पिंपरी, दि.१९ डिसेंबर २०२२:-  शोभेच्या वस्तू, आधुनिक व पारंपारिक वस्त्र, महिलांची आभूषणे, लहान मुलांची खेळणी व फॅन्सी ड्रेस, पुस्तकांचे प्रदर्शन, गृहउपयोगी व  चैनीच्या वस्तू,  विविध मसाल्याचे पदार्थ व प्रकार खरेदीसाठी जनसागर लोटला होता. तर स्वादिष्ट व रुचकर खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी खवय्यांची गर्दी उसळलेली होती. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या मेजवानीने रसिक मंत्रमुग्ध झाले होते, असे चित्र निर्माण झाले ते साप्ताहिक सुट्टीच्या निमित्ताने पवनाथडी जत्रेत.

महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध व्हावी, महिलांमध्ये विपणन व विक्री कौशल्य विकसित व्हावे तसेच महिलांचे सबलीकरण करण्यासाठी महापालिकेच्या वतीने दि.१६ डिसेंबर ते दि.२० डिसेंबर २०२२ या कालावधीत सांगवी येथील पी.डब्ल्यू.डी. मैदानावर  पवनाथडी जत्रा भरवण्यात आली आहे. दरम्यान,  साप्ताहिक सुट्टी व पवनाथडी जत्रा असा दुग्धशर्करा योग जुळून आल्यामुळे जत्रेचा आनंद घेण्यासाठी लोकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.

महापालिकेच्या वतीने  आयोजित करण्यात आलेली पवनाथडी जत्रा लोकांच्या कुतूहलाचा विषय ठरत असून पवनाथडी जत्रेची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे.  याठिकाणी उभारण्यात आलेली बहारदार स्वागत कमान, रचनात्मक स्टॉल्सच्या रांगा, आकर्षक  विद्युत रोषणाई, तसेच पारंपारिक बैलगाडी व शेती साहित्य यांच्यासह पारदर्शक काचेवरील अधोगामी वाहणारा पाण्याचा सौम्य धबधबा लोकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. या ठिकाणी लोकांची सेल्फी काढण्यासाठी मोठी गर्दी होत आहे.  तर गोंधळ, जागरण, लावणी अशा ग्रामीण लोककला प्रत्येक्ष अनुभवण्याची संधी लोकांना जत्रेच्या निमित्ताने  उपलब्ध झाली आहे.  आकाशी पाळणा, ड्रॅगन ट्रेन, झिग झॅग रोलर अशा अंगावर शहारे आणणाऱ्या अनेक खेळण्यांचा अनुभव घेताना लहान मुले, तरुण, ज्येष्ठ नागरिक मोठा जल्लोष करून जत्रेचा आनंद घेत आहेत. शुद्ध शाकाहारी, चमचमीत मांसाहारी खाद्यपदार्थांसह बहुविध खाद्यसंस्कृतीची मेजवानी एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्याने  खवय्यांची इच्छापूर्ती होत आहे.  महापालिकेच्या वतीने शहरात उभारण्यात  आलेल्या प्रेक्षणीय,पर्यटन स्थळे, पायाभूत सुविधा याबाबत दृक श्राव्य चित्रफितींद्वारे माहिती देणारी डिजिटल चलचित्र भिंत उभारण्यात आली आहे.  शिवाय, सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोकांची बैठक व्यवस्था असलेले सांस्कृतिक दालन उभारण्यात आले असून या ठिकाणी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. महाराष्ट्राची लोकधारा, खास महिलांसाठी  न्यु होम मिनिस्टर,  मेकअप कौशल्य प्रात्याक्षिके व प्रशिक्षण, आर.डी बर्मन यांनी संगीत दिलेल्या सदाबहार गाण्यांचा कार्यक्रम आयोजन करण्यात आले आहे.

महिलांचे सबलीकरण करत असताना समाजाचा घटक असलेले दिव्यांग, तृतीयपंथी यांच्यासाठी  देखील स्टॉल्स राखीव ठेवण्यात आले असून त्यांच्याद्वारे या ठिकाणी विविध वस्तू, खाद्यपदार्थांची विक्री करण्यात येत आहे. याद्वारे त्यांच्या सामाजिक व आर्थिक समावेशनासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.

महापालिकेच्या वतीने १८ ते ३० वयोगटातील युवक व युवतींना रोजगारभिमुख कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या “लाईट हाउस” उपक्रमात युवक वर्गाने प्रवेश घ्यावा, त्याबाबत त्यांना माहिती व्हावी, यासाठी माहिती कक्ष उभारण्यात आला आहे. कौशल्य प्रशिक्षणाची  नोंदणी करण्यासाठी युवक व युवतींचा अधिक कल असल्याचे दिसुन येत आहे.

पवनाथडी जत्रेच्या ठिकाणी मोठ्या संख्येने महापालिकेचे कर्मचारी, सुरक्षा कर्मचारी, महाराष्ट्र सुरक्षा दलाचे कर्मचारी, पोलीस दलाचे कर्मचारी यासह अग्निशामक बंब, सुसज्ज रुग्णवाहिका तैनाद करण्यात आली आहे, अशी माहिती समाज विकास अधिकारी सुहास बहाद्दरपुरे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *