– भोसरी विधानसभेतील वीज प्रश्नाबाबत अधिकाऱ्यांना दोन महिन्यांचा “अल्टिमेटम “
-‘नागरिकांच्या हिताची कामे करा, सहकार्य करू’
भोसरी, (प्रतिनिधी) – भोसरी विधानसभा क्षेत्रातील समाविष्ट गावांना खंडित वीज पुरवठ्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या भागातील वीज वितरण कंपनीचा अतिशय मनमानी कारभार आहे. एखाद्याच्या दबावाखाली येथील अधिकारी काम करतात का असा प्रश्न वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यावरून निर्माण होतो. खंडित वीज पुरवठ्याच्या समस्येमुळे आमच्या भावना अतिशय तीव्र आहेत. मात्र तरीही आम्ही सहकार्याची भूमिका ठेवली असून येथे दोन महिन्यात खंडित वीज पुरवठ्याच्या समस्येवर तोडगा काढा अशा शब्दात स्थायी समितीचे माजी सभापती अजित गव्हाणे यांनी महावितरणच्या कारभाराविषयी संताप व्यक्त केला.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या रूपाली आल्हाट यांच्या नेतृत्वाखाली मोशी शिव रस्ता येथे जन आक्रोश आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. मोशी, बोऱ्हाडे वाडी, संजय गांधीनगर नगर, तूपेवस्ती, गायकवाडवस्ती, शिव रोड, चिखली, जाधववाडी, संभाजीनगर, नागेश्वर नगर या सर्वच भागात गेल्या वर्षभरापासून विजेचा लपंडाव सुरू आहे. यामुळे वैतागलेल्या नागरिकांनी जन आक्रोश आंदोलनाचे आयोजन केले होते. यावेळी स्थायी समितीचे अध्यक्ष अजित गव्हाणे बोलत होते. या जनआक्रोश मोर्चासाठी शिवसेना पुणे जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, माजी नगरसेवक माजी नगरसेवक धनंजय आल्हाट ,वसंत बोराटे ,ज्ञानेश्वर बोऱ्हाडे,  नीलेश मुटके, परशुराम आल्हाट, नितीन बोंडे,  विनायक रनसुभे,  आशा भालेकर,  गौरी घंटे,  काटे ताई,  सुनील समगिर,  सागर बोराटे , गणेश गायकवाड ,काका बोराटे, नीलेश पाठारे,  नितीन लगाडे ,परमेश्वर आल्हाट ,राहुल पाटील ,किरण जाधव, कदम काका ,संदीप आल्हाट, आप्पा वलांडे ,अशोक गायकवाड,सचिन कडू,जोशी साहेब, मोहोळकर काका, राहुल गरड ,नितीन काकड, रविराज जोशी, सचिन कडू तसेच  महाविकास आघाडीचे पदाधिकारी , या भागातील अनेक नागरिक उपस्थित होते. सोसायटी धारकांचा या आंदोलनात मोठा सहभाग पाहायला मिळाला.
यावेळी अजित गव्हाणे म्हणाले, मोशी, बोऱ्हाडे वस्ती, डुडुळगाव तसेच लगतच्या चऱ्होली यासारख्या गावांचा विचार केला तर शहरात इतर भागांच्या तुलनेने येथे मूलभूत सुविधांचा देखील अभाव आहे. खड्डे, पाणी यांची समस्या मोठी आहेच. परंतु त्याहूनही अधिक खंडित वीज पुरवठ्याची समस्या सुटलेली नाही.  याला कारण केवळ गेल्या दहा वर्षातील नियोजनाचा अभाव आहे.या भागात प्रचंड नागरिकरण वाढत असताना वीज पुरवठ्याबाबत सक्षम यंत्रणा उभारण्याबाबत  गेल्या दहा वर्षात ठोस उपाययोजना केली नसल्याचे दिसून येते. या भागात ट्रान्सफॉर्मर वाढवणे गरजेचे असताना, आहे त्याच यंत्रणेवर अजूनही वीज पुरवठा होत असल्यामुळे वीज पुरवठ्याबाबत अनेक तक्रारी येथील नागरिकांच्या आहेत. याबाबत वीज वितरण विभागाकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीच उपाय योजना केली गेली नसल्याचे अजित गव्हाणे म्हणाले. महावितरण चा हा गंठण कारभार कोणाच्या दबावाखाली सुरू आहे का ? असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. नवीन गावांना खंडित वीज पुरवठ्याचा  मोठा त्रास आहे. नागरिक वारंवार तक्रारी करतात. त्यामुळे आता आमच्या भावना अतिशय तीव्र आहेत. नागरिकांचे हाल लक्षात घेऊन येत्या दोन महिन्यात महावितरणने याबाबत सविस्तर अहवाल तयार करावा. यासाठी आम्ही देखील पाठपुरावा करू. या भागातील वीज जोडणी, ट्रान्सफॉर्मर याबाबतचे प्रश्न आम्ही देखील सरकार दरबारी नेऊ .”नागरिकांच्या हिताची कामे करा, आम्ही सहकार्याचीच भावना ठेवू” असे देखील गव्हाणे यावेळी म्हणाले.
सुलभा उबाळे म्हणाल्या, पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी म्हणून ओळखली जाते. आणि आम्हाला रोजच्या मूलभूत सुविधांसाठी आंदोलन करावे लागते यासारखी मोठी शोकांतिका नाही. या भागातील सध्याचे आमदार मोठमोठ्या वल्गना करतात आणि त्यांच्या क्षेत्रातील नागरिकांना विजेसाठी झगडावे लागते ही मोठी खेदाची बाब आहे.
माजी नगरसेवक वसंत बोराटे म्हणाले महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांचा येथील कारभार पाहिला तर ते कोणाच्या दबावाखाली किंवा जाणीवपूर्वक मोशी, बोराटेवस्ती, बोऱ्हाडेवस्ती या भागाला वंचित ठेवत आहे का असा प्रश्न पडतो. म्हणूनच आज मोशी शिवरस्त्याच्या लगतच्या सर्व सोसायटी धारकांनी एकत्र येत या जनआक्रोश आंदोलनात सहभाग घेतला आहे. तसेच येथील नागरिकही मोठ्या संख्येने आंदोलनासाठी उपस्थित राहून आपल्या गैरसोयीबद्दल आवाज उठवत आहेत. खंडित वीज पुरवठ्यामुळे या भागातील नागरिकांमध्ये मोठी नाराजी आहे. या भागात लाखो रुपयांचे घर घेतल्यानंतर तीन- तीन तास घरात वीज नसताना बसावे लागते म्हणून घर घेतल्याचा पश्चाताप होतो असे नागरिक सांगतात . त्यामुळे नागरिकांनी या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी “परिवर्तन” करायचे ठरवले आहे.
………..
अन्यथा जनक्षोभ उसळल्याशिवाय राहणार नाही – आल्हाट
रूपाली आल्हाट म्हणाल्या खंडित वीज पुरवठ्यामुळे आम्हाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. महिला सातत्याने याबाबत तक्रारी करत असतात. घरात दोन ते तीन तास वीज नसते. आम्ही वेळेवर बिल भरतो तरीही खंडित वीज पुरवठ्याचा त्रास कायम आहे. परशुराम आल्हाट म्हणाले लाखो रुपयांचे घर घेऊन घरात वीज नाही.  यामुळे नागरिकांच्या भावना तीव्र आहेत याची दखल महावितरणच्या अधिकाऱ्यांनी घ्यावी अन्यथा जनक्षोभ उसळल्याशिवाय राहणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *