पिंपरी : पिंपरी-चिंचवड भारतीय जनता पार्टीच्या शहराध्यक्षपदी माजी नगरसेवक शंकर जगताप यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जगताप यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
भाजपाचे विद्यमान शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांचा शहराध्यक्षपदाचा कार्यकाळ सहा महिन्यांपूर्वी संपला होता. त्यामुळे नवीन शहराध्यक्ष कोण? याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती.
राज्यातील पोटनिवडणूक आणि पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकांमध्ये भाजपाची मोठी पिछेहाट सुरू असताना चिंचवडमध्ये केवळ ‘जगताप पॅटर्न’मुळेच पक्षाची पत राहिली. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांनी अचूक नियोजन करीत महाविकास आघाडीचे तगडे आव्हान रोखले. त्यामुळे या पोटनिवडणुकीत भाजपाचा विजय सोपा झाला. त्यामुळे शंकर जगताप भाजपासाठी ‘संकटमोचक’ ठरले होते. त्याची दखल पक्षश्रेष्ठींनी घेतली आहे.
दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनापूर्वी त्यांच्यावर सुमारे दोन वर्षे रुग्णालयात औषधोपचार सुरू होते. या काळात वैद्यकीय तज्ञांनी विश्रांतीचा सल्ला दिल्यानंतर जगताप यांना मतदार संघात बाहेर पडता आले नाही. या काळात भाजपाच्या पक्षश्रेष्ठींनी त्यांचे लहान बंधू उद्योजक शंकर जगताप यांच्या खांद्यावर चिंचवड विधानसभा निवडणूक प्रभारी पदाची जबाबदारी सोपवली होती. त्यानंतर शंकर यांनी मतदार संघात मोर्चेबांधणी सुरू केली. दि. ३ जानेवारी २०२३ रोजी लक्ष्मण जगताप यांचे निधन झाले. त्यावेळी कुटुंबाला सावरण्याची मोठी जबाबदारी शंकर जगताप यांच्यावर पडली होती. त्यांनी कुटुंब आणि पक्ष अशी दुहेरी जबबादारी यशस्वीपणे पेलली आणि पोटनिवडणुकीत अश्विनी जगताप यांना विजय मिळला.

