लातूर (प्रशांत साळुंके):- महिला आणि तरूणींना आजही बुरसटलेल्या चुकीच्या प्रथांमुळे अडचणींना सामोरे जावे लागते आणि शारीरिक गैरसमज हा सुध्दा महत्त्वाचा संघर्ष आहे.त्यामुळे याबद्दल पालकांसह समाजाने सजग होणं आवश्यक आहे.यासाठी अक्का फाउंडेशनच्या माध्यमातून ‘ प्रोजेक्ट आनंदी ‘ कार्यशाळांचे आयोजन करून यातून प्रशिक्षण देण्याचे काम सध्या निलंगा तालुक्यातील शाळा आणि महाविद्यालय सुरू आहे.

माजी पालकमंञी तथा आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या संकल्पनेतून हा प्रोजेक्ट आनंदी निलंगा मतदार संघात राबविण्यात येणार असून माजी खा.रूपाताई पाटील निलंगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजपचे प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर यांच्या पुढाकारातून अक्का फाउंडेशनच्या वतीने निलंगा शहरातील अनेक शाळेतील मुलींना प्रोजेक्ट आनंदी यामाध्यमातून मासिक पाळीत घ्यावयाची काळजी या विषयावर प्रशिक्षण देण्याच्या कार्यशाळांचे आयोजन करण्यात येत आहे.दि.7 डिसेंबर रोजी महाराष्ट्र महाविद्यालय,शिवाजी विद्यालय,अशोक बाहेती इंग्लिश स्कूल,सेंट मेरी इंग्लिश स्कूल,रहेमानियाॅं उर्दु विद्यालय निलंगा,वेणूताई यशवंतराव चव्हाण प्राथमिक विद्यामंदिर निलंगा,दि.8 डिसेंबर रोजी कै.विठ्ठलराव धुमाळ ज्युनिअर काॅलेज,माॅर्डन इंग्लिश स्कूल,निलंगा व व्ही.डी.डी.नोबेल पब्लिक स्कुल,निलंगा येथे प्रोजेक्ट आनंदीच्या कार्यशाळा घेण्यात आल्या.’प्रोजेक्ट आनंदी’मार्फत मासिक पाळी दरम्यान घेतल्या जाणार्‍या स्वच्छता व्यवस्थापनाविषयीच्या लघुपट दाखवण्यात आला व विद्यार्थीनींच्या शंकांचे निरसन करण्यात आले.

या सर्व शाळा आणि विद्यालयांमध्ये अतिशय उत्साहात कार्यशाळा पार पडल्या.मासिक पाळीविषयी असणार्‍या शंकांचे निरसन झाल्याने व त्यांचा मनातील मासिक पाळी विषयीची संकोच कमी झाल्याने विद्यार्थिनींच्या चेहर्‍यावरही आनंद दिसून आला.येणार्‍या काळात ग्रामीण भागातीलही शाळेमध्ये या प्रोजेक्ट आनंदी हा कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती अक्का फाउंडेशच्या वतीने देण्यात आली.यशस्वितेसाठी रणजित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रणिता केदारे,पुजा सरवदे,राहुल ढाले,योगेश गाडीवान,सिध्दू डांगे आदींनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *