऱ्यावरील वाढत्या प्रदूषण व गंगाजलाच्या गणगुणातील ह्रास पाहता ‘गुड मॉर्निंग पथकाची’ पुन्हा निर्मिती करण्यात यावी. हे पथक स्वयंसेवक, महानगरपालिका कर्मचारी व स्थानिक रहिवाशांच्या सहभागाने चालवले जावे. यामुळे नदी स्वच्छ होईल, पर्यावरण संरक्षित राहील व शहरवासींना शुद्ध हवा व पाणी मिळेल अशी मागणी सागर शिंदे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *