पिंपरी : ‘अधिकारी महिलांनी समाजातील उपेक्षित महिलांना न्यायाची आणि सन्मानाची वागणूक द्यावी!’ असे आवाहन सामाजिक कार्यकर्त्या कविता बहल यांनी सोहम् सार्वजनिक ग्रंथालय आणि अभ्यासिका, संत तुकारामनगर, पिंपरी येथे शनिवार, दिनांक ०८ मार्च २०२५ रोजी व्यक्त केले. जागतिक महिला दिनानिमित्त ग्रंथालयाच्या वतीने महिला पोलीस कर्मचारी आणि स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थिनी यांचा प्रातिनिधिक सन्मान करताना कविता बहल बोलत होत्या. सोहम् ग्रंथालयाचे संस्थापक – अध्यक्ष जगन्नाथ नेरकर, सचिव प्रदीप बोरसे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

कविता बहल पुढे म्हणाल्या की, ‘एकेकाळी पुरुषांची मक्तेदारी असलेल्या पोलीस खात्यात किरण बेदींसारख्या महिलांनी आपल्या कर्तबगारीने कर्तव्य अन् कर्तृत्वाचे नवीन मानदंड निर्माण केले आहेत. त्याचा आदर्श आताच्या कार्यरत आणि भावी महिला अधिकारी यांनी घ्यावा!’ जगन्नाथ नेरकर यांनी प्रास्ताविकातून ग्रंथालय आणि अद्ययावत अभ्यासिकेची माहिती देऊन, ‘संत मुक्ताई, राजमाता जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, इंदिरा गांधी, भारतरत्न लता मंगेशकर ते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या अशा असंख्य थोर महिलांनी भारताचे नाव जगाच्या इतिहासात उज्ज्वल केले आहे. त्यामुळे क्षेत्र कोणतेही असलेतरी विद्यार्थिनींनी केवळ महिलादिनालाच नव्हे तर नेहमीच समाजातील महिलांचा आदर ठेवून उच्च ध्येयाचे लक्ष्य गाठावे!’ अशी अपेक्षा व्यक्त केली. पोलीस कर्मचारी पल्लवी माने यांनी सत्काराला उत्तर देताना प्रातिनिधिक मनोगतातून, ‘आईवडिलांचा आशीर्वाद, कठोर परिश्रम, नियमित अभ्यास यामुळे निश्चितच अपेक्षित यशप्राप्ती होते!’ अशी भावना व्यक्त केली.
प्रदीप बोरसे यांनी सूत्रसंचालन केले. वर्षा बोरसे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *