पिंपरी, पुणे (दि. २१ ऑगस्ट २०२३) पोलीस कुठल्याही गुन्ह्याचा शोध 24 तासात लावतात, यावर माझा ठाम विश्वास आहे, असे मत पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांना वैशिष्ट्यपूर्ण सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले. त्याबद्दल पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयुक्त चौबे यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात चंद्रकांत पाटील बोलत होते.
चंद्रकांत पाटील म्हणाले, “पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांना वैशिष्ट्यपूर्ण सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक मिळाले. हे पदक खूप मोठे आहे. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. पोलिसांना चांगलं म्हणणं, त्यांचा सन्मान करणं हे फार रेअर असतं. ते आपल्याला वाढवायला हवं. अभिनंदन आणि शुभेच्छांमुळे पोलिसांना काम करण्याला उत्साह येतो.

पोलीस कुठल्याही गुन्ह्याचा शोध 24 तासात लावतात, यावर माझा ठाम विश्वास आहे. पुणे शहरात मागील काही काळात आतंकवाद्याची लिंक सापडली. त्याचे धागेदोरे फार लांबपर्यंत जात आहेत. पुणे, पुणे जिल्हा आणि पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सक्षमीकरणासाठी 40 कोटी जिल्हा नियोजन निधी मधून तर 60 कोटी रुपये इतर माध्यमातून दिले जाणार आहेत. पोलीस चौक्यांचे सक्षमीकरणासाठी आणखी काम करणे गरजचे असल्याचे पालकमंत्री म्हणाले.
अंमली पदार्थ तरुणाईला खात आहेत. त्याला कुठलेही अभय देऊ नका. शक्य त्या पर्यायाचा अवलंब करा. महिलांच्या सुरक्षेसाठी दामिनी पथक आणखी सक्षम करा, असा सल्ला देखील पालकमंत्र्यांनी पोलिसांना दिला.

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, “पोलीस आयुक्तांना जाहीर झालेल्या राष्ट्रपती पोलीस पदकाबद्दल त्यांचे अभिनंदन. चौबे यांनी 26 वर्ष केलेल्या सेवेबद्दल त्यांना राष्ट्रपती पोलीस पदकाने गौरविण्यात येणार आहे. मी माझ्या कारकिर्दीत अनेक पोलीस अधिकारी पाहिले. पण खऱ्या अर्थाने त्या पदाला न्याय देण्याचे काम पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी केले आहे. अनेकदा राजकीय मंडळींच्या दबावामुळे पोलिसांवर मर्यादा येतात. गुन्हेगाराला वेळेत शासन न झाल्याने हवी ती जरब बसत नाही. लोकहितासाठी जर प्रत्येक राजकीय नेत्याने काम केले तर पोलिसांना वेगळे काम करण्याची गरज राहणार नाही. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांचे काम खूप चांगले आहे. शहरासोबत गुन्हेगारी वाढत आहे. ती कमी करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत.”

आमदार उमा खापरे म्हणाल्या, “शहरातील प्रत्येक नागरिक पोलिसांकडे आपले प्रश्न घेऊन जाऊ शकतो. तसे वातावरण शहरात निर्माण झाले आहे. महिलांच्या संरक्षणात पिंपरी चिंचवड पोलीस यशस्वी ठरले आहेत. यापुढेही महिलांची सुरक्षा पोलिसांनी अबाधित ठेवावी. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांना जाहीर झालेल्या राष्ट्रपती पोलीस पदकासाठी शुभेच्छा.”

सत्काराला उत्तर देताना पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे म्हणाले, “या सत्काराबद्दल पुणे श्रमिक पत्रकार संघाचे मनापासून आभार. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मला राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले. त्यांनतर सर्व स्तरातून मला आपुलकीने सर्वांनी शुभेच्छा दिल्या. पिंपरी चिंचवडने दिलेले प्रेम आणि आपुलकी मी आयुष्यभर विसरू शकणार नाही. माझ्या मेडलचा प्रस्ताव मुंबईत असताना दोन वेळा गेला होता. पण पिंपरी चिंचवड शहरात आल्यानंतर त्याबाबतचे पदक जाहीर झाले. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहर माझ्यासाठी लकी आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय लोकाभिमुख करण्यासाठी आम्ही पूर्णपणे प्रयत्न करू. पिंपरी चिंचवड शहरात असणाऱ्या अडचणी पहिल्या पोलीस आयुक्तांपासून माझ्यापर्यंत सर्वांनी सोडविण्याचा प्रयत्न केला आहे. पोलीस आणि जनता वेगळे नाही. नागरिकांनी आमचे डोळे आणि कान बनावे. नागरिक दोन पावले पुढे आले तर आम्ही चार पावले पुढे येऊन शहरातील गुन्हेगारी नेस्तनाबूत करून टाकू.

सूत्रसंचालन अनिल कातळे यांनी केले. प्रास्ताविक रोहित आठवले यांनी केले. आभार अमोल येलमार यांनी मानले.
—————————————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *