“पंचवटी” येथे गदिमांच्या स्मृती जागवत कविता अर्पण सोहळा…
पिंपरी:- महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेच्या वतीने ग.दि. माडगूळकर यांच्या वाकडेवाडी पुणे येथील पंचवटी निवासस्थानी पिंपरी चिंचवड शहरातील कवींनी गदिमा यांच्या स्मृतिदिना निमित्त (१५ डिसेंबर २०२२) त्यांच्या आठवणी जागवत कविता समर्पित केल्या.
कविसंमेलनाची सुरुवात गदिमा यांच्या पंचवटी निवासस्थानी असलेल्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
गदिमांची सून शीतल माडगूळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी आनंद माडगूळकर म्हणाले…
“मराठी शारदेचे लेणं आणि महाराष्ट्राच्या हृदयाचं गाणं म्हणजे गदिमा. गदिमा म्हणजे कवितेचा कल्पतरू. आज मी पिंपरी चिंचवड शहरातील कवींच्या कवितेचा आनंद घेतला. कवींच्या कवितेतून एक विलक्षण अनुभूती येत असते. उत्तम कवी होण्यासाठी ओवी करायला शिकले पाहिजे. काव्यरचना निर्दोष असावी. गदिमांच्या वास्तुत आज झालेले हे कविसंमेलन ऐतिहासिक आहे.
याप्रसंगी सोलापूरचे प्रख्यात कवी माधव पवार यांना गदिमा काव्यप्रतिभा पुरस्कार देऊन तर कवी उद्धव कानडे यांना गदिमा स्नेहबंध पुरस्कार देऊन शीतल माडगूळकर आणि आनंद माडगूळकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले. गदिमांच्या पंचवटीत कवींनी एकापेक्षा एक सरस कविता सादर केल्या. कविसंमेलनाची सुरुवात गदिमांची नात लीनता माडगूळकर यांची “तुझ्या स्मृतींचा दरवळ देते जन्म नवा… या आशावाद व्यक्त करणाऱ्या कवितेने झाली.
कवयित्री संगीता झिंजुरके यांनी गोड आवाजात ‘शृंगार मराठीचा ‘ही कविता सादर केली. कवी धनंजय सोलंकर आपल्या कवितेतून म्हणतात.. “वृंदावनातून आईच्या नांदावयास जाती
तुळशी कमानीच्या गाठी बांधावयास जाती.. तर कवयित्री मानसी चिटणीस आपल्या कवितेतून सांगतात.. “कोण सांगते साजणी हिरमुसलेले नभ उजळू दे.. ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या गूढ सुखाचा अंत कळू दे” कवी राजेंद्र वाघ यांनी गदिमांची “एक धागा सुखाचा.. ही रचना सादर करून गदिमांच्या वास्तूतील वातावरण प्रफुल्लित केले. कवयित्री वर्षा बालगोपाल यांनी “निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान मुक्ताई भावंडे चार…
पुण्याई सिद्ध करणारी पंचामृत धार.. ही भक्तिरचना सादर केली.
महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले यांनी गदिमा काव्यमहोत्सवाचा आढावा घेत जीवनाचे मर्म सांगितले. ते म्हणतात.. “जन्म जगण्यासाठी आहे.
जगणे झिजण्यासाठी..
देह जरी झिजूनी थकला
मन मात्र उभे आहे..
हाच धागा पकडून सोलापूरचे कवी माधव पवार म्हणतात..
“मी व्याकूळ होतो तेंव्हा जाऊन स्मशानी येतो”
“मस्तकी लावुनी राख शांत होऊनी येतो”
मग कवी उद्धव कानडे आपल्या कवितेतून सांगतात..
कवितेने मला काय दिले
जसं ज्ञानदेवाचं मन दिल..
तस शब्दांचं धन दिल..
आत्म्याच बळ तर दिलच दिल
पण तुकोबांच डोळ दिल…
कवी दत्तात्रय खंडाळे यांनी भक्तिरचना सादर केली. ते म्हणतात.. पंढरीचा राणा, सांगे माझ्या कानी..
नाही मी मंदिरी, नाही रे पाषाणी..
महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचे पिंपरी चिंचवड विभाग प्रमुख सुरेश कंक यांनी सूत्रसंचलन केले अन् कृष्णार्पण म्हणत गदिमांना वंदन करीत कवितेतून म्हणाले..
कमवलेल्या पुण्याला एकदा कृष्णार्पण म्हण..
मी तुझ्याच चैतन्यातून प्रकट होईल..
अन् तुझे सारे जीवन कृष्णमय बनवून टाकीन…
मुरलीधर दळवी यांनी गदिमा कुटुंबीयांचे आभार मानले.