पुणे :- अगामी महापालिका निवडणूका तसेच मागील तीन महिन्यात पक्षाकडून करण्यात आलेल्या संघटना बांधणीसह वेगवेगळया घटकांपर्यंत पक्ष पोहचविणाऱ्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाकडून शहरात येत्या रविवारी (दि.4) रोजी पुण्यात जोरदार शक्ती प्रदर्शन केले जाणार आहे. त्यासाठी, पक्षाच्या वतीने भवानीपेठ येथील महात्मा ज्योतिबा फुले शाळेच्या मैदानावर जाहीर मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
या मेळाव्यात पक्षाकडून मोठया प्रमाणात पक्ष प्रवेश करून घेतले जाणार असून त्यामुळे पक्ष संघटना आणखी मजबूत होण्यास मदत होणार असल्याचे पक्षाचे पुणे शहर प्रमुख प्रमोद उर्फ नाना भानगिरे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
पुणे शहर प्रमुख प्रमोद उर्फ नाना भानगिरे, पक्षाचे शहर व जिल्हा संपर्क प्रमुख अजय भोसले, युवासेना सचिव किरण साळी, प्रसिध्दी प्रमुख संजय अगरवाल आदी यावेळी उपस्थित होते.
पुणे शहर प्रमुख भानगिरे म्हणाले की, राज्यात पक्षाच्या स्थापनेस तीन महिने झाले आहेत. या तीन महिन्यात मोठया प्रमाणात सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय देण्याचा प्रयत्न राज्यातील शिंदे- फडणवीस सरकारने केला आहे. अशाच पध्दतीचे काम पक्षाच्या माध्यमातून पुण्यातही सुरू असून पुणेकरांच्या वेगवेगळया प्रश्नांमध्ये स्वत: मुख्यमंत्री लक्ष घालत आहेत. त्यातच, प्रामुख्याने शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उपाय योजना, चांदणी चौक कोंडी, नऱ्हे येथे होणाऱ्या अपघात रोखण्यासाठी मुख्यमंत्री स्वत:लक्ष देत आहेत.
या तीन महिन्यात स्थानिक पातळीवरही पक्षाकडून संघटनेची सक्षम बांधणी करण्यात आली असून शहरातील रस्ते, पालिका तसेच पीएमटी कामगारांचा सातवा वेतन आयोगाचा प्रश्न, कामगारांच्या समस्या अशा अनेक विषयात शहर कार्यकारीणीचे पदाधिकारी लक्ष देत असून पुढील आठवडयात त्याबाबत मुंबईत मुख्यमंत्र्यांकडे स्वतंत्र बैठकही होणार आहे.
दरम्यान, पुण्यात पक्षाचा जाहीर मेळावा होणार असून या मेळाव्यास पक्षाचे नेते आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे मार्गदर्शन करणार आहेत. तर विधीमंडळाचे प्रतोद भरत गोगावले, माजी खासदार शिवाजी आढळाराव पाटील, विजय शिवतारे, नरेश म्हस्के, खासदर श्रीरंग बारणे उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यात वेगवेगळया राजकीय पक्षातील कार्यकर्तेही बाळासाहेंबांची शिवसेना पक्षात मोठ्या संख्येने प्रवेश करणार असून त्यामुळे अगामी महापालिका निवडणूकीत पक्षाची ताकद आणखी वाढणार आहे.