पिंपरी :- जागतिक एड्स प्रतिबंधक दिनाचे औचित्य साधून दिलासा संस्थेचे अध्यक्ष सुरेश कंक यांनी एड्स बाबत काम करताना आलेले अनुभव सांगितले.
सुरेश कंक म्हणाले.. एड्सबाबत जनजागृती करण्याचे काम १५ ते २० वर्षांपूर्वी जिकिरीचे होते. त्यातूनही समाजमनाचा अभ्यास करून सामान्य माणसांच्या जनजागृतीचे काम दिलासा संस्थेने केले. अनैतिक संबंधातून एड्सचा प्रसार होतो याचे दाखले देताना कंक यांनी शाळा, महाविद्यालये, गरिबांच्या झोपडपट्ट्या यात जाऊन सर्वांना समजेल अन् उमजेल अशा भाषेत एड्स जनजागृती केली. यासाठी ते संत तुकाराम महाराज यांच्या एका अभंगाचा दाखला देत असत.
तारुण्याच्या मदे ना माने कोणाशी
सदा मुसमुसी धुळी जैसा
आठोनी वेठोनी बांधला मुंडासा
फिरतसे म्हैसा जनामधी
हाती दीडपान वरती करी मान
नाही तो सन्मान भलीयासी
श्वानाचीये परी हिंडे दारोदारी
पाहे परनारी पापदृष्ठी
तुका म्हणे ऐसी थोर हानी झाली
करीता टवाळी जन्म गेला..
किंवा समर्थ रामदास यांच्या मनाच्या श्लोकातील
मना वासना दुष्ट कामा नये रे
मना सर्वदा पापबुद्धी नको रे..
अशा संत् वचनांचे दाखले देत पिंपरी चिंचवड शहरात कधी वासुदेव, पोतराज, नंदीबैलवाला, देवीचा भुत्या, जोकर, काळा गोरा माणूस, रोबोट, लग्नातला घोडा घेऊन तर अर्धनारी नटेश्र्वर बनून चौका चौकात जनजागृती केली.
आजही आपल्या देशातून एड्स हद्दपार झाला नाही. एड्स पासून बचावात्मक औषधे आज उपलब्ध झाली आहेत पण एड्सचा धोका अजूनही संपला नाही. एच.आय.व्ही. एड्सचा विषाणू नष्ट करायचा असेल तर यापुढेही सामाजिक जनजागृती, प्रबोधन आवश्यक आहे. अन् हे सर्व फक्त जागतिक एड्स प्रतिबंधक दिनापुरते काम नाही. असे प्रतिपादन सुरेश कंक यांनी केले.