महाराणी येसुबाई तथा गणोजीराजे शिर्के यांच्या वंशजांनी घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट…
पुणे (प्रतिनिधी) : नुकताच छावा हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला आणि फितूरीच्या वादग्रस्त मुद्द्यांमुळे छत्रपती शिवाजी महाराजांचे जावई, छत्रपती संभाजीराजेंचे मेहुणे, तसेच महाराणी येसुबाई यांचे बंधु स्वराज्यनिष्ठ श्रीमंत गणोजीराजे शिर्के व काका कान्होजीराजे शिर्के या मातब्बर मराठा राजघराण्याला छावा फिल्ममध्ये फितूर दाखविल्याने आमच्या घराण्याला बदनाम केले जात असल्याचा आरोप करत चित्रपट टीमवर ऐतिहासिक राजेशिर्के घराण्याचे वंशज श्री. दिपकराजे शिर्के व श्री.लक्ष्मीकांत राजे शिर्के यांच्यासह अन्य शिर्के मंडळींनी छावा कादंबरी प्रकाशक, दिग्दर्शक, निर्माता, सेंसर बोर्ड यांच्या विरोधात मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार दाखल केली असतानाच.
त्यात या वादग्रस्त प्रकरणात मराठा संघर्ष योद्धा मा.श्री. मनोजदादा जरांगे पाटलांनी उडी घेत, विशेष लक्ष घातल्याचे समजते. राजेशिर्के घराण्याचे वंशज श्री. दिपकराजे शिर्के, श्री.लक्ष्मीकांत राजे शिर्के यांच्यासह भूषणराजे शिर्के, वकिल सचिनराजे शिर्के साहेब, चेतनराजे शिर्के, भारतराजे शिर्के, नवनाथ राजे शिर्के, कुमार पवार आदि मंडळींनी व मराठा बांधवांनी नुकतीच मराठा संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटलांची संबंधित विषयावर भेट घेऊन सविस्तर चर्चा केली असून मनोज जरांगे पाटलांनी देखील राजेशिर्के वंशज घराण्याला जाहिर vसमर्थन दिले असल्याचे समजते. यावेळी वंशज मंडळी व जरांगे पाटील यांच्यात झालेल्या चर्चे दरम्यान घराण्यावरील हा बदनामीचा प्रकार म्हणजे ऐतिहासिक चित्रपटातून मराठा समाजात उभी फुट पाडून प्रचंड तेढ, राग निर्माण करण्याचे महा-षडयंत्र असल्याची शंका नाकारता येऊ शकत नसल्याचे म्हंटले आहे.
कारण शिव-शंभुकालीन संघर्षलढा हा फक्त मराठे विरुद्ध मोघल असाच होता. त्यामुळे खलनायकाच्या भूमिकेत औरंगजेब, अफजलखान, शाहीस्तेखान, बहादुरखान, मुकरबखान हेच पात्र आहेत, छत्रपतींचे नातेवाईक राजेशिर्के घराणे अथवा मराठा घराणे खलनायक कसे असु शकते? मराठा तर कायम हिरोच्या भूमिकेत राहिला आहे. चित्रपट विषय मनोरंजन असला तरी वास्तवाला धरून असला पाहिजे कारण त्यांचा परिणाम दुरगामी होऊन पुढील अनेक पिढीवर होत असतो, त्यामुळे मराठ्यांना खलनायक दाखविणे हास्यास्पद आहे. परंतु या विषयावर सर्वांनी गांभीर्याने घेऊन मराठ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे. कुणी काही सांगो, आपला इतिहास आपणच वाचवला पाहिजे. मराठा मराठ्यांत दोन गट निर्माण होणे हि धोक्याची घंटा आहे त्यामुळे मराठे विभागले नाही पाहिजेत अशी बैठकी दरम्यान चर्चा झाली.
इतिहासात अन्य काही मंडळींनी शंभुराजांना पकडून देण्यात औरंगजेबला मदत केल्याचे अनेक पुरावे उप्लब्ध असताना देखील त्यांना दोषी न दाखवता. कथा, कादंबरी, महानाट्य, नाटके तसेच चित्रपटातून गणोजीराजे व कान्होजीराजे या पात्रांना मनघडण रंगवून नाहक टार्गेट करून खलनायक दाखविल्याने त्यांचा आमच्या प्रत्यक्ष जीवनावर विपरित परिणाम होत असून पुढील अनेक पिढ्यांवरही दुरगामी वाईट परिणाम होण्याची भीती संबंधित थेट वंशज घराण्या बरोबरच राज्यभरासह देशभरातील समस्त शिर्के परिवार व त्यांच्या आप्टेष्ठ, नातेवाईकांच्या लाखो मराठा कुटुंबांना वाटत आहे.